पान:परिचय (Parichay).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३० । परिचय
 

की मलिकंबर, अशी अनुमाने काढणे ह्यांत फार थोडा अर्थ असतो. संतचरित्राचे ठरलेले चमत्कार सार्वत्रिक आहेत. त्यांत इतिहास शोधणे धोक्याचे असते.
 रंगबोधिनी टीका भगवद्गीतेतील काही विवाद्य स्थळांवर प्रकाश टाकील ही आशा, वाहवत जाण्याचा परिणाम आहे. प्रथम म्हणजे रंगबोधिनी ही गीतेच्या पहिल्या अध्यायावरील टीका आहे. ती टीकाकाराच्या तत्त्वज्ञान क्षेत्रातील व गीता 'विवेचनातील अधिकारावर प्रकाश टाकण्यास असमर्थ आहे. दुसरे म्हणजे इसवीसनाच्या सतराव्या शतकातील, विवाद्य अधिकार असणाऱ्या व्यक्तीची ती रचना आहे. म्हणून संतक्षेत्रातील महान अधिकार या ठिकाणी उपयोगी पडणारा नव्हे.
 संशोधनाच्या क्षेत्रात विवाद्यता सार्वत्रिक असते. मतभेदाची स्थळेही असतात. पण अशा वादविवादांना आणि मतभेदांना फार वाव मिळू नये ह्याची दक्षता आवळीकरांनी घेतलेली आहे. शब्दार्थ सांगणाऱ्या शेवटच्या टीपा मात्र याहून व्यवस्थित असावयास पाहिजेत. कारण ह्या साहित्यात अनेक शब्दांची बोलभाषेतील विशिष्ट रूपे जतन झालेली आहेत व ती महत्त्वाची आहेत. अर्थाच्या बाबतसुद्धा मतभेदांना वाव शक्यतो नसावा. उदाहरणार्थ 'थिता', म्हणजे व्यर्थ नव्हे, ते ' स्थित ' चे रूप आहे. 'गुजरी' हा संध्याकाळचा बाजार नव्हे, गुजर स्त्रीला गुजरी म्हणतात. 'शतपत' हा शतपथ ब्राह्मणाचा उल्लेख नसून, ' शेकडो' इतकाच तेथे अर्थ आहे. रंगबोधिनीतील 'कुमरणी' हा 'कुमारांना' ह्याचे भ्रष्ट रूप असण्याचा संभव अधिक.
 थोडक्यात म्हणजे आवळीकरांनी ह्या ग्रंथाच्या रूपाने महत्त्वाचे साधन‘साहित्य उजेडात आणले आहे ही प्रशंसनीय कामगिरी म्हटली पाहिजे.



 (मुडलगीचे स्वामी : ले-डॉ.पंडित आवळीकर. कर्नाटक आणि पुणे विद्यापीठ संयुक्त प्रकाशन.)