पान:परिचय (Parichay).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मुडलगीचे स्वामी । २९
 

पुढे गेलो तर फलटण ही अंबानगरी आहे असा पक्ष निर्माण होतो. ह्या तिसऱ्या पक्षालाही आपल्या बाजूने खूपच सांगता येण्याजोगे आहे. आवळीकरांना मुकुंदराजांची स्थलनिश्चिती करताना ह्याही पक्षाचा विचार करावा लागणार आहे. तूर्त तरी उपलब्ध पुराव्यानुसार मुकुंदराज अंबेजोगाईचे असण्याचाच संभव जास्त असे म्हटले पाहिजे. ह्यांच्याप्रमाणेच आवळीकरही अंबेजोगाई पक्षाचेच समर्थक आहेत.
 मुकुंदराज हे स्वतः शैव आहेत ह्यात वाद नाही. पण त्यांच्या परंपरेत हा शैव असण्याचा आग्रह कुठवर टिकला असेल हे सांगणे कठीण आहे. मुकुंदराजांचा काळ कोणताही असला तरी त्यांची परंपरा पुढच्या काळात ज्या महाराष्ट्रात वावरली तो परिसर वारकरी संप्रदायाने प्रभावित झालेला प्रदेश आहे. ह्या संदर्भात मुकुंदराजी परंपरेत पुढे वारकरी संत आढळले तर ते स्वाभाविक आहे. रंगबोधच वारकरी असल्यामुळे पुढची मुडलगी मठाची सारी परंपरा वारकरीच आहे. वारकरी संप्रदाय हा देवतांच्या बद्दल अतिशय उदार असल्यामुळे ह्या स्वामीच्या पदरचनेत विठोबा, राम आणि देवी तर आहेतच पण दत्तही आहे. लिंगायत धर्माची परिभाषाही ठिकठिकाणी वापरलेली आहे. वारकऱ्यांच्या कडून अपेक्षित असणारी सर्वसमावेशक समन्वयाची छाप या सर्व साहित्यावर आहे. वि. अं. कानोले यांनी सहजबोधाचे गुरू निजानंद हे गंगाखेडचे होते व त्यांच्या पत्नीचे नाव इंदिराबाई होते अशी माहिती दिली आहे. ह्या माहितीचा आधार टाकळी येथे उपलब्ध झालेले सहजबोधांचे चरित्र आहे. सदर चरित्र कानोले ह्यांच्या जन्मानंतरचे असल्यामुळे अगदी अर्वाचीन आहे. जेव्हा इतर कोणताच पुरावा नव्हता, तेव्हा ही माहिती प्रमाण मानण्याशिवाय पर्याय नव्हता. आता अधिक जुनी व विश्वसनीय माहिती आवळीकरांनी पुढे आणली आहे. त्यामुळे सहजबोधांचे गुरू जगन्नाथ व त्यांच्या पत्नीचे नाव सजनाबाई असे समजणेच रास्त आहे. माझ्याशी चर्चा करताना अनाग्रही पद्धतीने कानोले ह्यांनी हेच मत व्यक्त केले आहे.
 पंडित आवळीकरांना प्रेमाने काही सूचना देणे मात्र भाग आहे. त्यांपैकी एक सूचना म्हणजे साधनसाहित्याच्या आपुलकीपोटी वाहवत जाणे आता त्यांनी कमी केले पाहिजे. असे प्रकार त्यांच्या लेखनात तुरळक असले तरी, आहेत हे बरे नव्हे. विवेकसिंधूत मुकुंदराजांनी हरिनाथ व आदिनाथ ह्यांच्या भेटीचे वर्णन करताना 'तैसे दोघे आनंदे फुजो लागले। हरिशंकर ते,' असा उल्लेख केला आहे. आवळीकर यांना असे वाटते की, येथील 'शंकर' ह्या शब्दाचा अर्थ शंकराचार्य असाही असू शकेल. खरे म्हणजे हे वर्णन पाशुपतव्रतानंतरच्या हरिनाथ आणि भगवान शंकर यांच्या भेटीचे वर्णन आहे. शंकराचार्यांचा येथे काही संबंध नाही. सगळ्याच संतचरित्रांत विद्वानांचे गर्व-हरण व चमत्कार कथा आढळतात. त्यातील कृष्ण पंडित हे वामन पंडित असावेत अगर शरण आलेला यवनराजा आदिलशहा असावा