पान:परिचय (Parichay).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४ । परिचय
 

व्यवस्था या उत्पादनव्यवस्थेने निर्माण केली असे म्हणता येणार नाही. ही व्यवस्था जातिव्यवस्थेच्या निर्मितीशी सहभागी राहिली. या दोन्ही गटांना समान असणारा मुद्दा म्हणजे उत्पादनव्यवस्थेत परिवर्तनाची शक्यता उपलब्ध झाल्याविना जातिव्यवस्था मोडता येणार नाही. समाजव्यवस्था आणि उत्पादनव्यवस्था यांचा परस्परांशी काहीच संबंध नसतो, असे प्रतिपादन करणाऱ्यांनाच फक्त जातिव्यवस्थेविरुद्ध बंड न केल्याबद्दल ज्ञानेश्वरांना दोषी ठरविता येते.
 आपल्या परंपरेत अशा थोर विभूती आहेत की, ज्यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध बंड केले असा समज आहे. जे समाजाबाहेर निवृत्त जीवन जगू इच्छीत होते त्यांना आपल्या 'निवृत्तांच्या कुटुंबात' जातिभेद मानणार नाही असे म्हणता येत होते. परमार्थाच्या उपासनेत जातिभेद प्रमाण नाही असे म्हणणारा भक्तिमार्गीयांचा मेळावा होता. जातिभेद प्रमाण न मानणारे तंत्रवादी होते. या सर्वांची यादी पुरेशी मोठी आहे. यांपैकी कुणीही व्यावहारिक जीवनात जातिनिष्ठ समाजरचनेविरुद्ध बंड करणारा नव्हे असे गाडगीळांना म्हणावयाचे आहे. जातिव्यवस्थेविरुद्ध बंड भारतात १९ व्या शतकापूर्वी शक्यच नव्हते, म्हणून ते बंड अमुकाने केले हा खोटा आग्रह आपण सोडला पाहिजे व अमुकाने ते बंड केले नाही म्हणून तो दोषी, ही भूमिकाही आपण सोडली पाहिजे. आमच्या सगळ्या जाहीर सभांतील व्याख्यात्यांना हा मुद्दा अडचणीचा आहे, कटू वाटणारा आहे.
 जर समाजपरिवर्तन, जातिभेद मोडणे हे श्री ज्ञानेश्वरांचे वैशिष्टय नसेलच तर मग ज्ञानेश्वरांचे अपूर्व मोठेपण आणि अलौकिकत्व आहे तरी कोणत्या भूमिकेत ? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधताना गाडगीळ वैदिक यज्ञ, तंत्रमार्ग आणि भक्तिपरंपरा ह्यांकडे वळलेले आहेत.

 वैदिक यज्ञाचे स्वरूप काय ? असा हा प्रश्न आहे. यज्ञ केल्याने देव तृप्त होतात आणि तृप्त झालेले देव माणसाच्या इच्छा पूर्ण करतात म्हणून यज्ञ हे देवतांना प्रसन्न करण्याचे साधन आहे का ? यज्ञाचे हे भक्तिमार्गी स्पष्टीकरण आहे. फल देणारा, शिक्षा देणारा, इच्छा पूर्ण करणारा, देव. यज्ञाने देव तृप्त होतात, पण यज्ञापेक्षा भक्तीने देव अधिक प्रसन्न होतो व लौकर प्रसन्न होतो म्हणून भक्तिमार्ग श्रेयस्कर. या मांडणीत फलदाता ईश्वर आहे. जर यज्ञकल्पनेचे हे स्पष्टीकरण बरोबर असेल तर वैदिक यज्ञाचे पुढचे रूप पौराणिक यज्ञ व भक्तिमार्ग असे ठरेल. श्री ज्ञानेश्वरादी संत असोत की त्या आधीचे इतर कुणी संत असोत, वैदिक संस्कृतीचाच हा विकास आहे अशी तर्कतीर्थांची प्रसिद्ध भूमिका आहे. डॉ. शं. दा. पेंडसे आणि तर्कतीर्थ यांची भूमिका तपशिलात भिन्न आहे; पण मूलतः ती भूमिका एकच आहे. म्हणूनच यज्ञाचे स्वरूप काय, हा प्रश्न निर्माण होतो. यज्ञात फल देणारा कोण, हा प्रश्न निर्माण होतो.