पान:परिचय (Parichay).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वरप्रणीत भक्तियोग । १५
 

 पूर्वमीमांसेच्या आचार्यांचे म्हणणे याबाबत स्पष्ट आहे. त्यांचे म्हणणे असे की, यज्ञ फल देतो. हे सामर्थ्य त्या विधीच्या क्रियेत आणि मंत्रात आहे. इथे देवांचा काही संबंध नाही. पूर्वमीमांसक वेद अनादि मानतात. त्यांचा कर्ता देव नव्हे. जग अनादि मानतात. त्याचा कर्ता देव नव्हे. आणि यज्ञाचे फल देणारे मंत्र व विधी आहेत, देव नव्हे. या चौकटीत देवांना स्थानच कोणते असणार? पूर्वमीमांसकांची भूमिका आहे ती ही आहे. पण तो वादाचा विषय नाही. कुमारिलभट्टांनी देवाला थोडेफार महत्त्व दिले. तरीही या दर्शनात देव फार गौण आहे. वादाचा प्रश्न हा आहे की, ऋग्वेद रचणाऱ्या ऋषींची भूमिका कोणती आहे ? त्यांच्या मागण्या पाहिल्या तर अन्न आणि पशुधन फार तर शत्रुनाश इथपर्यंत मर्यादित आहेत. ब्रह्म शब्दाचा प्राचीन निघंटूत नोंदविलेला अर्थ अन्न हाच आहे. देव यज्ञावर अवलंबून आहेत. यज्ञ नसेल तर देवांची फार उपासमार होते. देवांना सामर्थ्य यज्ञामुळे येते. या देवांना देवत्व किंबहुना माणसांनाही देवत्व यज्ञामुळे येते ही वेदकर्त्याची भूमिका आहे. यज्ञविधीचे हे महत्त्व ध्यानात घेऊनच मंत्रांना ' कामवर्षा' असे म्हणतात.
 डॉ. गाडगीळांचे म्हणणे असे आहे की, यज्ञ हा वैदिक आर्यांचा प्राचीन यातुविधी आहे. हीच भूमिका पूर्वमीमांसेत गृहीत आहे. हे सूत्र जर आपण मान्य केले तर त्याचा अर्थ हा आहे की, वैदिक यज्ञातून भक्तिमार्गाचा उदय होऊ शकत नाही. मला स्वतःला गाडगीळांची ही भूमिका बरोबर वाटते.

 पण अडचणींचा यामुळे परिहार होत नाही. हा अडचणींचा प्रारंभ आहे. कारण वैदिक वाङमयातच भिन्न भिन्न नावांनी ओळखला जाणारा देव एकच आहे, ही कल्पना येते. वरुणाकडून पापनाशाची अपेक्षा नोंदविली जाते. या कल्पना ऋग्वेदाच्या पहिल्या अगर दहाव्या मंडलातील आहेत हे जरी मान्य केले तरी त्या आहेत मात्र वेदांतीलच. देवतांना शरण जाण्याची कल्पना, इंद्राला स्तुती करून प्रसन्न करून घेण्याची कल्पना, पुन्हा वेदांतच येते. ‘मंत्रब्राह्मणयोर्वेदान' अशी ऐसपैस व्याख्या मान्य केली तर मोक्ष, ब्रह्म, देवाचे सामर्थ्य, देवाने जग निर्माण करणे, या साऱ्या कल्पना वैदिक वाङमयातून काढून दाखविता येतात. श्री. वेलणकर, श्री. पेंडसे, श्री. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि पाश्चिमात्यांपैकी मॅकडोनेल आदींचा भर या वचनांच्यावर असतो. गाडगीळांप्रमाणे वैदिक यज्ञ म्हणजे प्राचीन आर्यांचा यातुविधी असे स्पष्टीकरण न करता वैदिकांच्या भूमिकेचे दोन टप्पे मानणे अधिक योग्य आहे, असे मला वाटते. वैदिकांचा आद्यकाल पाऊस, अन्न, पशू , शत्रुनाश यांसाठी यातुविधीचा आहे. त्याचाच उत्तरकाल अवैदिकांच्या प्रभावाखाली एकेश्वरवादाकडे जाण्याचा आहे. भक्तिमार्गाचा सांधा, असल्यास या उत्तर वैदिक काळाशी असू शकतो. वैदिक काळानंतर शेकडो वर्षांनी प्रभावी झालेल्या भक्तिमार्गाचा मूळ वैदिक यातुविधीशी संबंध जोडता येत नाही.