पान:परिचय (Parichay).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वरप्रणीत भक्तियोग । १३
 

पहिली गिरणी आणि रेल्वे या बाबी तर १९ व्या शतकाच्या मध्यावर येतात. सरंजामशाही कालबाह्य होण्याची वेळच भारतात या वेळी येते. या काळाच्या पूर्वी राजेशाही, सरंजामशाही यांखेरीज दुसरा पर्यायच जर उपलब्ध नव्हता तर ज्या काळात समाजात दुसरा पर्यायच उपलब्ध नाही त्या काळात जनतेला गुलाम करणारे आणि जनतेच्या स्वातंत्र्याचे प्रतिनिधी असणारे दोघांनाही राज्य निर्माण करण्याविना व राजे होण्याविना पर्यायच नसतो हे आपण समजून घेतले पाहिजे.
 जे शिवाजी महाराजांना लागू आहे तेच ज्ञानेश्वरांनाही लागू आहे. जातिव्यवस्थेवर आधारलेली समाजरचना ही नुसती सामाजिक रचना नाही. ती अर्थव्यवस्था आणि उत्पादनव्यवस्था यांच्याशी जोडलेली घटना आहे. उत्पादनव्यवस्थेचा नवा पर्याय उपलब्ध होईपावेतो जातिभेद मोडण्याच्या आंदोलनाला आरंभच होऊ शकत नव्हता. म्हणून ज्ञानेश्वरांनी जातिव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले नाही, हा आक्षेप घेणेच मुळी अनैतिहासिक आहे असे डॉ. गाडगीळांचे म्हणणे आहे. श्री. पां. वा. गाडगीळांनी या ग्रंथाचे परीक्षण करताना व श्री. तर्कतीर्थांनी प्रस्तावनेत, प्रा. गं. बा. सरदारांनी ग्रंथप्रकाशनाच्या वेळच्या भाषणात, हा मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने उपस्थित केलेला आहे.
 या प्रश्नाची चर्चा करताना मराठीचे अभ्यासक काहीशा दुहेरीपणाने वागतात की काय याची मला शंका आहे. नामदेव आणि तुकाराम यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध बंड केले नाही, व्यावहारिक जीवनात त्यांनी ती मान्य केली यावर ते आक्षेप घेत नाहीत. ज्ञानेश्वर-एकनाथांनी जातिव्यवस्थेविरुद्ध बंड केले नाही हा मात्र आक्षेप घेतला जातो. आता पर्याय अनेक आहेत. जातिव्यवस्था मान्य करणाऱ्या ज्ञानेश्वरांचे फाजील लाड-कौतुक नको, हा एक पर्याय ; सगळे वारकरी संत जातिव्यवथा मान्य करणारेच आहेत म्हणून कुणाचेच कौतुक नको हा दुसरा पर्याय ; असे दोनच पर्याय उपलब्ध नाहीत. पर्याय अनेक आहेत. त्यांपैकी एक ज्ञानेश्वरांनाच जातिव्यवस्थेविरुद्धचा बंडखोर ठरविण्याचा आहे. कुणाला तरी वेठीला धरून तो वर्णव्यवस्था व जातिव्यवस्था मोडणारा क्रांतिकारक ठरविण्याचा आहे.
 या सगळ्या चर्चेत विसरला जाणारा मुद्दा असा आहे :
 चर्चेत जी वर्णव्यवस्था म्हणून असते पण व्यवहारामध्ये जी जातिव्यवस्था म्हणून बळकटपणे उभी असते ती समाजरचना एक सुटी रचना आहे, की तिचा उत्पादनव्यवस्था व अर्थव्यवस्थेशी संबंध आहे ? जे कर्मठ मार्क्सवादी आहेत त्यांनी हे म्हणायला हवे की, उत्पादनव्यवस्थेने समाजरचनेचे रूप धारण केलेले आहे (हे त्यांनी म्हणायला हवे, म्हणतीलच असे नव्हे). संयमित मार्क्सवादी मंडळी असे म्हणणार की, जातिव्यवस्था टिकून राहणे, बळकट होणे आणि तिच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणावर बंड न होणे यांचे कारण उत्पादनव्यवस्था हे आहे, मात्र जाति-