पान:परिचय (Parichay).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
छत्रपती शिवाजी महाराज । १०७

 अशीच दृष्टिकोणात दुसरी गंभीर चूक जयसिंगाच्या प्रकरणी झाली आहे, पृष्ठ १२७ वर ते म्हणतात, 'शिवाजीचे शौर्य मोगलांना प्रत्यक्ष दिसले तेव्हा अधिक प्राणहानी होऊ देण्यात अर्थ नाही, असे समजून जयसिंग तहाला तयार झाला. याच पृष्ठावर पुढे ते म्हणतात, " एवढा मोठा विजय केवळ दोन-तीन महिन्यांच्या आत झपाट्याने मिळविल्यानंतर जयसिंग शिवाजीला तहाच्या सोप्या अटी देणे शक्य नव्हते. शेवटी काळे यांचे काय मत आहे ? जयसिंगाने आपल्या कर्तृत्वाने शिवाजीच्या २० वर्षांच्या उद्योगावर पाणी फिरविले हे, की जयसिंगाला शिवाजी जिंकणे अवघड आहे हे ? तहाच्या अटी पाहता जयसिंगाने शिवाजी संपविला होता असे म्हणणे भाग आहे. मग जयसिंगाने तह का केला? औरंगजेबाने तरी अशा तहाला मान्यता का दिली? याचे स्पष्ट कारण म्हणजे दक्षिण जिंकण्याला पराक्रमी व माहीतगार सेनानी मिळविण्यासाठी, शिवाजीने अनेकवार सर्व दक्षिण जिंकून देण्याचे आश्वासन दिलेले आहे हे विसरता येणार नाही. काळे यांना पृ. १३० वर हे ध्यानात आलेले दिसते. तरी पृ. १३१ वर काळे म्हणतात, 'जयसिंगाची या स्वारीतील वागणूक निर्दयपणाची झाली. जयसिंग मराठ्यांचा उठाव हरप्रयत्नाने मोडून टाकण्यासाठी आला होता. मोगलांच्या कारस्थानी राजकारणात मुरलेला तो अजिंक्य योद्धा होता. शाइस्तेखानाची बोटे तोडल्यानंतर जयसिंगाकडून दयेच्या अपेक्षेत अर्थ नव्हता. शक्य तर शिवाजीस शरण आणणे, नसेल तर युद्धात ठार करणे, तेही न जमल्यास शिवाजीवर मारेकरी घालणे, हे सर्व मनाशी योजून जयसिंग हालचाल करीत होता. त्याबद्दल त्याला दोष देण्यात अर्थ नाही.' त्या वेळच्या रजपूताची काय ही अवनती अशी हळहळ व्यक्त करणे हास्यास्पद आहे. असा शिवाजीचे कार्य निकालात काढणारा शिवाजीशी तह जयसिंगाच्या कल्पनेतून साकार झाला. आग्रा भेटीच्या निमित्ताने शिवाजीला दक्षिणेत गैरहजर करणे या कल्पनेचा व शिवाजी आग्ऱ्यात अडकवला जावा, दक्षिणेकडे परत येऊ दिला जाऊ नये या कल्पनेचा जनकही स्वत: मिर्झा राजा जयसिंग. असा हा सामदामभेददंडपटू व औरंगजेबाचा विश्वासू सरदार. त्याच्या हमीवर विश्वास ठेवून शिवाजी आगऱ्यास गेला. हे पृ. १३८ वरचे मत फक्त मौजेचे म्हणता येईल. आणि दुसरे मौजेचे मत म्हणजे शिवाजीला मोगलदरबाराची अंतःस्थिती प्रत्यक्ष पाहून घ्यावीशी वाटली असेल हे मत. शिवाजी आगऱ्याला गेला कारण जाणे भाग होते. ही साधी वस्तुस्थिती काळे यांना सरळ मान्य करावीशी वाटत नाही. पुरंदरचा तह, मिर्झा राजा जयसिंग व शिवाजीची आग्रा भेट या प्रकरणी काळे यांची मीमांसा चाचपडत जात आहे. सत्याचे सर्व कण त्यांना ज्ञात आहेत, हे पृ. १३६ व १४३ वाचताना कळते. पण या दुव्यांची संगती त्यांना नीट जोडता आली नाही. शिवाजी औरंगजेबाला भेटला १२ मे १६६६ या दिवशी. या दरबार भेटीत त्याचा खटका उडाला. पण २९ मे पर्यंत त्याच्यावर