पान:परिचय (Parichay).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८ । परिचय
 

पहारे बसविण्यात आले नव्हते. मधले सतरा दिवस औरंगजेबाने शिवाजीला कैद का केले नाही याचे उत्तर फक्त एक आहे. तो जयसिंगाच्या पत्राची वाट पाहत होता. शिवाजी २९ मे ते १७ ऑगस्ट कैदेत होता. पण संभाजी दरबारात जात-येत होता. विविध प्रकारे संभाजीवर ‘कृपेचा वर्षाव' चालू होता. याचे कारण फक्त एक की, औरंगजेबाच्या मते दक्षिण दिग्विजयाचे जयसिंगाचे काम संपल्यावर शिवाजीला दक्षिणेत परत पाठविणे शक्य होईल. आलमगीर-नामा म्हणतो, 'पण त्याचा मुलगा संभाजी बादशाही हुकुमाप्रमाणे रामसिंगबरोबर कुर्निस करावयास जाई. त्यावर मात्र बादशाही कृपा होई...बादशाहाने राजाचे हे म्हणणे मान्य करून त्यावर कृपा केली. व फौलादखानाला हुकूम झाला की, त्याच्या घरावर बसविलेला पहारा उठवावा...हेतू हा की, त्यावरही कुर्निस करण्याची काही दिवसांनंतर कृपा व्हावी. व तऱ्हेतऱ्हेचे प्रसाद देऊन निरोप घ्यावा.' (भा. इ. सं त्रै. वर्ष २० अंक ३, पृ. ४०) औरंगजेबाचा सूर यावरून कळू शकेल.
 संभाजीच्या बाबतीतही काळे यांची अशीच गफलत झाली आहे. शिवाजीच्या राज्याभिषेक प्रसंगी संभाजी युवराज म्हणून घोषित झाला होता. त्या आधी १६७१ पासून जिजाबाईच्या ऐवजी संभाजीने मराठी राज्याचा कारभार पाहण्यास आरंभ केला होता. तेव्हापासून १६७८ पर्यंत संभाजी राज्यकारभार पाहत होताच. १६७८ ला कर्नाटक मोहिमेच्या वेळी शिवाजीने कारभार मंत्रिमंडळाच्या हवाली केला व संभाजीस शृंगारपुरास राहावयास सांगितले, यामुळे संभाजी रुसला व मोगलांच्याकडे गेला. १६८० साली आरंभीच संभाजी परतला. शिवाजीने त्याला पन्हाळा, दाभोळ याचा सरसुभा नेमले. ही सारी हकीकत काळे यांच्या कानावर होती. बेंद्रे यांच्या ग्रंथातील प्रतिपाद्य विषय काळे यांना ज्ञात असावयास हरकत नव्हती. तरीही तीन बाबी त्यांनी नोंदविल्या आहेतच. (१) शिवाजीची इच्छा राज्याचे दोन तुकडे करावे. पैकी कर्नाटकाचा भाग संभाजीस द्यावा व महाराष्ट्राचा भाग राजारामास द्यावा अशी होती. (२) संभाजीने शृंगारपुरास असताना तरुणपणीचा काही वाह्यातपणा केला होता. (पृ. २२१) (३) महाराजांना आपल्या मृत्यूनंतर होणारी दुर्दिनाची कल्पना आली असली पाहिजे. या तिन्ही बाबी निराधार आहेत. काळे यांना आवडणाऱ्या शंभर टक्के विश्वसनीय पुराव्यांनी यांतील एकही बाब सिद्ध होत नाही. मोगलांच्या फौजा महाराष्ट्राच्या सीमेवर शिवाजीच्या अंतःकाळी जमू लागल्या होत्या. अल्पवयीन आठ-नऊ वर्षांच्या दुबळ्या राजारामाला महाराष्ट्राचे राज्य आणि मुलकी कारभार व लष्कर यांचा अनुभव असणाऱ्या, फौजा अनुकूल असणाऱ्या संभाजीला तुलनेने बिनधोक असणारे कर्नाटकचे राज्य ही वाटणी शिवाजी कशी सुचवील? आपल्या मत्यूनंतर संभाजी आणि मंत्रिमंडळ यांत संघर्ष येईल अशी कल्पना शिवाजीच्या मनात कदाचित आली असेल. पण संभाजी