पान:परिचय (Parichay).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६ । परिचय
 

याचा उल्लेख केलेला आहे. तरीसुद्धा १६४५ साली, आल्यापासून अवघ्या तीन वर्षांत शिवाजीने हिंदवी स्वराज्याची उभारणी करण्याचा घाट घातला आहे. हे सर्व पाहत असताना स्वराज्यस्थापनेची पूर्वतयारी शहाजीच्या डोक्यातून बाहेर पडली असावी हे मानावे लागते. कर्नाटकात शहाजीने शेवटपर्यंत स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा उद्योग मधूनमधून केला हे मानावयास जागा आहे. पण काळे यांना शहाजीचे हे कर्तत्व स्पष्टपणे दिसलेले आढळत नाही. मधूनमधून शहाजीचा अधिक्षेप करणारी वाक्ये या पुस्तकात विखुरलेली आहेत. स्वराज्याची कल्पना मनात आणणारा, पूर्वतयारी करणारा आणि निदान इ. स. १६५५ पर्यंत शिवाजीच्या पाठीशी असणारा कर्तृत्ववान बाप या दृष्टीने काळे यांचा अधिक्षेप अन्यायकारक तर आहेच; पण मुख्य म्हणजे तो ऐतिहासिक पुराव्याच्या विरोधी आहे. पृष्ठ२२ वर काळे म्हणतात,"आपला कर्तृत्ववान बाप जिथे थांबला त्याच्यापुढे जाण्याचा विचार शिवाजीच्या मनात आकार घेऊ लागला होता. आपला बाप परके राज्य टिकवण्यासाठी झटला, आपण स्वतःचे राज्य उभारू, असा विचार बालशिवाजीच्या मनात आला असेल." इ. स. १६७० पर्यंत शिवाजी निदान बाह्यतः स्वतःला मोगलांचे मांडलिक मानण्यास तयार होता. आणि अंतरंगाच्या दृष्टीने पाहिले तर शहाजीने जन्मभर दोन स्वतंत्र राज्ये आकाराला आणण्याचा घाट घातला. बाप जिथे येऊन थांबला' ह्या म्हणण्यास अर्थ नाही, कारण शहाजीचे उद्योग थांवले होते असे म्हणण्यास जागा नाही. उलट शिवाजीच्या अंगी पुरेशी समज येण्याच्या आधी व त्याचे कर्तृत्व उजाडण्याच्या आधी त्याचा शिक्का सुरू झाला होता, असे मानण्यास मात्र जागा आहे. पृष्ठ ३३ वर काळे म्हणतात, 'यापुढे बापाच्या जहागिरीच्या राज्याबरोबर आपल्या नळयाची यात्रा पुरे असे शिवाजीच्या हितचिंतकांना वाटले असावे." काळे यांना शहाजीचा अधिकार १६५५ पर्यंत कमीत-कमी चालू होता हे मान्य आहे. १६५३ साली शिवाजी स्वत:ला नरपती म्हणवून घेताना व मंत्र्यांचे शिक्के सनदांवर नोंदविताना दिसतो हेही त्यांना मान्य आहे. पण मंत्रिमंडळाच्या उभारणीचे श्रेय, स्वराज्याच्या संकल्पाचे श्रेय शहाजीच्या पदरी बांधण्याची मात्र त्यांची इच्छा नाही. पृष्ठ ५० वर ते म्हणतात, 'वयपरत्वे शहाजी सुखासीन व ऐदी बनत चालला होता, असे घडले असेल काय ? नसेल कुणी म्हणावे.' पृष्ठ ११५ वर ते म्हणतात, 'शहाजी राजे आदिलशाहीत केवळ निर्माल्य होऊन राहिले होते असे म्हणता येणार नाही; पण शिवाजीला त्यांनी नक्की कोणत्या प्रकारे मदत केली हे सांगता येत नाही.' पृष्ठ ११६ वर पुन्हा तेच म्हणतात, 'शहाजीच्या पराक्रमामुळे तंजावरचे राज्य स्थापन करणे व्यंकोजीला शक्य झाले.' असा हा धरसोडीचा प्रकार आहे. उपलब्ध साधनसाहित्याच्या प्रकाशात शहाजीचे कर्तृत्व व शिवाजीवर त्यांचे ऋण अधिक स्पष्ट व सुसंगत रेखाटता आले असते, असे म्हटल्याशिवाय राहवत नाही.