पान:परिचय (Parichay).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१० । परिचय

शवरांचे तत्त्वज्ञान या तीन ग्रंथांतून मिळून जो विषय मांडला आहे, तो विषय त्याहीपेक्षा व्यापक व अनेकपदरी पुरावा विचारात धेऊन डॉ. गाडगीळ मांडीत आहेत.
 जे सर्व तपशीलानीशी मांडले तर हजार पानेही पुरणार नाहीत ते सारे विवेचन साडेचारशे पानांत आटोपावयाचे ठरल्यावर ज्या समस्या उभ्या राहतात त्या सवे गाडगीळांच्या समोर आहेत. वैदिक यज्ञाचे स्वरूप काय हा स्वतंत्र प्रबंधाचा विषय आहे. मध्ययुगीन तंत्रसाधना आणि भारतभर पसरलेला मध्य- युगीन भक्तिमार्ग हे अजून दोन स्वतंत्र प्रबंध आहेत. ज्ञानेश्वरांचा भक्तिमार्ग हा पुन्हा वेगळा विषय आहे. यांतील प्रत्येक विभागावर पाचशे पाने लिहिता येतील व त्यातून उपपन्न होणार्‍या उपविभागांवर पुन्हा चार-दोन पुस्तके लिहिता येतील. एवढी अवाढव्य तयारी करून मग गाडगीळ ' हे सारे एका ग्रंथात आणावयाचे कसे ?' यामुळे हैराण झालेले पाहण्यास एक साक्षीदार म्हणून मी होतोच. एवढा प्रचंड व्याप व खोली असणारा हा प्रबंध काळजीपूर्वक विचारात घेणे भाग आहे असे मी मानतो.
 थोडक्यात गाडगीळांचे म्हणणे असे आहे की, वैदिक आर्यांचे जीवन यज्ञ- प्रधान आहे. आणि यज्ञ ही अशी बाब आहे की, तिच्या पोटातून एकेश्‍वरवाद व भक्तिमार्ग दोन्ही उदयाला येऊ शकत नाहीत. हे प्रतिपादन म्हणजे डॉ. पेंडसे आणि त्यांच्यासह वेलणकर आदी इतर अनेकानेक विद्वानांच्या प्रबंधाचे खंडन आणि मॅक्‍्डोनेल व कीथ यांच्या विरोधी विंटरनिट्झ व ओल्डेनबर्गे यांचे निराळया आधारभूमीवर मंडन आहे. तकंतीर्थ जोशी यांना मुळीच मान्य नसणारा हा भाग आहे. डॉक्टर गाडगीळांचे दुसरे म्हणणे असे की, अवैदिक श्रद्धा व विधी यांची एक वाढ भक्तिमार्गात होते व दुसरी वाढ म्हणा, विकृती म्हणा, तंत्रमार्गात होते. हे विवेचन भक्तिमार्गावर लिखाण करणाऱ्या बहुतेकांच्या विरुद्ध जाते. तंत्रमार्गा- वरील लेखन नीडहॅम व देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या दिशेने आणि बुड्राफ व इतर यांच्या विरोधी जाते. या विवेचनात फ्रेझर, ब्रीफॉ, थॉमसन्‌ हे गाडगीळांचे प्रमुख आधार आहेत. गाडगीळांचे तिसरे म्हणणे असे की, सामाजिक ऱ्हासाच्या या काळात भारतभरच्या सर्वसामान्य भकक्‍तिमार्गापेक्षा निराळी भूमिका घेणारा ज्ञानेश्‍वर हा सामाजिक उन्नयनाचा प्रतिनिधी आहे. गाडगीळांच्या प्रतिपादनातील प्रत्येक भूमिका महत्त्वाची आणि मूलभूत प्रश्‍नाशी जाऊन भिडणारी अशी तर आहेच; पण प्रत्येक भूमिका पुरेशी विवाद्यही आहे. मराठीपुरते वोलायचे तर डॉ. पेंडसे आणि डॉ. गाडगीळ हे दोघे परस्परविरोधी दोन भूमिकांचे प्रमुख नेते म्हणावयाला हवेत.
 ज्या क्षेत्रात गाडगीळ विवेचन करीत आहेत त्या क्षेत्रातील प्रत्येक भूमिका