पान:परिचय (Parichay).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१. वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्रसाधना आणि

ज्ञानेश्वरप्रणीत भक्तियोग


माझे मित्र डॉ. सदाशिव रामचंद्र गाडगीळ यांचा 'वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वरप्रणीत. भक्तियोग' या लांबलचक नावाचा प्रबंध प्रकाशित झालेला आहे. प्रबंध मार्च १९७९ मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथप्रकाशन समारंभाच्या वेळी अध्यक्ष म्हणून व त्याआधी प्रस्तावनाकार म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वैदिक यज्ञाच्या संदर्भात गाडगीळांच्या विरोधी भूमिका अतिशय रेखीवपणे मांडली. मी स्वतःही एक वक्ता होतो. गाडगीळांच्या प्रतिपादनाची कठोर व चौरस चिकित्सा होणे फार आवश्यक आहे, असा माझा सूर होता; पण या प्रबंधावर ज्या प्रकारची चर्चा व्हावी अशी अपेक्षा होती तशी चर्चा झालेली नाही.
सामान्यपणे एक तरुण एम. ए., तीन-चार वर्षे अभ्यास करून डॉक्टरेटचा

प्रबंध सादर करतो व तोही चांगला असू शकतो; पण त्या प्रकारचा हा प्रबंध नाही. दहा-पंधरा वर्षे वाचन-चिंतन झाल्यावर लेखक या निर्णयास येतो की, अमुक विषयात अधिक खोल या शिरले पाहिजे. कारण सांगण्याजोगे महत्त्वाचे असे इथे आहे व त्यानंतर पुन्हा दहा-पंधरा वर्षे अभ्यास, चिंतनात घालवून मग प्रबंध लिहिला जातो. अशा प्रबंधाचे स्वरूपच निराळे असते. तरुणांनी आपल्या पहिल्या अभ्यासाचे फळ समोर ठेवणे आणि परिणत- प्रज्ञाने जन्मभरच्या अभ्यास व्यासंगाचे फळ समोर ठेवणे यांत फरकच असणार. गाडगीळांचा प्रबंध हा असा दीर्घ चिंतनाचा परिपाक आहे.
खरे म्हणजे हा एक प्रबंध नसून तो चार प्रबंधांचा समूह आहे. डॉ. शं. दा. पेंडसे यांनी, वैदिक भागवतधर्म, पौराणिक भागवतधर्म आणि ज्ञाने-