पान:परिचय (Parichay).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वरप्रणीत भक्तियोग । ११

विवाद्य आहे; तेव्हा गाडगीळांचे विवेचन विवाद्य आहे हे उघडच आहे. डॉ. गाडगीळांच्या विवेचनातील प्रत्येकच मत व विधान मला मान्य नाही. पण स्थूलमानाने त्यांचे विवेचन बरोबर आहे व दिशा संपूर्णपणे बरोबर आहे असे मला वाटते. पण माझ्या मते गाडगीळांचे म्हणणे बरोबर की चूक या प्रश्नाइतकाच महत्त्वाचा प्रश्न हे विवेचन विवाद्य का असावे हा आहे. सत्य असे आहे की, समोर असणारा पुरावा अतिशय संमिश्र स्वरूपाचा आहे. कोणत्या पुराव्याला किती महत्त्व द्यायचे हा पुन्हा विवाद्य प्रश्न आहे. भारतीय वाङमयापैकी उपलब्ध असणारे सर्वांत जुने वाङमय म्हणजे ऋग्वेद. पण ऋग्वेदात जे जे आहे ते सर्व वैदिक आर्यपरंपरेचे आहे असे म्हणणे धोक्याचे आहे. अवैदिक परंपरा आणि आर्येतर परंपरांचे अवशेष ऋग्वेदातच आहेत. ऋग्वेदातही जुना-नवा भाग आहे. पण त्यापेक्षा अडचणीची बाब अशी आहे की, ऋग्वेदातील शब्दांच्या अर्थाबद्दल आपणास निघंटू व निरुक्त यांच्यासह सायण प्रमाण मानावा लागतो. वेगळ्या पद्धतीने सांगावयाचे तर, इ. स. पू. २००० चा ऋग्वेद आणि इ. स. पू. ८०० चा यास्क इ. स. १४०० च्या सुमारास असणाऱ्या सायणाचार्यांसह एकत्र करावा लागतो. आणि इ. स. ५०० ते १००० मधील वाङमय उत्तरकालीन भूमिका नोंदविणारे आहे असे म्हणावे लागते. इ. स. ८०० च्या सुमारास पद्मपुराण जे सांगते ते उत्तरकालीन. आणि आधार मात्र इ. स. १४०० मधील सायणाचार्यांचा. एकदा कालानुक्रमातच ही विवाद्यता ग्रथित असली म्हणजे विवेचन विवाद्य होणारच.
 काही उत्तरकालीन पुरावा अधिक प्रमाण ठरल्याविना सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक अध्ययन व चिकित्सा अशक्य आहे. पण उत्तरकालीन पुरावा प्रमाण मानल्यावर परंपरावादालाही खूप वळ येते आणि मग विवाद्यता वाढते.
 डॉ. गाडगीळ यांनी वैदिक यज्ञाच्या स्पष्टीकरणात प्रामुख्याने ऋग्वेदातून आधार घेतलेले आहेत, पण असे आधार यजुर्वेद, अथर्ववेद यांतूनही विपुलपणे घेता येतात. शतपथ, ऐतरेय ब्राह्मणांतूनही घेता येतात. स्थूलपणे आपण असे म्हणू की, वैदिक यज्ञाचे स्वरूप काय याबाबत आधारभूत साधनसाहित्याचा काळ इ. स. पर्व २००० ते इ. स. पूर्व १००० असा आहे. आता या साहित्याकडे पाहणार कसे ? वैदिक यज्ञाचा विचार करावयाचा असेल तर तो पूर्वमीमांसेच्या आधारेच करावा लागणार. पूर्वमीमांसेचे म्हणणे काय याला आधार जरी तोंडाने आपण जैमिनीची सूत्र म्हणत असलो तरी खरा आधार शाबरभाष्य आणि कुमारिलभट्टांचे विवेचन हाच आहे. म्हणजे साधनसाहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्थूलमानाने इ. स. च्या सातव्या शतकातील घ्यावा लागतो. ह्यामुळे विवाद्यता वाढते हे तर खरेच आहे; पण जर ही सारी स्पष्टीकरणे व विवेचने आक्षेपार्ह ठरवावयाची तर मंडळींना पूर्वमीमांसा सोडून पुराणांचा व वेदान्ताचा आधार घ्यावा लागतो हेही खरे आहे.