पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या समित्यांवर असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करुन दिली. तालुक्यातील ५३ गावांमध्ये बालहक्क संरक्षण समित्यांचे फलक तयार करुन दिले. त्यावर सदस्यांची नावे लिहिली. त्यामुळे ग्रामस्थ आणि स्वत: सदस्य यांना त्यांच्यावरच्या जबाबदारीची जाणीव झाली. त्यांचे प्रशिक्षण घेण्यात आलं. कायद्याची माहिती दिलीच पण बालविवाह रोखण्यासाठी काय करायला हवं. याचीही माहिती दिली. गावात होणाऱ्या विवाहांना ही समितच कशी अंतिमतः उत्तरदायी आहे हे बजावलं. यातून दुर्दैवाने एखादा बालविवाह झालाच तर काय करायचं, याबद्दलही सांगितलं, त्यानंतर झालेल्या कौशल्य प्रशिक्षणात जशा अविवाहित मुली आल्या, तशा विवाहित, घटस्फोटित, विधवा अगदी लहान मूल आईकडे ठेवूनही आलेल्या किशोरी माताही होत्या. आता पालकही त्यांची चूक मान्य करुन मुलींच्या मागे ठामपणे उभे आहेत. या सगळ्या घडामोडींची शिरुरच्या न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायाधीशांनी बालविवाहाशी निगडित असलेल्या सगळ्या घटकांची एक बैठक बोलावली. ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, अशा सेविका, सरपंच, आरोग्य अधिकारी, पोलिस या सगळ्यांना बोलावून त्यांनी संबंधित गावात एखादा बालविवाह झाल्याचं समोर आलं तर त्यांना थेट जबाबदार धरलं जाईल असं बजावलं. शिरुरमधील एकूण आर्थिक, सामाजिक, परिस्थिती पाहता कायद्याचा बडगा उभारुन उपयोग नव्हता. त्यामुळे समुपदेशन, मुलींच्या शिक्षणासाठी मदत आणि आर्थिक स्वावलंबनासठी कौशल्य प्रशिक्षण या त्रिसुत्रीवर काम केलं. मुली बदलल्याच पण पालकही बदलले. मुली गाडी चालवतात, कम्प्युटरवर काम करतात, रुग्णालयात आत्मविश्वासाने रुग्णसेवा देतात आणि मुख्य म्हणजे चुकीच्या गोष्टींना नाही म्हणतात, हे खूप मोठे बदल होते, असे शैलाताई अभिमानाने सांगतात.
 शिरुरमध्ये वावरतात तो बदल प्रत्यक्ष दिसतो आहे, गावं बदलताहेत. आधी बालविवाह ही सामान्य गोष्ट होती. गावातल्या नेत मंडळींची नावं पत्रिकेत असायची. ही मंडळी लग्नात मिरवायची. आता अशा लग्नांबद्दल हे लोक सजग झाले आहेत. उलट असे विवाह गावात होणार नाहीत. याची दक्षता ते घेतात. आरोग्य विभागला, बालविकास विभागाला विनंती करुन विवाहीत किशोरी आढळल्या तर माहिती देण्याची, त्यांच्या योजनांमध्ये सहभागी करुन घेण्याची विनंती करण्यात आली. मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी यांच्याही कार्यशाळा झाल्या. गावांतले किराणा दुकानदार विवाह लावणारे पुरोहित, फोटोग्राफर, बँडवाले, मांडपवाले, आचारी, कापड दुकानदार अशा सगळ्यांना बालविवाह रोखण्याच्या कामांत