पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 साताऱ्यात प्रसिध्द समर्थ एकोकिका स्पर्धेत' ही एकांकिका उतरवायचं ठरवलं तेव्हा कैलास जरा साशंकच होता. पथनाट्य तुलनेतनं सोपं, त्याचा बाज वेगळा इथे मुली स्पर्धेत उतरुन रंगमंचावर किती टिकाव धरतील याबाबत शंका होती. तरीही प्रयोग करायचं ठरलं. शिरुरहून मुली साताऱ्यात दाखल झाल्या. त्यांना आधी नाट्यगृहात नेऊन नाटक नेमकं कसं असतं ते दाखवलं. मुली आयुष्यात पहिल्यांदाच नाटक बघत होत्या. रंगमंच, पडदा, माईक, लाइट हे सगळं त्यांना नवं होतं. एका महाविद्यालयाच्या रंगमंचावर त्यांची रंगीत तालीमही घेतली गेली. मुलींचा आत्मविश्वास वाढला. कैलासने त्यांना लाईट मंच्यावर वावर, उभे राहण्यासाठीच्या खुणा वगैरे तांत्रिक गोष्टी समजावल्या.
 प्रत्यक्ष प्रयोगाचा दिवस उजाडला. मुलींना थोडी धाकधूक वाटत होती. पण त्या रंगमंचावर गेल्या आणि तांत्रिक बाजूंचे दडपण न घेता त्यांनी भान हरपून एकांकिका सादर केली. प्रयोग संपला. सगळे प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवत होते. कितीतरी वेळ कडकडाट सुरु होता. आयुष्यात पहिल्यांदा रंगमंचावर जाऊन सादर केलेली एकांकिका स्पर्धेत जिंकली होती. मुलींनी स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं होत ! त्या प्रयोगानंतर अनेक संस्थांनी मुलींना निमंत्रण दिलं. मानधन देऊन प्रयोग झाले. या एकांकिकेत प्रमुख भूमिका करणारी सोनाली तर सातार परिसरात प्रसिध्द झाली ! एखाद्या अभिनेत्रीसारखं कौतुक तिच्या वाट्याला आलं. पथनाट्य, एकांकिका, लघुपट अशी वेगवेगळी माध्यमं कैलासने अत्यंत प्रयोगशील पध्दतीने वापरली. बदल घडवण्यासाठी तर ती महत्त्वाची ठरलीच पण ज्यांच्यासाठी हा प्रकल्प होता त्या मुलींनाच यात सहीगी करुन घेतल्याने याची परिणामकारकता कितीतरी पटीने वाढली.
 बदलाच्या वाटेवर संघर्ष असतोच पण त्याला जनजागरणाची जोड दिली तर घडणारे बदल हे व्यक्तीला आतून बदलवून टाकतात. कैलासच्या प्रयत्नांमधून शिरुरमध्ये नेमकं हेच घडलं. तिथल्या किशोरवयीन मुली बदलल्या आणि स्वत:च्या आयुष्याची लढाई समर्थपणे लढायला सक्षमही झाल्या ! एक कलावंत कार्यकर्ता म्हणून कैलासला समाधान आहे ते याचंच !