पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोठा घटक ठरला. तो पाहून अनेक गावांत पालकांनी मुलींची ठरलेली लग्न थांबवली. मुलींची लग्नं १८ वर्ष पूर्ण होण्याआधी ठरवली. यात आपली चूक झाल्याची कबुली अनेक पालकांनी जाहीरपणे दिली.
 प्रकल्पासाठी पथनाट्ये करायचं ठरलं होतं. त्यात स्थानिक मुलींनी काम करणं अपेक्षित होतं. पण मुलींनी कधीच पथनाट्य पाहिलंही नव्हतं. मग त्यात काम करणं वगैरे दूरची गोष्ट. म्हणून त्यांना प्रशिक्षण द्यायचं ठरवलं. प्रशिक्षण देण्यासाठी नाट्य क्षेत्रातल्या लोकांशी संपर्क करायचं ठरवलं पण त्यांनी सांगितलेले मानधनाचे आकडे आवाक्याबाहेरचे होते. मग कैलासने स्वत:च ती जबाबदारी अंगावर घेतली. त्याने तीन दिवस शिरुरमध्ये मुलींचे प्रशिक्षण शिबीर घेतले. यात मुलगेही होते. या प्रशिक्षणात अनेक वेगळे अनुभवही समोर आले. मुलं-मुली बोलणं टाळत. एकमेकांच्या शेजारी उभे राहत नसत. हातात हात घेऊन फेर धरणे वगैरे अशक्यच होते. गाण्याचा ठेका त्याना कळत नसे. अशा सगळ्या अडचणींवर मात करुन अखेर पहिलं पथनाट्य उभं राहिलं. त्याच नाव होते ‘लहान मुलींना नवरी नका समजू' औरंगाबादला आयुक्तांच्या कार्यालयात याचा प्रयोग झाला. मुलींचे कौतुक झालं ‘माझ्या शरीरावर माझा अधिकार' नाही म्हणायला शिका अशी आणखी पथनाट्येही बसवली. मुलांना हे माध्यम समजलं, त्याची ताकद समजली. प्रयोग होत गेले तसेच अधिक सफाईदारपणे त्यांनी ते पुढे नेलं. गावागावत प्रयोग झाले. गावकरी ते बघून इतके प्रभावित व्हायचे की मुलांना तिथल्या तिथे बक्षिसे देत खाऊ वाटत यानंतर मुलांनी कैलास सोबत नसताना स्वतंत्रपणे प्रयोग केले. बीडच्या प्रयोगानंतर प्रज्ञा आणि सारिका या मुलींचे अभिनय बघून प्रेक्षक हेलावले. मुलींच्या वृत्तवहिन्यांवर मुलाखती झाल्या.
 पथनाट्य करणाऱ्या मुलींना इतका आत्मविश्वास आला की मला शिकायचं आहे, स्वत:च्या पायावर उभी राहिल्याशिवाय लग्न करायचं नाही,' हे अनेकींनी घरात ठणकावून सांगितलं !
 त्यानंतर टप्पा होता एकांकिकेचा 'फाईव्ह डब्ल्यू वन एच' हे त्या एकांकिकेचं नाव. हे खरं तर आधी पथनाट्य होतं. त्याच प्रयोगही खूप गाजले. मुली त्यांचे स्वत:चेच प्रश्न मांडत होत्या. त्यामुळे त्या जीव ओतून काम करायच्या. एरव्ही शाळेत मान वर करुन न पाहणारी मुलगी पथनाट्यात घडाघडा बोलताना बघून शिक्षकही आश्चर्यचकित झाले. त्यात सोनीची भूमिका करणारी सोनाली बडे इतकी समरसून काम करायची की प्रयोग संपल्यावर तिच्याभोवती चक्क गर्दी व्हायची. मुली तिच्यात स्वत:ला पाहयच्या. याच पथनाट्याची नंतर एकांकिका झाली.