पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मुलींशी संपर्क करणंही असंच कठीण होतं. त्यांचे ही फोन नंबर सतत बदलत. कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी मुलींना तयार करणं हे मोठं आव्हान होतं. त्यासाठी सतत फोन करावे लागले. ब्यटी पार्लर, कम्प्युटरसारखे कोर्स मुलींनी सहज निवडले पण नर्सिंग, ड्रायव्हिंग, हॉटेल मॅनेजमेंट यांसारख्या कोर्सला मुलींशी खूप वेळा चर्चा करावी लागली. पण अखेर कौशल्य प्रशिक्षणही यशस्वी झालं. अनेक मुली त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम निवडून ते यशस्वीपणे पूर्ण करुन त्या अर्थार्जनही करु लागल्या आहेत.
 या प्रकल्पाल साताऱ्याहून शिरुरच्या अंतर्गत भागात संपर्क करायचे होते. वारंवार मीटिंग, अनेक कार्यक्रम मेळावे जनसुनावणी यासाठी रुपाताईंना न थकता पुनः पुन्हा संपर्क केला. मुलींचं आयुष्य बदलत गेलं आणि संपर्काची साखळी अखेर पूर्ण झाली.