Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




प्रस्तावना

नमस्कार,  दोन वर्षापूर्वी बीड जिल्ह्यात बालविवाहाच्या प्रश्नावर वार्तांकन करण्यासाठी फिरत होते. तेव्हा शिरुर कासार तालुक्यात अनेक गावांत गेले. तिथल्या मुली, महिला आणि पुरुषांशी बोलले. अधिकारी, डॉक्टर, शिक्षक, पोलिस, समाजसेवी संस्था, राजकीय नेते यांच्याशीही संवाद साधला.
 त्याच दरम्यान 'युएनएफपीए' सोबत 'लेक लाडकी अभियाना' चे काम या तालुक्यात सुरु होते. किशोरवयीन मुलींसाठी ते काम करत होते. ऊसतोड मजुरांच्या या तालुक्यात दुष्काळापासून सुरु होणारे अत्यंत गुंतागुंतीचे अर्थिक, सामाजिक प्रश्न मुळातून सोडविण्यासाठी त्यांनी सुरु केलेले प्रयत्न मला महत्त्वाचे वाटले. बालविवाहाच्या प्रश्नाला केवळ कायद्याची कडक अंमलबजावणी हेच उत्तर नाही तर समाजप्रबोधन हवं. त्याशिवाय मुलींचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, आत्मनिर्भरता यावरही काम करण्याची गरज ओळखून एकाच वेळी अनेक आघाड्यांवर त्यांच काम सुरु होते. या कामात अनेक अडचणी होत्या. स्थानिक लोक सोबत असले तरी अनंकाचे हितसंबंध अडकल्याने अडथळेही आणले जात होते. पण कशामुळेही अजिबात विचलित न होता काम सुरु राहिलं. अभियानाच्या कार्यकर्त्यांनी अनेक बालविवाह रोखले. योग्य प्रबोधन केल्यावर काही विवाह पालकांनी स्वत:च थांबवले. मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकली, गावापर्यंत एसटी बस नेण्यासाठीचे यशस्वी प्रयत्न, पडलेल्या शाळेच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा, शाळेची नवी इमारत असे शिक्षणासाठीचे प्रयत्न झाले. मुलींना आरोग्य प्रशिक्षण मिळालं. त्या स्वत:विषयी अधिक सजग झाल्या. आधीच्या बुजऱ्या मुली आणि नंतर वेगवेगळे उपक्रम, पथनाट्ये, एकांकिका यातून आत्मविश्वासाने निर्धास्तपणे व्यक्त होणाऱ्या मुली हा फरक मी स्वत: अनुभवला.
 सगळ्यात मोठी गोष्ट होती ती मुलींना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भरतेच्या वाटेवर घेऊन जाण्याची. मुलींना नर्सिंग, ब्यूटी पार्लर, ड्रायव्हिंग, संगणक प्रशिक्षण अशा कौशल्यांचे, छोट्या कालावधीचे, मोफत प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी राज्य सरकारच्या संस्थांना सहभागी करुन घेण्यात आलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मुलींना नोकऱ्या, रोजगार मिळतील यासाठी खास प्रयत्न करण्यात आले. मुली स्व:च्या पायावर उभ्या राहिल्या.