मुलींना स्वत:चं म्हणणं जनसुनवाई च्या माध्यमातून जगासमोर मांडता येण्याची ताकद देता आली. मुलींचे हे सगळे प्रश्न महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगासमोर मांडायचे ठरले. त्याप्रमाणे बालहक्क आयोगाने शिरुर कासार येथे यायचे कबूल कले. त्याप्रमोण प्रशासनातल्या सर्व संबंधित विभागांना निमंत्रित केले गेले. संपूर्ण तालुक्यामध्ये फार मोठी प्रक्रिया आम्ही पूर्ण केली. त्यातूनच एक सुंदर अशी माहिती तयार झाली. शिरुर तालुक्यातील सर्व वाडी वस्त्यांवर जाऊन मुलींचे असणारे प्रश्न, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि हे सगळे प्रश्न आयोगासमोर मांडले. आम्ही गूगल वरती शोधले तेव्हा आमच्या लक्षात आले की, देशातील ही पहिलीच जनसुनवाई आहे जिथे मुलींनी स्वत: पुढे येऊन आपले प्रश्न आयोगासमोर मांडले आणि पहिल्यांदाच अशा प्रकारची जनसुनवाई घेण्याचा आणि ते धाडस शिरुर कासार येथील किशोरी यांनी दाखवले, लेक लाडकी अभियानाला पुढाकार घेण्याचा मानही मिळाला याचा आनंद आहे.
हा सगळा प्रवास जिल्ह्याचा कमीपणा दाखवण्यासाठी नाही, तर मुलींचे बालविवाह थांबविणे, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता यावे आणि खऱ्या अर्थाने 'बेटी बचाव, बेटी पढाव' ही घोषणा न राहता मुलींच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडावा म्हणून हा सर्व प्रवास आम्ही आपणासमोर मांडतो आहे. हे पुस्तक केवळ ललित लिखाण नसून हे आमच्या सर्व प्रवासाचे अनुभव कथन आहे. महाराष्ट्र शासनाने मुलींचे बालविवाह थांबवणे आणि मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, महिला आयोग असेल अथवा आरोग्य विभाग असेल, या सर्व संबंधित विभागाने तालुक्यातील मुलींच्या प्रश्नांची नोंद घ्यावी. यासाठी हे पुस्तक आम्ही प्रसिध्द करीत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी म्हणजेच १४ एप्रिल रोजी हे पुस्तक प्रकाशित करताना आम्हाला आनंद आहे. ज्या बाबासाहेबांना हिंदू कोड बीलाच्या आग्रहाखातर स्त्रियांच्या हक्कासाठी एक पुरुष असुनही कायदामंत्री म्हणून राजीनामा दिला त्यांच्या जयंतीदिवशी स्त्रियांचे हक्काचे पुस्तक त्यांच्या आयुष्यात चांगली पहाट यावी त्यांनी विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावे म्हणून हा वेगळा दस्त ऐवज समाजासमोर मांडता आला याचा आनंद आहे.
अॅड. वर्षा देशपांडे