आर्थिक निर्भरता ही स्वातंत्र्याच्या मार्गावरचं पहिलं पाऊल असतं. या स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी घ्यायलाही मुली तयार होत आहेत. या बदलात ‘युएनएफपीए' सोबत अॅड. वर्षा देशपांडे आणि त्यांचे कार्यकर्ते, या प्रकल्पाच्या निमित्ताने अभियानाशी जोडलेले तज्ज्ञ मार्गदर्शक, प्रकल्पाची जबाबदारी वाहणारी स्थानिक माणसं, मुली, मुलींचे पालक असं एक मोठं कुटुंबच तयार झाल आहे.
एका मोठ्या बदलाची साक्षीदार होण्याची संधी मला वार्तांकनाच्या निमित्ताने मिळाली होती. या प्रकल्पात सहभागी असलेल्या काही प्रतिनिधिक व्यक्तींवर एक पुस्तिका करायची असं ठरलं. ती मी लिहावी, अशी सूचना वर्षाताईंनी केली तेव्हा 'हो' म्हणाले खरी, पण रोजच्या कार्यालयीन कामातून आणि अंगभूत आळसामुळे ते सतत लांबणीवर पडत होतं. वर्षाताई, शैलाताई चिकाटीने पाठपुरावा करत होत्या. अखेर मनावर घेऊन काम पूर्ण केलं. शिरुर कासारमधल्या या प्रयोगात सहभागी होऊन आयुष्य बदलून गेलेल्या मुलींविषयी, त्यांना प्रशिक्षण, प्रोत्साहन देणाऱ्या मार्गदर्शकांविषयी वाचून वाचकांना तिथल्या परिस्थितीविषयी जाणीव झाली आणि इतर ज्या मुलींना सक्षमीकरणाचं वारं न लागलेल्या अशा हजारे उमलत्या किशोरींसाठी काही करावं वाटलं तर ते या पुस्तिकेचे यश असेल.
प्रगती बाणखेले