पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असलेले. एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर कुठेही खासगी प्रैक्टिस केली असती तर भरपूर पैसा कमावता आला असता. पण त्यांनी सरकारी नोकरी स्वीकारली. शिरुरसारख्या दुष्काळी, ऊसतोड कामगारांच्या तालुक्यात सलग नऊ वर्षे काम करताना त्याना या परिसरातील गरिबी तर दिसलीच पण त्या अनुषंगाने येणारे सामाजिक प्रश्नही जाणवले. आजरपण जमेल तेवढे अंगावर काढणारे लोक अगदी नाईलाज झाला तर डॉक्टरकडे जातात. इतक्या उशिरा का आलात विचारले तर कर्ज काढून किंवा दावणीचे जनावर विकून त्यांनी पैसा उभा केलेला असतो. त्या महत्त्वाचा वेळ वाया गेलेला असतो. अशा लोकांसाठी आपले ज्ञान आणि सेवा देणं डॉक्टरांना गरजेचं वाटतं. याच जाणीवेतून त्यांनी शिरुरमध्ये शिक्षणसंस्था काढली आहे. आरोग्य क्षेत्राखेरीज इतर सामाजिक क्षेत्रांतही डॉक्टर सक्रिय आहेत. ही वाटचाल अशीच पुढे सुरु ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.