पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोकसंख्येनुसार गट तयार झाले. १२८ गटांमध्ये मुली विभागल्या गेल्या आशांचे प्रशिक्षण झाले आणि तालुक्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
 बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती आणि कायद्याचा बडगा अशा दोन्ही पातळ्यांवर काम करावे लागले. स्थानिक लोकांशी जुना संपर्क तर होताच. शिवाय बऱ्याच गावांमध्ये जवळचे,दूरचे नातेवाइकही होते. बालविवाह ठरल्याची कुणकुण लागताच गावातली आशा, एखादी मुलगी किंवा एखाद सजग व्यक्ती फोन करायची. मग मुलीच्या पालकांना नातेवाईकांना आधी प्रेमाने समजावणे, नंतर कायद्याचा धाक दाखवून जरा कठोरपणे सांगणे आणि तरीही नाही एकेले तर कायदेशीर कारवाई करणे अशा पातळ्यांवर काम सुरु होते. यात कधी कधी प्रचंड गोची व्हायची स्थानिक असल्याने १० - १५ च्या गटाने लोक थेट घरी यायचे. 'तुम्हाला इथले प्रश्न माहित आहेत, आम्हाला मुलींची लग्न का लावून द्यावी लागतात, याची कल्पना आहे, तरीही तुम्ही विरोध का करता?' असे म्हणत दबाव आणायचे. कधी बाचाबाची व्हायची. तरीही ऐकत नाही असे दिसलं की दमदाटीही व्हायची. अशा वेळी स्वत:साठी नाही पण कुटूंबासाठी भीती वाटायाची. काही वेळा तर रात्रीच्या वेळी घरावर दगड पडायचे. रात्र जागून काढावी लागायची. एकीकडे लोकांची समजूत काढणं, दुसरीकडे बालविवाह कसे चूकी आहेत हे पटवून देणे आणि तिसरीकडे मुलींना कौशल्य विकास कार्यक्रम उपलब्ध करुन देत शाळेत जाण्यासाठी सुरक्षित पर्याय देणं अशी तिहेरी लढाई होती. सिस्टर अभियानाच्या सोबत त्या परीक्षेत यशस्वी झाल्या. अभियानाच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात पालकांनी ठरवलेले ४० ते ४५ बालविवाह समुपदेशन, चर्चा या माध्यमातून थांबवले त्यासाठी पालकांना पुन्हापुन्हा भेटावं लागलं. स्थनिक नेत्यांना सांगून दबाव टाकावा लागला. प्रसंगी कायद्याचा दंडका हाती घ्यावा लागला. २० ते २५ बालविवाहांच्या प्रकरणांमध्ये अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करावा लागला. वेळप्रसंगी पोलिसांचीही मदत घ्यावी लागली.
 हे सगळे करताना कुठेही कटुता येणार नाही. असा त्यांचा प्रयत्न असायचा. अनेकदा ते प्रयत्न यशस्वी व्हायचे. कधी कधी लोकांचा वाईटपणा घ्यावा लागायाचा.
 या दरम्यान त्या एका राजकीय पक्षाशीही जोडलेल्या होत्या. पण अभिमानाच्या कामामुळे लोक दूर जातील असा आक्षेप घेत त्यांना पदावरून दूर केलं गेलं. मुलींच्या आयुश्याला सकारात्मक वळण देण्याचं समाधान मोठं होतं. त्यामुळे या गोष्टी त्यांनी फार मनावर घेतलेल्या नाहीत.