पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घरी आलेले असायचे. मुलामुलींची शाळा सुटलेली असायची. गावातलं । देऊळ किंवा ग्रामपंचायतीच्या जागेत बाबू फिल्म दाखवायचा. लोकांना ती आपल्या घरातली गोष्ट वाटायची. बायका, मुलींचे हुंदके ऐकू यायचे. फिल्म संपली की बाबू एक रजिस्टर फिरवायचा. त्यात लोकांकडून अभिप्राय लिहून घ्यायचा. लोक भरभरून लिहायचे. त्यातल्या आजीचं काम स्वत: वर्षा देशपांडे यांनी केलं आहे. ही आजी लोकांच्या खास पसंतीस उतरली होती. तिच्याबद्दल लोक हटकून लिहायचे.
 नंतर ‘दफ्तर' शिवाय बाबूने अभियानाचे आणखीही लघुपट दाखववले. तालुक्यातल्या सगळ्या शाळांध्येही बाबू गेला.प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील मुला-मुलींनाही लघुपट आवडले. मुलं त्यावर, त्यात मांडलेल्या प्रश्नांवर व्यक्त होऊ लागली. सुरुवातीला बाबू जेव्हा रिक्षा घेऊन गावात जायचा तेव्हा लोकांच्या मनात अनेक शंका असायच्या. लोक जरा संशयाने बघायचे, प्रश्न विचारायचे. लेक लाडकी अभियानाबद्दल. त्यांच्या कामाबद्दल त्यांना महिती हवी असायची. बाबू जमेल तेवढे त्यांना सांगायचा. काही गावांत उलट स्थितीही असायची. लोक आनंदाने स्वागत करायचे. काही गावात बाबू दोन वेळाही गेला. सुरुवातीला आपण करतोय ते योग्य काम आहे ना, लोकांचा विरोध असेल तर पुढे यातून खरेच काही साध्य होणार आहे का, असे प्रश्न बाबूलाही पडायचे. पण जसजसे काम वाढू लागले तसतसा मुलींचा प्रतिसाद वाढू लागला. बालविवाह ही आपल्या भागातली मोठी समस्या आहे. हे बाबूलाही मनापासून पटले आणि मग तोही केवळ रिक्षाचालक राहिला नाही तर अभियानाचा कार्यकर्ता झाला.
 केवळ लघुपट दाखवून बाबूचं काम संपलं नाही. शिरुर तालुक्याच्या अंतर्गत भागात वाहतुकीची सोय नीटशी नाही. अभियानाने जेव्हा वेगवेगळे कौशल्य अभ्यासक्रम सुरु केले. मुली त्यासाठी शिरुरला यायच्या कधी कधी त्यांची शेवटची बस निधून जायची मग बाबूची रिक्षा त्यांना घरापर्यंत सुरक्षित पोहोचवून यायची.
 अभियानातल्या मुलींनी बालविवाह आणि अन्य समस्यांविषयी पथनाट्ये बसवली होती. तालुक्यातल्या गावागावांत या मुली गेल्या. त्यांनी या पथनाट्याचे तिथे दणक्यात प्रयोग केले. या मुलींना घेऊन जाऊन पुन्हा सुरक्षित आणून पोहोचवण्यासाठी बाबूची रिक्षा सज्ज असायची.
 अभियानाच्या निमित्ताने तालुक्याच्या कानाकोपऱ्यात बाबू गेला. अगदी दूर्गम भागतल्या वाड्या वस्त्यांवरही त्याची रिक्षा पोहोचली. खड्ड्यांनी भरलेल्या त्या एकट्या रस्त्यावरुन रिक्षा चालवणं हि कसोटीच होती. पण