Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लग्न ठरली होती. त्यांनी घरी स्पष्ट सांगू टाकलं. आमचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही. हे बदल प्रियाला खूप महत्त्वाचे वाटतात.
 शिरुरचा अनुभव प्रियाला स्वत:ला खूप काही शिकवणारा ठरला. आपल्याच शहरापासून सात-आठ तासांच्या अंतरावर पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या राज्यात सर्रास बालविवाह होतात, हे भयंकर वास्तव तिच्या समोर आलं 'शाळेचे रस्ते ' इतके धोकादायक असू शकतात हे तिने शिरुरच्या वास्तव्यात प्रत्यक्ष अनुभवले. एकदा शाळेतून शेतातल्या वाटेने घरी जाणाऱ्या मुलीवर बलात्कार झाल्याची खबर आली तेव्हा शिरुरहून साताऱ्याकडे निघालेल्या वर्षाताई अर्ध्या रस्त्यातून परत आल्या आणि त्यांनी त्या मुलीला मदत केल्याचं ती सांगते.
 पार्लरचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना प्रमाणपत्र दिलं गेलं. यामुळे सरकारी योजनेतून कर्ज घेऊन त्या स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकतील काही जणीनी छोट्या प्रमाणात काम सुरुही केलं आहे. मुली पार्लरचं कौशल्य तर शिकल्याच. पण प्रत्यक्ष जगण्याच्या लढाईत स्वत:ला कसं तयार करायचं, याचे धडे त्यांना प्रियाच्या क्लासमधून मिळाले. शिरुरमधल्या मुलींच्या आत्मविश्वासपूर्ण आणि आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी थोडा हातभार लावला आला. याचं समाधान मोठं असल्याचं प्रिया सांगते.