पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होतं. तिथंच राहायची सोय होती. सामान टाकलं आणि कामाला सुरुवात झाली. मुलींना शिकवायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की मुली फक्त नावालाच अमुक एवढी इयत्ता शिक्षण झालं असे म्हणतात. प्रत्यक्षात अनेकींना साधी साधी वाक्येही लिहिता येत नाहीत. शाळांमध्ये त्या किती जात असतील. हे ध्यानात येत होतं. त्यामुळे मुलींना ब्युटी पार्लर सोबत आणखीही बरेच धडे द्यावे लागणार होते, हे स्पष्ट झालं.
 पहिली बॅच सुरु झाली पण मुलींचा प्रतिसाद अगदीच वाईट होता. चारपाच मुलीच फक्त हजर होत्या. अभियानाच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी निरोप पाठवले. फोन केले, अगदी रिक्षाही पाठवून मुलींना बोलावून आणले. क्लास कसा होईल, अशी क्षणभर काळजी वाटली. पण एकदा प्रत्यक्ष शिकवणं सुरु झालं आणि मुलींचा प्रतिसाद वाढला. तब्बल ४० मुली आल्या. नंतरच्या बॅचेसही आधीच फुल्ल झाल्या. इतकी गर्दी व्हायची की मुलींना जागा पुरायची नाही. सकाळी ९ वाजता प्रिया क्लास सुरु करायची. मध्ये जेवणाची सुट्टी. संध्याकाळी सहा-सातपर्यंत क्लास सुरु राहायचा. मुली शेवटच्या बसने घरी निघायच्या किंवा कधी एखादा महत्त्वाचा भाग शिकवायचा असेल तर अभियानाच्या वतीने त्यांना रिक्षाने घरी सोडलं जायचं. मुली येताना दोन दोन डबे घेऊन याचच्या मुली शिकण्यात इतक्या रंगून जात की अक्षरश: जबरदस्तीने घरी पाठवावं लागायचं. दोनेक वेळा तर असं झालं की मुली अजून घरी का आल्या नाहीत, हे बघायला पालक क्लासपर्यंत आले होते.
  प्रिया मुलींना बॅच सुरु झाली की अधी तीन चार दिवस व्यक्तिमत्व विकास, मग दोन-तीन दिवस स्वत:चे शरीर, स्वच्छता, आरोग्य, आहार याबद्दल सांगायची. नंतर प्रत्यक्ष पार्लरचं ट्रेनिंग सुरु व्हायचं. हेही थेअरी आणि प्रैक्टिकल अशा दोन भागात व्हायचं. प्रियाची स्वत:ची एक पध्दत आहे. पार्लर शिकण्याआधी त्वचा, त्वचेच प्रकार, पोषण, केस, केसांचे आरोग्य, केसांची निगा हे सगळं माहित असायला हवं. असं ती मानते. त्यामुळे प्रत्यक्ष प्रैक्टिकलकडे जाण्याआधी ती हे सगळं शिकवतं. शिरुरमध्येही तिने हे घेतलं. त्यामुळे मुलींचं फक्त वरवर नव्हते, तर अगदी सखोल माहितीसह प्रशिक्षण झालं. किशोरवयीन मुलींच्या तीन बॅचेस तिने घेतल्या. त्यानंतर थोड्या मोठ्या मुलींनीही आग्रह केल्यावर प्रियाने त्यांसाठी चौथी बॅचही घेतली.
 'लेक लाडकी अभियाना'त आल्यावर मुलींच्या वागण्यातला बदल तिथल्या तिथे जाणवून देणाऱ्या दोन घटना घडल्या. एका मुलीला घरी पाहणे बघायला येणार होते. ती सरळ प्रियाच्या क्लासमध्ये येऊन बसली. तिचे पालक न्यायला आले तर तिने यायला साफ नकार दिला. आणखी दोघींची