पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विद्यापीठाचा हा कोर्स एरव्ही १५,००० रुपये फी घेऊन चालवला जातो. पण शिरुरच्या मुलींसाठी विद्यापीठाने तो मोफत चालवला आहे. मुलींकडून फक्त २०० रुपये परीक्षा फी घेतली जाते. डॉ. राजश्री प्रथम मुलींना भेटल्या तेव्हा मुलींना मूलभूत विज्ञान माहित नसलं तरी त्यांच्यातील शिकायची, समजून घेण्याची जिद्द त्यांना जाणवली. या प्रशिक्षणामुळे आपलं आयुष्य बदलून जाणार आहे, याची त्यांना जाणीव होती आणि त्यासाठी कितीही कष्ट करायची त्यांची तयारी होती. त्यामुळे सुरुवातीला थोडे अधिक कष्ट घ्यायला लागले इतकंच. मुलींना चाकोरी सोडून थोडं वेगळ्या पध्दतीने त्यांच्या आयुष्यातली उदाहरणे वापरुन शिकवावे लागणार आहे याची जाणीव झाली. त्यानुसार त्यांनी शिकवण्याचे नियोजन केले.
 अभ्यासक्रमाची व्याख्याने आणि प्रात्यक्षिके एकाच वेळी सुरु झाली. त्यामुळे मुली शिकवलेल्या गोष्टी लगेचच अनुभवू शकल्या सुरुवातीला मुलींना वैद्यकीय परिभाषा खूप अवघड वाटायची, ते साहजिकच होतं. पण डॉ. राजश्री आणि इतर सहकारी शिक्षकांनी मुलींचा आत्मविश्वास वाढवला. त्यांना शब्दांचे अर्थ सांगितले. बोलीभाषेतले प्रतिशब्द सांगितले, मुलींना सोप्या भाषेत नोट्स दिल्या. थोड्या सरावाने त्याने ते समजून गेले. त्या यशस्वीपणे अभ्यासक्रम पूर्ण करू शकल्या, करत आहेत.
 मुली या काळात संपूर्ण बदलून गेलेल्या त्यांनी पहिल्या. आधी आपल्याला काही भविष्य नाही असं वाटून खचलेल्या मुलींना स्वत:च्या पायावर उभे राहताना बघण्यातला आनंद डॉ. राजश्री अनुभवत आहेत. 'लेक लाडकी अभियान' या मुलींना केवळ व्यावसायिक प्रशिक्षण देऊन थांबले नाही. त्यांनी मुलींना पथनाट्ये, एकांकिका यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. मुलींनी स्वत:च्या तालुक्यांत, गावांत हे प्रयोग केले. त्यांचा आत्मविश्वास वाढला.
 लेक लाडकी अभियानाशी जोडलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिकांकडे मुली सरावासाठी जायच्या. त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे अनुभव मिळाले. रुग्ण सहाय्यक म्हणून आवश्यक ती कौशल्ये त्यांना मिळाली. आता या अभ्याक्रमाचे तिसरी बॅच सुरु आहे. आधीच्या दोन्ही बॅचेसमधील मुली आता स्वतंत्रपणे नोकरी व्यवसाय करतात. काही मुली सातारा सोडून अन्या गावांत गेल्या. कुणी होम व्हिजिटला जातात. बाकी मुली अन्य रुग्णालये, डिस्पेनसरीमध्ये काम करतात. या मुली केवळ आर्थिक दृष्ट्याच नव्हे तर निर्णय प्रक्रियेतही स्वतंत्र झाल्या ही डॉ. राजश्री यांना मोठी गोष्ट वाटते.