Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आयुष्य बघतात. जयश्रीताईचे माहेर माजलगाव. त्या सातवीत असताना लग्नाची बोलणी सुरु झाली आणि काही कळायच्या आधीच पंधराव्या वर्षी लग्न झालंही. घरात आल्यापासून शेतीची जबाबदारी डोक्यावर आली. लग्नानंतर १८ वर्षे पतीसोबत त्यांनी शेती केली. वाटायचं, शिकले असते तर काही तरी वेगळे करता आलं असतं. २००० च्या सुमारास बचतगट चळवळीने जोर धरला. २००२ मध्ये जयश्रीताईंनी स्वत: चा बचतगट सुरु केला. त्याचं रेकॉर्ड ठेवावं लागायचं. सरकारी अधिकारी म्हणायचं. इतके व्यवस्थित काम करता तुम्ही तर नोकरी का नाही करत ? ओशाळे होऊन त्या म्हणायच्या 'माझं शिक्षण नाही हो फारसं फक्त सातवी शिकले आहे. ' पण सारखी ही उत्तरे देणं सुरेखा ताईंना जड जात होतं. शेवटी मनाशी निश्चय केला की बाहेरुन परीक्षा द्यावयाच्या. मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आणि एक एक परीक्षा देत त्या बीए झाल्या. पदवी मिळवण्याचा आनंद मोठा होता.
 लग्न झाल्यावर काही दिवसांनी अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करायचं होतं. त्याच्या सासू सासऱ्यांनी तेव्हा परवानगी दिलेली नव्हती. पण नंतर मात्र त्या आग्रही राहिल्या. एका सहकारी संस्थेत त्यानी काही दिवस काम केलं. त्यानंतर बचत गट चळवळीत त्या सक्रिय झाल्या. वेगवेगळ्या सरकारी योजनांच्या प्रशिक्षणासाठी ट्रेनर म्हणून त्यांच नाव जिल्ह्यात अग्रक्रमाने घेतलं जातं. या वेगवेगळ्या प्रतशिक्षणांच्या निमित्ताने त्यांनी पूर्ण तालुका पायाखाली घातला आहे. प्रत्येक गावात त्यांच्या ओळखी आहेत. या नेटवर्किंगचा फायदा त्याना प्रशिक्षणादरम्यान झाला. लग्न लवकर झाल्यामुळे काय काय वाट्याला येते हे त्याना पाहिले आहे. त्यामुळे या मुलींना तरी तो त्रास होऊ नये असे त्यांना वाटतं. शिरुर तालुक्यातल्या मुली बदलत आहेत. सोबत तालुक्याचं भविष्यही बदलतंय. या बदल्याच्या साक्षीदार असल्याचं समाधान व्यक्त करत जयश्रीताई नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी मुलींना तयार करताहेत.