पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




एक खोली तिला तात्पुरती वापरायला दिली. ती चांगली प्रशस्त आहे. पण त्या जागेच्या जवळच लोक दिवसभर पत्त्यांचा अड्डा टाकून बसलेले असत.
 दरम्यान लेक लाडकी अभियानाने नीताच्या अंगणवाडीची दुरुस्ती करुन द्यायचं ठरवलं. दुरुस्ती पूर्ण झाली. काम सुरु असताना मुलं तिथं जायची. गवंडी काम करत असताना त्यांना स्वत: विटा आणून द्यायची. आमची अंगणवाडी लवकर बांधा म्हणायची. मधल्या काळात नीता एका प्रशिक्षणासाठी बाहेर गेली होती. ती परत आल्यावर मुलं तिला अक्षरश: ओढतच बांधकाम बघायला घेऊन गेली. आपली शाळा बघा किती छान झाली आहे. असं मुलं म्हणत होती. तो आनंद, उत्साह बघून डोळ्यांत आनंदाश्रू दाटल्याचं नीता सांगते.
 नीताच्या अंगणवाडीजवळ इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळा आहेत. ती मुलं चकाचक कपडे घालून तयार होऊन जाताना ही मुलं बघतात. त्यांना प्रश्न पडायचे. आपली शाळा अशी का नाही, आपले कपडे असे का नाहीत.. मात्र त्यांची शाळा छान झाली आहे. दोन खोल्या, स्वच्छतागृह, पाण्याची सोय आणि कंपाऊंड घातलेली मोठी खेळायची जागा. मुलं खुश आहेत. लवकरच एक छान बाग करायची असं नीता ठरवले. तिची अंगणवाडी जिथं आहे तिथली माणसं रोज मजुरी करुन पोट भरतात. अशा लोकांच्या मुलांसाठी उत्तम दर्जाचं पूर्वप्राथमिक शिक्षण देण्याचं काम करण्यात मोठा आनंद असल्याचं ती मानते. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून एकाच वेळी किशोरवयीन मुली आणि पूर्वप्राथमिक शिक्षण घेणारी मुलं अशी दोन टप्प्यांवरची आयुष्यं बदलण्यात आपला खारीचा वाटा आहे. यांच समाधान आहे. हे करताना स्वत:मध्येही बदल घडवता आले. यापुढे अनेक पातळ्यांवर बदलांची ही प्रक्रिया सुरुच राहावी, असं नीताला वाटतं.