Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




या प्रश्नावलीत दोन भागात उत्तरे लिहून घेतली जात. एका भागात होय किंवा नाही असे प्रश्न असायचे तर दुसऱ्या भागात सविस्तर उत्तरे अपेक्षित होती. मुलींमधील वर्तनबदल यांतून समोर येत होते.
  आता गावात सरकारी नियमांनुसार बालसंरक्षण समित्या नेमण्यासाठी मुक्ताताई प्रयत्नशील आहेत. या समितीत आशा, अंगणवाडी सेविका, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील आणि इतर असे ११ जण असतात. ग्रामपंचायतीत यांच्या नावाच्या पाट्या लागल्या आहेत. गावांत होणाऱ्या बालविवाहांसाठी या पूर्ण समितीलाच जबाबदार धरले जाणार असल्याने गावांत याबद्दल अधिक जागरुकता आहे. मुली स्वत:च्या आरोग्याविषयी सजग झाल्या आहेत. मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेचे महत्त्व त्यांना पटल्यामुळे त्या आता कापड न वापरता सॅनिटरी पॅडसाठी आईकडे आग्रह धरतात. स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेणं त्यांना जमू लागलं आहे.
 मुक्ताताईंचे गावाच्या इतर प्रश्नांतही लक्ष असते. लिंबा गावात शाळेची इमारत तीन वर्षापूर्वी कोसळली मुली वर्गात होती. भिंती बाहेर कोसळल्या म्हणून दुर्घटना टळली. तरीही एका मुलीच्या डोक्यात वीट कोसळून ती जखमी झाली होती. गावकऱ्यांची शाळा दुरुस्ती करण्याची आर्थिक कुवत नव्हती. त्यामुळे मुले रोज जीव मुठीत घेऊन त्या पडक्या शाळेत बसत होती. किशोरी गटातल्या मुली आणि मुक्ताताई यांनी मिळून वर्षांताईंना परिस्थिती दाखवली. एकूण सारेच धक्कादायक होते. 'लेक लाडकी अभियाना'ने स्वतः शाळेच्या दुरुस्तीसाठी ८० हजार रुपये दिले. गावातूनच कंत्राटदार नेमला. शाळा दुरुस्त झाली. आठ वर्गखोल्या तयार झाल्या. १५ ऑगस्टला गावकऱ्यांनी मुक्ताताईंचा सत्कार केला. दुसरीकडे नव्या इमारतीसाठीही पाठपुरावा सुरु केला आहे. आता गावासाठी शाळेची नवी इमारत बांधायचे काम सुरु आहे. अजूनही मुक्ताताई समाधानी नाहीत. त्यांना गावच्या शाळेत संगणक आणायचे आहेत. मुलांना प्राथमिक शाळेतच संगणकाचे प्राथमिक शिक्षण मिळायला हवे असे त्यांना वाटते. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
 लिंबा बाराशे लोकवस्तीचं छोटंसं गाव असलं तरी गावात दारुची तब्बल चार दुकानं. लोक सकाळी सहा वाजल्यापासून या दुकानांत हजेरी लावत. मुक्ताताई अगदी लहानपणापासून दारुमुळे घरं, कुटुंब उद्धवस्त होताना बघत होत्या. लेक लाडकी अभियान आणि गावातला किशोरींचा गट यांना हे चित्र बदलायचे होते. गावातली दारु बंद करायची. हे त्या सगळ्यांनी मिळून पक्के ठरवले. वर्षा देशपांडे यांनी स्वत: यात लक्ष घातलं. चार वेळा गावात स्वत: जावून आल्या. मीटिंग घेतल्या. बायकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कितीतरी