पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 घरात शौचालय बांधायला सुरुवात झाल्यावर या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला मिळाला असं तिला वाटलं आणि तिने ही कल्पना वर्गातील मुलींना सांगितली. 'नसेल शौचालय ज्याच्या दारी, देऊ नका मुलगी त्याच्या घरी', 'एकच चर्चा स्वच्छतेचा मोर्चा, "उघड्यावर शौचाने होत काय, पसरते रोगराई, भरतात पाय', नको मोबाईल, नको फ्रीज, एक शौचालय बांधा ना प्लीज.' अशी घोषणा ऐकून रविवारी सकाळी घरात निवांत बसलेली मंडळी घराबाहेर आली. थोडे अंतर ठेवून मुलींच्या मागून चालू लागली. लोकांना कळेना, सात मुली नक्की कसला मोर्चा घेऊन निघाल्या आहेत ! पारावर बसलेले, चहा टपरीवर चहा पिणारे वळून वळून पाहू लागले. मुली शेवटी ग्रामपंचायतीच्या बाहेर आल्या. तिथे ग्रामसेवक, सरपंच आणि इतर सदस्य मंडळी बसलेली होती. मुलींचा आक्रमक रागरंग बघून एकेकजण गाडीला किक मारुन निघू लागला. पण मुलींच्या घोषणांचा वाढता आवाज बघून त्यांना थांबावे लागले. तेवढ्यात योगिताचे वडीलही तिथे आले. त्यांना एकून परिस्थितीचा अंदाज आला. ते म्हणाले. 'योगिताने मला यातले काहीही सांगितले नसले तरी मला याचा राग नाही. मुलींनी आपले डोळे उघडले आहेत. आपण कितीतरी अनावश्यक गोष्टींवर खर्च करतो. त्याऐवजी थोडा आणखी पैसा घालून शौचालय उभारु. शाळेचा परिसरही त्यातून आपोआप स्वच्छ होईल. आपण आपल्या मुलींना खंबीर पाठिंबा देऊ.' लोकांना पटलं. त्यांनी मुलींना पाठिंबा दर्शवला. मुली घरी गेल्या. पण तोवर या मोर्चाची बातमी सगळीकडे पसरली होती. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात छापूनही आली. त्यावेळचे बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामेदव ननावरे यांनी ती वाचली. ननावरे स्वच्छ भारत अभियानात विशेष सक्रिय होते. त्याचा फोन आला, 'मी गावात उद्या सकाळी येतो.' मुली पुन्हा कामाला लागल्या. ही आणखी एक संधी चालून आली होती. ननावरे साहेबांचं स्वागत गावातल्या सगळ्यात घाणेरड्या ठिकाणी करायचं असं मुलींनी ठरवलं. ते आले. गाडीतून उतरताना पाय कुठे ठेवावा. अशी त्यांची अवस्था झाली. त्यांनी परिस्थितीची कल्पना आली. त्यांनी पाठीवर थाप देत मुलींचे कौतुक केलं. त्यांनी एक बैठकच घेतली आणि जाहीर केले. 'केवळ या मुलींमुळे आज मी इथे आलो आहे. यापुढे गावात शौचालय उभारण्यसाठी सगळी सरकारी यंत्रणा तुमच्या गावाच्या पाठीशी उभी असेल.' त्याच दिवशी २१ शौचालयाचं भूमिपूजन योगिता आणि तिच्या मैत्रिणींच्या हस्ते झालं. पण सगळाच प्रश्न सुटला नव्हता. गावात या गोष्टी न पटलेले अनेकजण होते. त्यांचं मत बदलायचं होतं. तोवर शाळेतल्या आणखीही