पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 रुपयांचे बक्षीस मिळाले होते. आता लेक लाडकी अभियानात ती पथनाट्यातही सहभागी होते.
 गावात बालविवाह होऊ नयेत म्हणून तिचा किशोरी गट सतत जागरुक असतो. तरीही एखादी घटना घडतेच. गेल्या वर्षी तिच्याच एका मैत्रिणीचे लग्न ठरले. कुणाला काही न कळवता ते गुपचूप होणार होते. तिला हे आदल्या दिवशी कळले तेव्हा ती शाळेत होती. तिच्याकडे फोन नव्हता. वर्षाताईंना कळवायचे तर फोन करायला हवा होता. शिक्षकांना विनंती केली तेव्हा त्यांचा संताप झाला. म्हणाले 'तुला कुणी सांगितला आगाऊपणा? वडिलांना सांगू का तुझ्या ? ती गप्प बसली. दुसऱ्या दिवशी मैत्रिणीचे लग्न झाले. नवरा मुलगा पंधरा वर्षांनी मोठा. सासरच्या लोकांनी मुलीच्या वडिलांना दोन लाख रुपये देऊन लग्न करुन घेतले होते. चारच महिन्यांत मोटारसायकलचा अपघात होऊन मुलगा गेला. मालमत्तेत सुनेने वाटा मागू नये म्हणून सासरच्या लोकांनी पुन्हा दोन लाख रुपये दिले आणि मुलीला माहेरी पाठवून दिले. नवरा जाऊन वर्ष होत नाही तोवर माहेरच्या लोकांनी पैसे खर्चही केले. वडील तिच्यावर आत पुन्हा लग्न करण्यासाठी दबाव आणताहेत. अशा वेळी काय करावं कळत नाही म्हणत ऋतुजा अस्वस्थ होते. पुन्हा अशी घटना गावात घडू नये म्हणून सजग राहायचं असे तिने मनोमन ठरवलं आहे. बारावी झाल्यावर वकील व्हायचं आणि मुलींसाठी, महिलांसाठी लढायचं, असं ऋतुजाने ठरवले आहे. खरं तर तिची ही लढाई आधीपासूनच सुरु झाली आहे .