पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




होतं. शिरुरमध्ये भाग्यश्रीची आजी राहते. थोडे दिवसांसाठी तिने आपला मुक्काम शिरुरला हलवला. भाग्यश्रीचे वडील सामाजिक कार्यकर्ते आहेत. मुलींना शिकवण्याचं, स्वावलंबी करण्याचं महत्त्व ते जाणतात. त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे ती निर्धास्तपणे शिकू शकते. आता ती बारावीला आहे. चार दिवस कॉलेज बुडवून ती मुंबईला 'युएनएफपीए' च्या कार्यक्रमाला येऊ शकली कारण अभ्यासाइतकाच हा उपक्रमही महत्त्वाचा आहे, हे तिला पटलंय. भाग्यश्रीचा फोटोशॉप कोर्स तीन महिन्यांचा होता. शाळेत कम्प्युटर कसा सुरु करायचा इथपासून सुरुवात होती. तिच्या सोबतच्या सगळ्या मुलींचा हाच प्रश्न होता. ढाकणे सरांनी अगदी बेसिकपासून सुरुवात केली. सरांना आधी या मुलींना तीन महिन्यांत फोटाशॉप कसे शिकवणार, ही काळजी होती. पण मुलींनी जोमाने कष्ट केले. भरपूर सराव केला. ढाकणे सरांनी सगळ्यांचा आत्मविश्वास वाढवला. आपण हे सहज करु शकू. असं मुलींना वाटू लागलं. बारा मुली होत्या. प्रत्येकीला स्वतंत्र कम्प्युटर होता. दोन तास मुली कसून सराव करायच्या. पुष्कळदा विजेची समस्या असायची. भारनियम असायचे. पण मुलींनी जिद्दीने कोर्स पूर्ण केला. फोटोंचा कटआऊट काढणं आणि त्याच्या कडा एकदम शार्प असणं ही फोटो शॉपमधील कला मानली जाते. सर हे काम पुन्हा पुन्हा करायला लावायचे. कधी कंटाळा येऊन ते कधी सोडूनही द्यावसं वाटायचं. पण दुसरीकडे वर्षाताईंनी ज्या कारणासाठी हा कोर्स सुरु केला, त्याचही जाणीव सर करुन द्यायचे. मग मुलींना पुन्हा हुरुप यायचा. अखेर परीक्षा झाली. सगळ्या मुलींना ए ग्रेड मिळाली. भाग्यश्री चक्क ए-वन ग्रेड मिळवून पहिली आली. भाग्यश्रीला 'नीट' परीक्षा देऊन मेडिकल क्षेत्रात जायचे आहे. दुसरीकडे फोटोशॉपचेही करिअर तिला खुणावते आहे. फिल्म आणि टेलिव्हिजन एडिटिंगच्या क्षेत्रात काही करायला मिळाले तर तिला ते आवडेल. मुली वाचवण्यसाठी या ज्ञानाचा उपयोग करण्याचं तिचं स्वप्न आहे.