Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



परवाना आहे ! तिच्यासोबत ४५ मुली होत्या. सगळ्यांनी हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला. स्वाती दहावीत आहे. तिला पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. आई-वडिलांची पाच एकर शेती आहे. त्यात कुटुंबाचं भागवणे कठीण होतं. म्हणून ते ऊसतोडीला जातात. मोठा भाऊही त्यांच्यासोबत जातो. स्वाती व तिची छोटी बहीण घरी असतात. स्वाती पाचवीत होती तेव्हापासून ती आणि तिची छोटी बहीण यांना आई - वडील गावात सोडून ऊसतोडीला जातात. तेव्हापासून स्वातीच सगळं घर सांभाळते. स्वातीच्या छोट्या वाडीत सध्या तब्बल ४० तरुण मुलं लग्नाची आहेत. त्यांच्या धनगर समाजात मुलींची संख्या इतकी कमी झाली आहे की लग्नाला मुली मिळेनाशा झाल्या आहेत. मुलींना हुंडा देण्याची वेळ आली आहे. यातून मुली वाचवायला हव्यात याचा धडाच समाजाला मिळाल्याचं ती सांगते आणखी थोडी मोठी झाल्यावर कदाचित दोनेक वर्षांनी ती स्वत:च्या गाडीचा विचार करेल. त्यासाठी सरकारी योजनेतून कर्ज मिळाले तर त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मुलांना शाळेत सोडण्यासाठी वाहन हवे असते, असा काही व्यवसाय करता येईल का, हाही विचार ती करते आहे. सध्या तरी ड्रायव्हिंगचे कौशल्य मिळवून आयुष्याचे सुकाणू आपल्या हाती आल्याचे समाधान तिच्या मनात आहे आणि मनाशी आत्मनिर्भर होण्याची स्वप्ने !