Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




विश्वास संपादन केल्यावर मात्र त्यांनी अनेक गोष्टी शिकवल्या. मुलीही निरीक्षणातून शिकत होत्या.
 स्वातीने पेशंटला पहिल्यांदा सलाईन लावलं तेव्हा तिचे हात अक्षरश: थरथरत होते. पण नंतर एका सिनिअरचं लक्ष देऊन निरीक्षण केलं. तंत्र लक्षात आलं आणि थोड्या सरावाने ती ते सहज लावू शकती. इंजेक्शन देणं, रक्तदाब मोजण, ड्रेसिंग करणं सहज जमू लागलं. समजलं नाही तर तिथल्या सरांना, सिनिअरना विचारण्याइतकं धाडस आलं. कोर्स संपला. लगेचच साताऱ्यात आदित्य हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली. स्वकमाईचे पैसे हातात आले तेव्हा अभिमान दाटून आला.
 नोकरी लागल्यावर स्वाती घरी गेली तेव्हा आईला छानशी साडी घेतली. वडिलांना कपडे घेतले. दोन्ही भावांना त्यांच्या आवडीचे रंगाचे ड्रेस घेतले. सगळ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत होता. उरलेले दहा हजार रुपये वडिलांच्या हातात दिले. त्याच्या डोळ्यांत पाणी आले. म्हणाले 'बघ माझी लेक...' त्या दोघांच्या डोळ्यांत न बोलता खूप काही होतं... ते स्वातीला वाचता आले. आता घरातले लोक लग्नाचा विषय काढत नाहीत. स्वातीचा वडील म्हणतात, 'कर नोकरी. मनापासून काम कर, पॅक्टिस कर, म्हणजे आणखी परिपूर्ण होशील.' स्वाती एकीकडे पदवीचे पेपर देते आहे. पदवी पूर्ण झाली की तिचा पुढे ‘जीएनएम' करायचा विचार आहे. लग्न तर इतक्यात नाहीच.....