पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० असते व ज्यांना कधीं श्रम, दुःख, चिंता व दुस-यांची बोलणी यांचा गंधही नसतो, अशी माणसे शरीराने व मनाने बहुतेक दुर्बळ असतात. अशा माणसांवर पुढे अडचणी उत्पन्न झाल्या तर ती अगदीं गांगरून जातात व त्यांतून पार कसे पडावे हे त्यांस अगदी सुचत नाहीं. म्हणून पूर्ववयांत जी दुःखे दिसतात ती दुःखें नव्हत, तर ते सोशिकपणाचे धडे शिकविणारे गुरूच आहेत असे समजावे. कारण जेव्हा आपणांवर दु:ख येतात, तेव्हां आपण सहनशीलतेचा एक प्रकारचा धडाच शिकत असतो. दुःखाने आपण दीर्घ नि:श्वास टाकतों, तेव्हां आपण आपल्या उन्नतीची चढण चढत आहो असे समजावे. दुःख होणे, ते विसरणे, अडचणी येणे, त्या नाहीशा होणे, निराश होणे, उमेद बाळगणे, वर चढणे, खालीं पडणे, खाली पडल्यावर उठून पुन्हा वर जाण्याची इच्छा करणे, या सर्व गोष्टी रात्रीमागून दिवस च दिवसामागून रात्र याप्रमाणे सर्वसाधारण व नैसर्गिक आहेत असे. समजावे. दिवस मावळल्यावर काळी कुट्ट रात्र आली म्हणून जसे आपण कधीं दुःख करीत नाही, त्याप्रमाणे सुखानंतर थोडेसे दुःखाचे दिवस दुर्दैवाने आल्यास, आपण त्याबद्दल अगदी विषाद मानू नये. दुःख, कष्ट, धडपड हीं अनिष्टं दिसतात, अंधकारमय वाटतात तथापि त्यांतच मोठेपणाची किल्ली अडकविलेली असते. कारण त्यांच्यामुळेच ज्ञानाचा प्रकाश पडतो व उच्च कल्पना व उन्नति यांचा मार्ग दिसू लागतो.