पान:निवडक अंतर्नाद.pdf/४९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पैशाचे मूल्य राहणार नाही, पण त्याऐवजी काही दुसरी मूल्ये माणसांना समाधान देऊ शकतात. माझी आई नेहमी स्वतः कुटुंबासाठी स्वयंपाक करायची, जेव्हा तिने पंचाहत्तरी ओलांडली तेव्हा आम्ही मुलांनी सांगितले, की एक स्वयंपाकी ठेव. आम्ही स्वयंपाकी पाठवूनही दिला. पण तिने दुसऱ्या दिवशी त्याला हाकलला (फार तेल वापरतो, फार डालडा वापरतो वगैरे वगैरे), ती आमचं ऐकणार नाही, म्हणून आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरना सांगितले. डॉक्टर म्हणाले, "हा तुमचा बेत अगदी मूर्खपणाचा आहे. ती स्वयंपाक करते, त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर तिचा दिनक्रम तिच्या डोक्यामध्ये असतो. न्याहारी, दुपारचे व रात्रीचे जेवण ह्याचा मेनू तिला ठरवायचा असतो. दिवाळी आली, की फराळाची तयारी करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या कामाचे मूल्य पैशामध्ये व्यक्त होत नाही. " हे अर्थात पण ज्या दिवशी तिने शिजवलेला कुठचाही पदार्थ अगदी संपून जातो आणि तिला स्वतःसाठी तो जरासुद्धा उरत नाही, त्यावेळी तिला सर्वांत जास्त मूल्य मिळते. डॉक्टर म्हणाले, की ह्या तीन गोष्टी तिच्याकडून काढून घेतल्यात, की ती जी बिछान्याला खिळेल ती पुन्हा उठणार नाही. शरू रांगणेकर, पेडर रोड, मुंबई (मे २००९ ) पुरुषसत्ताक व्यवस्थेचा प्रभाव महाराष्ट्राच्या ५०व्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रसिद्ध झालेला, अंतर्नादचा मे महिन्याचा अंक मला खूप आवडला. त्यातले श्री. मधु मंगेश कर्णिक, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ इत्यादींचे लेख अभ्यास आणि माहिती यांचा चांगला आलेख पुढे ठेवतात. श्री. कर्णिकांचा लेख मला आवडला. त्यांच्याबरोबर साहित्यसंस्कृती मंडळाचं काम करताना, त्यांचा माझा व्यक्तिगत परिचयही झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या लेखाबाबत काही त्रुटी दाखवून लिहिताना मला हे मान्यच आहे, की ते वृत्तीने स्त्रीविरोधी नाहीत, मात्र या पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या प्रभावामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघेही काही गोष्टी गृहीत धरून चालतात किंवा सवयीने विसरतात! उदाहरणार्थ, श्री. कर्णिकांच्या लेखात १८ क्रमांकाच्या पानावर भाषेच्या दृष्टीने महत्त्वाच्या, मोजक्या उपक्रमांचा उल्लेख आहे. त्यात म. सा.प.च्या मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा उल्लेख आहे. मात्र पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने डिसेंबर, २००७ मध्ये प्रसिद्ध केलेल्या, 'भारतातील स्त्रीसाहित्याचा मागोवा' - खंड १ आणि २ आणि त्याही पूर्वी, 'स्त्रीसाहित्याचा मागोवा' - खंड १, २, ३ या खंडांचं प्रकाशन केलं आहे. हे काम खूप मेहनतीचं आणि महत्त्वाचं आहे. पण त्याची नोंद घ्यायला श्री. कर्णिक विसरले. याच अंकात माझाही 'स्त्रीसाहित्याभोवतीचं वास्तव' हा लेख आहे. त्यात स्त्रियांची आणि त्यांच्या लेखनाची कशी नोंद घेतली जात नाही किंवा घ्यायची राहून जाते, यासंबंधी मी लिहिलं आहे म्हणून श्री. कर्णिकांचा लेख परखड म्हणून आवडला, तरी ही त्रुटी नम्रपणे निर्दशनास आणून द्यावीशी वाटली. विद्या बाळ, भोंडे कॉलनी, एरंडवन, पुणे (जुलै २००९) राग व निराशा यांचा अनुभव फेब्रुवारीच्या अंकातले औरंगाबाद येथील डॉ. सुधाकर भोसले यांचे पत्र जरा लांबले असले, तरी खूप आवडले. त्यातले बहुतेक मुद्दे पटले, खास करून ("आपल्याला 'आवडणे', 'न आवडणे' हा मुद्दा नाही, मुद्दा आहे 'भले' आणि 'बुरे' यांचा, जर एखादी गोष्ट 'बुरी' असेल, तर ती भारताचे वास्तवरूप म्हणून स्वीकारायची का? का ती बदलण्यासाठी प्रयत्न करायचा? सतीची चाल, बालविवाह, केशवपन, अस्पृश्यता इत्यादीदेखील एके काळी भारताचे वास्तव होते आणि ते वास्तव महात्मा फुले प्रभृतींनी बदलले, 'आपले' म्हणून स्वीकारले नाही!") हा मजकूर फारच आवडला, अगदी नेटकेपणाने मांडला आहे. याच पत्रात प्रा. व. कृ. नूलकर यांच्या मुलाखतीतील बोटचेप्या व तर्कविसंगत विधानांची दखल घेतली आहे. भले भले विचारवंत, मंत्रिपदावर बसणारे बडे लोक, अगदी तर्कविसंगत व असंबद्ध विधाने करताना दिसतात, त्या वेळी राग व निराशा यांचा अनुभव येतो. मंगला नारळीकर, पंचवटी, पाषाण, पुणे, (जुलै २००९) फारसी/उर्दूचे ऋण मान्य करावे आपले सर्व अंक उत्कृष्ट, उद्बोधक व विचारोत्तेजक आहेत. म्हणूनच हे पत्र लिहीत आहे. श्रीमती यास्मिन शेख यांचा मराठी लेखनासंबंधित लेख, त्यावर आलेली पत्रे व श्रीमती शेख यांचे उत्तर वाचले. एक गोष्ट मला नेहमीच जाणवते मराठीतील शब्दांचा उगम सांगताना शिक्षक संस्कृतमधून आलेले तत्सम, तद्भव शब्द याबद्दल माहिती देतात. परंतु फारसी/उर्दूमधून आलेल्या शब्दांचा उल्लेखही होत नाही. प्रत्यक्षात आज हे शब्द सर्रास वापरले जातात. जसे, बेलाशक (बिला शक), फाजील (फ़जूल), जरुर (ज़रूर), गरज (ग़र्ज़) इत्यादी. काही शब्दांचे अर्थ इतके बदलले गेले आहेत, की कधी कधी उलट्या अर्थाने शब्द वापरला जातो, जसा, राजीनामा हा शब्द, त्याचा अर्थ आहे करार (agreement). पण मराठीत तो अगदी उलटा झाला आहे. 'मंत्री राजीनामा देतात' तेव्हा काम करणे सोडून देतात. अशा अपभ्रंशित शब्दांची गिनती अनगिनत होऊ शकते. माझे मत असे आहे मराठी व्याकरणकारांनी राजकारणात न पडता मराठीची ही फारसी/उर्दू ठेव लोकांपुढे मांडावी, शिवाजीराजांवरचे अत्यधिक प्रेम इथे आडवे येऊ नये. महाराजांच्या दरबारातही फारसीमिश्रित मराठीच बोलली जात होती. डॉ. अंजला महर्षी, नवी दिल्ली (जानेवारी २०१० ) निवडक अंतर्नाद ४९७