पान:निवडक अंतर्नाद.pdf/४९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिळतं. ह्या सामाजिक संस्थांचे आणखी एक महत्त्व म्हणजे जनतेच्या सेवेबरोबरच नवीन कार्यकर्त्यांना समाजसेवेचे प्रशिक्षण देणाऱ्याही त्या संस्था असतात. समाज कार्यकर्त्यांची एक परंपरा निर्माण करतात. नवीन तरुणांना व्यक्तिविकासाची संधीही त्या संस्थांद्वारा मिळू शकते, हेही नसे थोडके. सारांश, शरद जोशी ह्यांचा 'अशा संस्था म्हणजे निव्वळ भंपकबाजी' हा शेरा अस्थानी आहे. सच्च्या कार्यकर्त्यांचा अपमान करणारा आहे. आपण करतो तेच खरं समाजकार्य, इतरांचं कार्य म्हणजे ढोंगबाजी अशा उथळ नजरेने सामाजिक संस्थांकडे पाहणे चूक आहे. तो अहंभाव आहे अॅड. दत्तात्रय कुलकर्णी, मालेगाव, जि. नाशिक (जानेवारी २००० ) स्तिमित करणारी उपस्थितांची संख्या कालचा 'अंतर्नाद'च्या रवीन्द्रनाथ टागोर विशेषांकाचा नॅशनल फिल्म्स अर्काइव्हजमधील प्रकाशन समारंभ उत्तम प्रकारे पार पडला. 'अक्षर' माध्यमाला तुम्ही इतर माध्यमांची फार कौशल्याने जोड दिली होती. कार्यक्रमाचा प्रारंभच अमित मित्रा आणि त्यांच्या बंगाली सहकाऱ्यांच्या रवींद्रसंगीताने करून तुम्ही रवींद्रनाथांच्या कलाप्रेमाची ओळख करून दिली. प्रा. व. दि. कुलकर्णी यांच्या भाषणाने रवींद्रांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान श्रोत्यांना समजले तर, सत्यजित रे यांच्या डॉक्युमेंटरीतून रवींद्रांच्या जीवनाचे व प्रत्यक्ष कार्याचे दर्शन घडले. बहुतेक मराठी वाचकांना रवींद्रांच्या 'गीतांजली'ची व नोबेल पारितोषिकाची तेवढी ऐकून ओळख असते. पण २- २॥ तासांच्या अवधीत तुम्ही शांतिनिकेतनात नेऊन जणू श्रोत्यांची प्रत्यक्ष रवींद्रांशीच भेट घडवून दिलीत. या तुमच्या कामगिरीबद्दल 'अंतर्नाद'च्या विशेषांकाच्या वाचकांबरोबर कालच्या कार्यक्रमाचे श्रोतेही तुमचे ऋणी आहेत. मी तुम्हांला शाबासकी देऊ इच्छितो ती दुसऱ्या एका कामगिरीबद्दल, कालची उपस्थितांची संख्या पाहून मी खरोखर स्तिमित झालो, एखाद्या लोकप्रिय चित्रपटास गर्दी व्हावी, तशी गर्दी काल होती. 'अंतर्नाद' आता सुसंस्कृत पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे याचीच ती निशाणी होती. 'अंतर्नाद' चे सामर्थ्य केवळ वर्गणीदार संख्येवरून मापणे अविचाराचे होईल. 'अंतर्नाद' आपल्या वाचकांच्या मनावर किती परिणाम करतो ही खरोखर त्याच्या सामर्थ्याची कसोटी मानली पाहिजे. त्या अर्थाने 'अंतर्नाद' पहिल्या वर्गात डिस्टिंक्शन मिळवून पास झाला आहे असे म्हटले पाहिजे, मुकुंदराव किर्लोस्कर, संपादन, एरंडवन, पुणे (जुलै २०००) डावीकडेही नाही, उजवीकडेही नाही, केवळ सरळ : योग्य भूमिका गेल्या महिन्यात 'अंतर्नाद'चा पाचवा वर्धापनदिन साजरा झाला. त्या कार्यक्रमाला मी फक्त अनिल अवचट यांना ऐकण्यासाठी आलो होतो. कार्यक्रम आटोपशीर झाला. मासिकाचा संपादक शांतपणे व्यासपीठावर बसून राहतो आणि अवचटांची मुलाखत सुरू झाल्यावर प्रेक्षकांत जाऊन बसतो, याचं जरा आश्चर्य वाटलं. आपली भूमिका संपादकीयात मांडल्यानं आपल्याला भाषणाची गरज वाटली नसावी. पण असा प्रकार मी प्रथमच पाहत होतो, अवचटांची मुलाखत नेहमीप्रमाणेच छान झाली. पण तरीही त्यासाठी तीन मुलाखतकारांची गरज नव्हती. काही प्रश्न इतके मोठे होते की त्या प्रश्नांनी श्रोतेही अस्वस्थ झाले होते. हे ओळखूनच की काय, अवचटांनी तसल्या मोठ्या प्रश्नांना छोटी उत्तरं दिली, हे टाळता येणं अशक्य नव्हतं, असो, गेली चार वर्ष पुस्तकं मासिकं यांच्या साम्राज्यात भटकंती करत असूनही 'अंतर्नाद' माझ्यापर्यंत आलं नाही याची खंत वाटली. प्रत्येक अंक वाचलाच पाहिजे असं एक मासिक मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळालं याचा आनंद आहे. त्यानंतर काही जुने अंक मिळवून वाचले. कालिदास, रवींद्रनाथ व शेक्सपियर यांच्यावरील विशेषांक तर माझ्या संग्रहातील 'दुर्मिळ' विभागात जाऊन बसले. राम शेवाळकरांनी सुरेश भट यांच्यावर लिहिलेला, 'एक करपलेला झंझावात' हा लेख अप्रतिम होता, तोंडात नेहमीच गोडवा असलेले, रसाळ बोलणारे राम शेवाळकर इतका सडेतोड लेख लिहू शकतात याची प्रथमच जाणीव झाली. त्या लेखातील प्रत्येक शब्द विचारपूर्वक मोजून-मापून लिहिल्याप्रमाणं वाटला, सी. पं. खेर यांनी लिहिलेले 'बदलते भांडवलशाही आणि 'बदलता समाजवाद' हे दोनही लेख माहितीपूर्ण होते. 'साम्यवाद' व 'समाजवाद' यांतील मूलभूत फरक मला, दुसरा लेख वाचून समजला, 'भांडवलशाही' व 'समाजवाद यांच्या फक्त मर्यादा सांगून खेर थांबले नाहीत तर, भारतासाठी 'संमिश्र अर्थव्यवस्था' हाच खरा पर्याय आहे, हे त्यांनी नि:संदिग्धपणे सांगितलं. सप्टेंबरच्या अंकातील 'कृष्णमूर्तीच्या सावलीत' हे संपादकीय वाचले. त्यातील शेवटचे तीन परिच्छेद संपादकांचे अंतरंग दाखवतात. त्या ओअॅसिसमध्ये संपादकांनी पाहिलेले निवडुंग अस्वस्थ करून जातात, 'आपल्या मुलानं याच शाळेत शिकावं असं त्याला कधी वाटत असेल का? वाटत असेल तर ते कधी शक्य होईल का? ह्या प्रश्नानं हृदयात कालवाकालव होते, 'विचारांच्या अभावाप्रमाणेच विचारांची अतिव्याप्ती हाही दोष!' हे वाक्य तर 'कोटेबल कोट' ठरावं. 'अंतर्नादपुढील आव्हानं हे संपादकीय प्रांजळ मनोगत वाटलं, 'डावीकडेही नाही आणि उजवीकडेही नाही, केवळ सरळ जायचं ही अंतर्नादची भूमिका अभिनंदनीय आहे; नव्हे ती काळाची गरज आहे. विनोद शिरसाठ, सदाशिव पेठ, पुणे ( दिवाळी २००० ) मर्यादित यशही कौतुकास्पद तुम्ही आजीव वर्गणीदारांसंबंधीचा केलेला संकल्प अजून पुरा करू शकला नाही असे दिसते. तुम्ही वाढवून दिलेल्या मुदतीत म्हणण्यापेक्षा केलेल्या नव्या आवाहनाला पुरेसा प्रतिसाद मिळेल, अशी आशा वाटते. पण संकल्प समजा पुरा झाला नाही तरी खंतावू नये. आजवर नोंदल्या गेलेल्या आजीव वर्गणीदारांची संख्या नवल करावी अशी आहे. निवडक अंतर्नाद ४८९