पान:निवडक अंतर्नाद.pdf/४५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुभवत असतो एका मनस्वी कलावंताच्या कॅमेऱ्याला तितक्याच मनस्वीपणे दुसऱ्याने केलेली संगीत-साथ, दुर्गा आणि तिचा धाकटा भाऊ अपू हे दोघे प्रथमच रेल्वे पाहतात हा प्रसंगही असाच अविस्मरणीय आहे. कोठे वाद्यांचा उपयोग करावयाचा आणि कोठे नाही याचीही स्पष्ट कल्पना सत्यजित यांच्या मनात होती. रविशंकर यांच्याशी चर्चा करताना या प्रसंगात कोणतेही पारंपरिक वाद्य वाजवायचे नाही असे त्यांनी ठरवले. मुलांनी रेल्वेचा फक्त आवाज ऐकलेला आहे, ती कधी पाहिलेली नाही. एके दिवशी दोघे जण शेतात हुंदडत असताना दुर्गाला दूरवरून घुमल्यासारखा एक आवाज ऐकू येतो. तोंडातील ऊस चघळताना ती कान टवकारते, हलक्या पावलांनी विजेच्या खांबाजवळ येऊन त्याला कान लावते. तिच्यामागून अपूही धावत येतो आणि खांबाला कान लावतो. आता दुर्गाला या आवाजाचा उगम ओळखू येतो. ती धावत त्या दिशेला जाते. शेतातून मुले धावत जात असताना भोवती 'काश'चे शुभ्र तुरे डोलत असतात. दोघांच्या मनातील उत्सुकता खूप वाढली आहे. त्यामुळे काही काळ मागे कोणतेच संगीत वाजत नाही. केवळ शांतता. मग वाऱ्याची सळसळ ऐकू येते. आता आवाजाचे स्वरूप दुर्गाला स्पष्ट होते. अपू काही बोलू पाहतो, पण ती त्याला गप्प बसवते व आवाजाच्या दिशेने धावू लागते. आता रेल्वेचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. थोडे अंतर पळत गेल्यावर त्यांना आकाशात धुराच्या रेषा दिसतात. दुरून येणारी रेल्वेही दिसते. मागचा आवाजाचा कल्लोळ वाढतो व मुले रुळांजवळ पोहोचता त्यांच्या समोरून रेल्वेचे अजस्त्र धूड धडधडत जाते... कुठल्याही पारंपरिक वाद्याचा उपयोग न करता हे दृश्य सत्यजित व रविशंकर अविस्मरणीय बनवतात. दुःख आणि आनंद यांना सामावून घेऊन जीवनाचा प्रवाह सतत पुढे जात असतो हे 'पाथेर पांचाली' चे एक मध्यवर्ती आशयसूत्र आहे. त्याला अनुसरून रविशंकर यांनी श्रेयनामावलीच्या वेळी आणि चित्रपटाच्या शेवटी वापरलेली संगीतरचना आता 'Pather Panchali signature tune' म्हणून जगप्रसिद्ध झाली आहे. संध्याकाळी सहा वाजता सुरू झालेले रेकॉर्डिंग सकाळी पाच वाजता संपले तेव्हा सारे जण थकून गेले होते. मात्र संगीत अगदी रायच्या मनासारखे तयार झाले होते आणि आपण केलेल्या कामाबद्दल रविशंकरही समाधानी होते. दुसऱ्या दिवशी रविशंकरना परत जायचे होते. त्यांना वेळ नसल्यामुळे काही प्रसंग तसेच पार्श्वसंगीताविना राहिले. मग असे ठरले की तीन-चार मिनिटांचे सतारीचे वेगवेगळ्या रागांतील तुकडे रेकॉर्ड करून ठेवायचे व ते जसे योग्य वाटतील तसे सत्यजित यांनी नंतर एडिटिंगच्या वेळी वापरायचे. चित्रपटाच्या रशेस पाहताना सत्यजितना जाणवले की एका ठिकाणी पार्श्वसंगीताची फार गरज आहे गावात एक मिठाईवाला आलेला असतो. तो मिठाईची मडकी खांद्यावर काठीला बांधून घेऊन चालतो तेव्हा त्याच्या चालण्याला आपोआप एक लय येते. ह्या लयीला साजेसे संगीत पार्श्वभूमीला असेल तर प्रसंग अधिकच खुलेल ४५६ निवडक अंतर्नाद असे रायना वाटले. पण रविशंकर तर निघून गेले होते. अशावेळी सुब्रतो मित्र यांच्या मनात एक कल्पना आली. (“The Pather Panchali Sketchbook' या पुस्तकात लिहिलेल्या लेखात सुब्रतो मित्र यांनी या कल्पनेचे श्रेय राय यांना दिले आहे.) मित्र उत्तम सतारवादक होते. त्यांनी या प्रसंगासाठी साजेसा असा सतारीचा एक पीस तयार केला व तो वापरला. या संगीताच्या तुकड्यामुळे पुढे एक फार मजेदार प्रसंग घडला. रविशंकर परदेशात कार्यक्रम करत असताना एका स्त्रीने त्यांना त्यांनी 'मिठाईवाल्याच्या प्रसंगात वापरलेला पीस वाजवण्याची फर्माईश केली. ह्य पीस तर त्यांनी तयार केलाच नव्हता, त्यामुळे त्यांना तो आठवणे शक्य नव्हते. रविशंकर यांनी, 'आता बरेच दिवस झाले आहेत, तो नेमका कोणता पीस होता हे मी विसरलो आहे' असे सांगून वेळ मारून नेली. 'पाथेर पांचाली' या चित्रपटाची जगभर प्रशंसा झाली आणि या चित्रपटाच्या वेगळेपणात व श्रेष्ठत्वात संगीताचाही फार मोठा वाटा आहे हे मान्य केले गेले. चित्रपटावरील अनेक परीक्षणांत संगीताचा खास गौरवपर उल्लेख केला गेला. पंकज दत्त या समीक्षकाने लिहिले, ‘Ravi Shankar's music in the film reaches unsurpassable heights. There is great novelty in the way he has used a variety of instruments to produce a harmonious whole.' ००० 'पाथेर पांचाली' नंतर जेव्हा सत्यजित यांनी या कादंबरीतील पुढल्या कथानकावर 'अपराजितो' हा सिनेमा काढण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी संगीतासाठी रविशंकर यांचेच साहाय्य घेण्याचे ठरवले. मात्र यावेळीदेखील मागच्याच घटनांची पुनरावृत्ती झाली. आतापावेतो रविशंकर यांची लोकप्रियता खूपच वाढली होती. त्यामुळे 'अपराजितो' साठी सत्यजितना अपेक्षित होता तेवढा वेळ ते देऊ शकले नाहीत. 'My years with Apu' मध्ये सत्यजितनी लिहिले आहे, "अपराजितोमध्ये काही उणिवा राहून गेल्या व त्यापैकी एकीचे कारण रविशंकर हे होते. त्यांनी यावेळीदेखील सारे काम अतिशय घाईगडबडीत केले व त्यामुळे काही जागा - जेथे संगीत आवश्यक होते तशाच रिकाम्या राहून गेल्या. " 'अपराजितो' बंगाली प्रेक्षकांना फारसा रुचला नाही, सत्यजित राय यांनी यानंतर ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या 'जलसाघर' या कथेवर चित्रपट निर्माण करण्याची तयारी सुरू केली. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी त्यांनी छबी विश्वास या बंगालमधील श्रेष्ठ अभिनेत्यास करारबद्ध केले. मात्र चित्रपटाचे चित्रीकरण अर्ध्यातच असताना एक अनपेक्षित अडचण उभी राहिली. छबी विश्वास यांची भूमिका असलेला 'काबुलीवाला' या बंगाली चित्रपयला बर्लिन येथील महोत्सवात रौप्यपदक मिळाले. त्यासाठी छबी विश्वास यांना बर्लिनला जायचे होते. परत येताना त्यांनी युरोप पाहून येण्याचे ठरवले. त्यामुळे 'जलसाघर' चे काम तीन महिने रेंगाळले. एवढा वेळ