पान:निवडक अंतर्नाद.pdf/४५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपले युनिट बसवून ठेवणे राय यांना परवडण्यासारखे नव्हते, त्यांनी या वेळात 'परास पत्थर' या नावाचा एक चित्रपट तयार केला. यासाठी पुन्हा त्यांनी रविशंकर यांचेच संगीत घेतले. मात्र 'अपराजितो' प्रमाणे हा चित्रपटदेखील चालला नाही. त्यामुळे जेव्हा 'जलसाघर' ला संगीत देण्याची वेळ आली, तेव्हा संगीत देण्यासाठी त्यांनी रविशंकर यांना न बोलावता उस्ताद विलायत खां यांना पाचारण केले. राय यांनी या बदलामागची कारणे स्पष्टपणे सांगितलेली नाहीत, पण 'अपराजितो' च्या अपयशामुळे राय व रविशंकर यांच्यात थोडासा दुरावा, किमान मतभेद, निर्माण झाला असावा असे वाटते. रविशंकरही याबाबतीत कधी स्पष्टपणे बोललेले नाहीत. 'जलसाघर' ह्य संगीतमय चित्रपट असल्यामुळे त्याच्या संगीतासाठी बराच वेळ द्यावा लागणार होता व तो रविशंकर देणे शक्य दिसत नव्हते. त्यांच्या देश-परदेश दौऱ्यांतून त्यांना या गोष्टीसाठी वेळ मिळेल की नाही याची राय यांना शंका होती. एका संगीतप्रेमी व्यक्तीच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या या कथेत संगीताला फार मोठा वाव होता, चित्रपटात तीन मोठ्या संगीत मैफिलींचे चित्रण करावयाचे होते व ते कसेबसे 'उरकून घेणे सत्यजितना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी संगीतासाठी रविशंकर यांच्या तोडीचेच दुसरे कलाकार, उस्ताद विलायत खां यांना पाचारण केले. मात्र 'जलसाघर' या चित्रपटाची समीक्षकांनी स्तुती केली तरी तो चित्रपटदेखील फारसा लोकप्रिय झाला नाही. लागोपाठ तीन चित्रपटांना प्रेक्षकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही हे पाहून राय चिंतित झाले. यावेळी त्यांना पुन्हा विभूतीभूषण बंदोपाध्याय यांची आठवण झाली. त्यांनी अपूच्या कथानकावर 'अपूर संसार' या नावाचा तिसरा चित्रपट तयार करण्यास प्रारंभ केला, चित्रपटाचे शूटिंग संपत आल्यावर जेव्हा त्याच्या पार्श्वसंगीताचा विचार करण्याची वेळ आली तेव्हा राय यांच्या मनात प्रथम रविशंकर यांचेच नाव आले. याचे प्रमुख कारण म्हणजे आत्तापर्यंत आपण अपूच्या जीवनावर एक 'चित्रपट- त्रिवेणी' तयार करतो आहोत हे त्यांच्या ध्यानात आले होते. (पहिला चित्रपट काढताना असा विचार त्यांच्या मनात नव्हता.) 'अपूर संसार' हा जरी स्वतंत्र चित्रपट म्हणून पाहता येतो, तरी पाहणाऱ्यांच्या मनात पहिल्या दोन चित्रपटांची पार्श्वभूमी तयार असेल तर तो मनावर अधिक परिणाम करतो. सुख आणि दुःख, मिलन आणि वियोग यांचे जीवनात चालू असलेले अविरत चक्र, आशा व निराशेच्या आवर्तनातून पुढे प्रवास करणारे मानवी जीवन अशी या तिन्ही चित्रपटांत अनेक महत्त्वाची व समान आशयसूत्रे आहेत, हे ध्यानात घेता त्यांचे संगीतही एका धाग्याने गुंफलेले असावे असा विचार राय यांनी केला. त्यांनी पुन्हा एकदा रविशंकर यांना संगीत देण्यासाठी बोलावून घेतले. मात्र यावेळी पूर्वीच्या दोन चित्रपटांसारखी घाई मुळीच करायची नाही हे दोघांनीही ठरवले. दोघांनी निवांतपणे सिनेमातील महत्त्वाच्या प्रसंगांवर चर्चा केली. संगीताचा कसा, कुठे आणि किती वापर करता येईल हे ठरवले आणि त्याप्रमाणे तीन पूर्ण शिफ्टमध्ये रेकॉर्डिंगचे काम करण्यात आले. आज 'अपु त्रिवेणी' [Apu Trilogy] ही जगातील सर्वोत्तम चित्रपट त्रिवेणी मानली जाते. या त्रिवेणीच्या यशात रविशंकर यांच्या संगीताचा फार मोठा वाटा आहे. 'अपूर संसार' च्या संगीताबद्दल रायदेखील खूप समाधानी होते. त्याचे मनापासून कौतुक करताना त्यांनी लिहिले आहे, "संगीताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा 'अपूर संसार'मधील एक प्रसंग मला आठवतो. अपर्णाच्या मृत्यूनंतर अपू जंगलात निरुद्देश भटकत असतो. एके दिवशी तो आपण लिहीत असलेल्या कादंबरीची पाने टेकडीवरून खाली सोडून देतो. या प्रसंगासाठी रविशंकर यांनी तयार केलेले संगीत ऐकताना वेदांतील ऋचांची आठवण होते. " १९५९ साली राय यांनी प्रभात मुखर्जी यांच्या कथेवर आधारित 'देवी' या चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्यास प्रारंभ केला. मात्र या चित्रपटाला संगीत देण्यासाठी त्यांनी अली अकबर खां यांची निवड केली. त्यानंतरचा त्यांचा चित्रपट 'तीन कन्या' या हा १९६१ साली प्रदर्शित झाला. चित्रपटासाठी राय यांनी स्वतःच संगीत तयार केले. येथून पुढे त्यांच्या शेवटच्या चित्रपटापर्यंत आपल्या सिनेमातील संगीताची धुरा त्यांनीच वाहिली. यामुळे 'अपूर संसार' नंतर हे दोन महान कलावंत पुन्हा कोणत्याही चित्रपटात एकत्र आले नाहीत. राय यांनी स्वतःच संगीत देण्यास सुरुवात केली याबद्दल अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली. सुप्रसिद्ध संगीतकार वनराज भाटीया यांनी या निर्णयाला 'An expression of ego' असे नाव दिले. राय हे 'one man show' करत आहेत अशीही टीका त्यांनी केली. परंतु याच भाटीयांनी जेव्हा राय यांनी दिलेले चारुलता चे संगीत ऐकले तेव्हा मात्र आपले मत त्यांनी बदलले, "राय यांच्या 'चारुलता' चे संगीत चित्रपटाच्या सौंदर्यात लक्षणीय भर घालणारे आहे. जसे संगीत त्यांनी तयार केले तसे क्वचितच कुणा संगीतकाराने तयार केले असते.” असे मत त्यांनी मांडले. या संदर्भात राय यांची भूमिका स्पष्ट होती. Some aspects of my craft या लेखात त्यांनी लिहिले आहे. 'तीन कन्या' पासून मी स्वतःच्या चित्रपटांना स्वतःच संगीत देऊ लागलो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या मनात संगीताच्या संदर्भात असंख्य कल्पना येत आणि इतर संगीतकारांना खूप काही सूचना दिलेल्या आवडत नाहीत. [They resent being guided too much.]" " सत्यजित यांनी १९६० नंतर त्यांच्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी आपल्याला बोलावले नाही याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे रविशंकर यांनी सतत टाळले आहे. एका मुलाखतीत या संदर्भात बोलताना ते फक्त म्हणाले, " 'पाथेर पांचाली' ला खूप पारितोषिके मिळाली. यानंतर सत्यजित यांनी माझ्या संगीतात सुधारणा करण्यास सुरुवात केली. " [He started adjusting my scores.] राय यांनी वापरलेला 'resent' आणि रवी बाबूंचा 'adjust' हे दोन्ही शब्द वेगवेगळे असले तरी ते एकाच अर्थाकडे बोट दाखवतात. आणखी एकदा रविशंकर यांना आडवळणाने विचारले गेले निवडक अंतर्नाद • ४५७