पान:निवडक अंतर्नाद.pdf/४५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या काळात रविशंकर यांचे संगीताच्या क्षेत्रात बरेच नाव झाले होते. त्यामुळे सत्यजित यांना असे वाटणे स्वाभाविक आहे. सत्यजित राय यांनी रविशंकर यांना थोडक्यात चित्रपटाची कथा सांगितली व ती आपण कशा प्रकारे चित्रित करत आहोत हेही सांगितले. ही कादंबरी ज्यावेळी 'भारतवर्ष' मधून क्रमशः प्रकाशित होत होती त्यावेळीच रविशंकर यांनी ती वाचलेली होती. ती त्यांना अतिशय आवडलेलीदेखील होती. त्यांनी सत्यजित राय यांना सांगितले, की ते 'पाथेर पांचाली' चित्रपटाचा जेवढा भाग पूर्ण झाला आहे तेवढा पाहू इच्छितात. त्यानुसार 'भवानी' टॉकीजमध्ये एका 'शो' चे आयोजन करण्यात आले. ( एखाद्या घटनेसंबंधी त्यात गुंतलेल्या व्यक्ती जेव्हा स्वतंत्रपणे काही सांगू लागतात तेव्हा त्यांच्या तपशिलात काही फरक आपोआपच पडतात, हे फरक का पडतात हा मानसशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे बरे, दोघांपैकी कुणालाही 'खोटे' सांगावयाचे असते असे नव्हे सत्यजित राय यांनी या संदर्भात लिहिले आहे, 'रविशंकर यांनी मूळ पुस्तक वाचलेले नव्हते, पण त्यांना त्याची महती माहीत होती व सर्वसाधारण कथानक ठाऊक होते.') रविशंकर यांनी कादंबरी पूर्वी वाचली होती आणि ती त्यांच्या पक्की स्मृतीत होती याचा एक परिणाम असा झाला, की राय यांनी संगीताचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर त्यांचे मन अभावितपणे त्याच कथानकाचा विचार करू लागले आणि अचानक कादंबरीच्या आशयाशी मिळत्याजुळत्या अशा एका संगीतरचनेने त्यांच्या मनात आकार घेतला. सत्यजित यांनी या संदर्भात लिहिले आहे, "पाथेर पांचालीची मुख्य थीम म्हणून आज जी प्रसिद्ध झाली आहे, ती बासरीवर वाजवलेली संगीतरचना चित्रपट पाहण्यापूर्वीच रविशंकर यांच्या मनात तयार होती. It was certainly a stroke of inspiration." ही अप्रतिम रचना ऐकून सत्यजित अतिशय प्रभावित झाले. रविशंकर आपल्या चित्रपटाला न्याय देऊ शकतील याची खात्री त्यांना वाटू लागली, रविशंकर त्यावेळी फक्त दोन दिवसांसाठी कलकत्त्याला आलेले होते. दुसरे म्हणजे 'पाथेर पांचाली' च्या अमेरिकेतील प्रदर्शनाची तारीखदेखील निश्चित झालेली होती व त्यासाठी आता वेळ फार कमी उरला होता. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना या चित्रपटातील काही महत्त्वाच्या प्रसंगांच्या रशेस दाखवण्यात आल्या. त्याच दिवशी संध्याकाळी चित्रपटाचे संगीत रेकॉर्ड करण्याचे ठरले. रविशंकर यांनी संगीतासाठी भारतीय वाद्येच उपयोगात आणण्याचे ठरवले होते. त्यानुसार सत्यजित राय यांचे सहकारी अलोक डे हे सतार, बासरी, तर शहनाई व काही वाद्ये आणि वादक घेऊन आले. अलोक डे हे स्वतः अतिशय उत्तम बासरीवादक होते. सत्यजित राय यांना संगीताची उत्तम जाण असल्यामुळे एक गोष्ट अशी घडली होती, की काही ठळक प्रसंगांना पार्श्वसंगीत कसे असावे याच्या काही कल्पना त्यांच्या मनात तयार होत्या. त्या त्यांनी रविशंकर यांना सांगितल्या. सुमारे सहा प्रसंग असे होते, की जेथे योजनापूर्वक संगीताचा उपयोग करावयाचा होता. हरिहरची मुलगी दुर्गा हिच्या मृत्यूनंतरचा प्रसंग हे त्यांपैकी एक महत्वाचे उदाहरण, दुर्गा मरण पावते त्यावेळी हरिहर गावाला गेलेला असतो. परत आल्यावर पत्नीच्या रडण्यातून त्याला समजते, की आपली मुलगी आपल्याला कायमची सोडून गेली आहे. या प्रसंगात आईने केलेला विलाप का कुणास ठाऊक सत्यजितना खटकत होता. तिच्या रडण्याऐवजी तिला मूक ठेवावे व पार्श्वभूमीला तार शहनाईचा उपयोग करावा अशी कल्पना त्यांच्या मनात आली. रविशंकर यांनी या प्रसंगासाठी अतिशय प्रभावी असा संगीताचा तुकडा तयार केला. चित्रपट पाहताना सर्वाजयाचे दुःख आपल्या काळजात घुसते ते या संगीताला सोबत घेऊनच आणि मन शतशः विदीर्ण होते. रविशंकर एकेका प्रसंगासाठी संगीत तयार करावयाचे. आलोक डे त्याचे नोटेशन उतरून घ्यायचे, आपल्या वादकांना समजावून सांगायचे आणि तो तुकडा रेकॉर्ड व्हायचा. असा हा विलक्षण खेळ संध्याकाळी सहा वाजता सुरू झाला तो सलग अकरा तास चालू होता. चित्रपयच्या इतिहासात क्वचितच दुसऱ्या एखाद्या सिनेमाचे संगीत अशा प्रकारे तयार केले गेले असेल ! झपाटल्यासारखे सारे जण काम करत होते, जुलै १९६६ मध्ये 'Montage' या पत्रिकेला मुलाखत देताना रविशंकर यांनी याबाबतीत सविस्तर चर्चा केली आहे. ते म्हणतात, "विभूतिभूषण यांनी शब्दांतून जी धून निर्माण केली होती ती मी संगीतातून पुनरावृत्त करण्याचा प्रयत्न केला. थिएटरच्या अंधारात मी ज्यावेळी हा मूक चित्रपट पाहत होतो त्यावेळी माझ्या मनात त्याला अनुरूप असे संगीत तयार होत होते.” संवादांना अतिशय कमी महत्त्व देऊन प्रसंगांच्या दृष्यात्मकतेवर भर द्यायचा हा विचार राय यांच्या मनात सतत होता. संवाद नसलेले प्रसंग 'रिकामे' वाटू नयेत आणि त्यांचे सौंदर्य अधिक खुलावे यासाठी त्यांना पार्श्वसंगीत वापरायचे होते. रविशंकर यांनी ही संकल्पना अचूक ओळखली. 'पाथेर पांचाली' मध्ये अनेक जागा संगीताने अविस्मरणीय बनवल्या आहेत. हरिहर हा कामाच्या शोधात गावोगाव फिरत असताना घरी त्याची पत्नी मुले अर्धपोटी असतात. अशावेळी अचानक त्याचे पत्र येते. आपल्याला काही पैसे मिळाले आहेत व आपण लवकरच घरी परतणार आहोत असे त्याने पत्रात लिहिलेले असते, त्याची पत्नी सर्वाजया ते पत्र वाचते आणि जगण्याची एक नवी उमेद तिच्या मनात जन्म घेते. तिला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होतो. अशावेळी • रविशंकर पार्श्वभूमीला सतारीची एक हळुवार धून सुरू करतात. मनातला आनंद हळूहळू विस्तारत जातो. सर्वांजयाच्या चेहऱ्यावर जलाशयाच्या लाटा सत्यजित सुपर इम्पोज करतात. पावसाचे थेंब येण्यास सुरुवात झालेली असते. आकाशात ढग दाटून आलेले असतात. जलाशयात पडणाऱ्या थेंबांसोबत लहान लहान कीटकांचे नर्तन सुरू झालेले असते. उडता उडता कीटक पाण्याला स्पर्श करतात आणि पाण्यावर नाजूक तरंग उठतात. आता सतारीची लय वाढते. निसर्गातही नव्या मोसमाची सुरुवात झालेली असते. माणसाच्या मनात निर्माण झालेल्या आनंदाला निसर्ग साथ देत असतो आणि आपण निवडक अंतर्नाद ४५५