पान:निवडक अंतर्नाद.pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठीपणाचे वैश्विक आयाम ज्ञानेश्वर मुळे आपले मराठीपण जपताना सगळे जग आपल्याविरुद्ध कट करते आहे, अशी भावना पराकोटीची धोकादायक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, एकच व्यक्ती अनेक अस्मिता घेऊन जगत असते. आपण सगळे मराठी बाण्याचा अभिमान बाळगतो, तरी आपले नागरिकत्व व म्हणून पासपोर्ट भारतीय आहे हे विसरून कसे चालेल? शिवाय, जगाच्या कोणत्याही देशातील प्रवेशद्वारावर आपले स्वागत भारतीय म्हणूनच होईल. मराठी म्हणून नव्हे. मालदीवमध्ये उच्चायुक्त म्हणून रुजू होताच, काही महिन्यांत अनपेक्षित अशा एका विषयावर निर्णय घेण्याची पाळी आली. दक्षिण भारताच्या एका विशिष्ट राज्याच्या/ भाषेच्या जनतेच्या संघटनेने मालदीवमध्ये सामाजिक/सांस्कृतिक संस्था म्हणून नोंदवण्यासाठी परवानगी मागितली. एरवी अशी परवानगी देण्यासाठी उच्चायुक्त कार्यालयाकडे येण्याची गरज नसते, कारण नोंदणीसाठी स्थानिक प्रशासनाकडे अर्ज करायचा असतो. आमच्याकडे परवानगी मागण्याचे एक विशिष्ट कारण होते. मालदीवमध्ये संपूर्ण भारतीयांसाठी आम्ही 'इंडिया क्लब' नावाची सांस्कृतिक संस्था चालवतो. मालदीवमध्ये भारतीयांची संख्या साधारण तीस हजार असावी, यात प्रामुख्याने केरळ, तामिळनाडू या राज्यांचे लोक असले, तरी इतर अनेक राज्यांतील लोकांची, तुरळक का असेना, संख्या आहे. मालदीव या छोट्या देशात भारतीयांच्या अनेक संस्था होऊन त्यांच्यात फूट पडू नये, या उद्देशाने मी प्रादेशिक किंवा भाषिक तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन द्यायचे नाही, असे ठरवले होते. एक दोन संस्था (मंडळे) अस्तित्वात होत्या. त्यांना मी नम्रपणे पण स्पष्ट सांगितले होते, "तुमच्या संस्था अनौपचारिक पद्धतीने चालू राहिल्या, तर आमची ना नाही; पण संस्थेच्या कार्यक्रमात उच्चायुक्त कार्यालयाचा सहभाग किंवा पाठिंबा हवा असेल, तर कार्यक्रम इंडिया क्लब' च्या छत्राखाली व्हायला हवेत. शिवाय, 'इंडिया क्लब' या नावाखाली कार्यक्रम नसेल, तर मालदीवमधल्या महत्त्वाच्या व्यक्तींना बोलावण्यासाठी उच्चायुक्त किंवा त्यांचे कार्यालय मदत करणार नाही. आपण सगळे भारतीय आहोत. स्थानिक लोकांना आपला परिचय 'भारतीय' म्हणून व्हायला हवा; एक मराठी, तमीळ, बंगाली किंवा मल्याळी म्हणून नव्हे.” हे औषध कडू होते. शिवाय जगभर पसरलेले भारतीयही आपापल्या प्रांतीय किंवा भाषिक गटातच जगतात. पण सुदैवाने माझ्या प्रस्तावात चुकीचे काहीच नव्हते. शिवाय, काही महिन्यांतच 'इंडिया क्लब' तर्फे आम्ही घेतलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाने संपूर्ण मालदीवचे लक्ष वेधून घेतले. आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणे राष्ट्राध्यक्षांपासून मंत्र्यांपर्यंत प्रत्येकालाच प्रतिष्ठेचे वाटू लागले. माझ्या विचारांना सुरुवातीला •असणारा विरोध ठिसूळ झाला, कार्यक्रमात सर्वांचाच सहभाग वाढला. शिवाय, आम्ही पोंगल, ओनम यांसारखे प्रादेशिक उत्सव बंद केले नाहीत, तर ते देशाचे उत्सव म्हणून साजरे केले. प्रादेशिकतेला राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा आणि राष्ट्रीयतेला प्रादेशिक पातळीपर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न यशस्वी झाला होता. या पार्श्वभूमीवर संस्था नोंदणीच्या नव्या प्रकरणाने एक छोटेसे वादळच निर्माण केले. गंमत म्हणजे, त्या संस्थेचे मुख्यालय भारतात नसून अमेरिकेत आहे आणि तिच्या शाखा जगभर पसरलेल्या आहेत. आपली एक अधिकृत शाखा मालदीवमध्ये असावी, असा त्यांचा रास्त आग्रह होता. त्यांच्या दुर्दैवाने मी उच्चायुक्त होतो. मी स्थानिक सरकारला आधीच सांगून ठेवले होते, की आमचा हा छोटा भारतीय समुदाय आहे, त्याची प्रातिनिधिक संस्था एकच असेल. दुसऱ्या कोणत्याही संस्थेला परवानगी देण्यापूर्वी आम्हांला जरूर विश्वासात घ्या; कारण त्यांच्या उपक्रमाची जबाबदारी उच्चायुक्त कार्यालय घेणार नाही. पूर्ण विचारान्ती आणि माझ्या विचारांना (कदाचित) शह देण्यासाठीही या नव्या संस्थेच्या नोंदणीचा प्रस्ताव काही भारतीय बांधवांनी केला असावा. स्थानिक प्रशासनाने त्यांना उच्चायुक्तांचे 'ना हरकत पत्र आणायला सांगितले आणि तो अर्ज माझ्या टेबलावर आला. माझे मत मी स्पष्ट नोंदवले, "सर्व भारतीयांसाठी कार्य करणारी संस्था व्यवस्थित चालली असताना, शिवाय, या संस्थेत प्रादेशिक व भाषिक अस्मितांना पूर्ण न्याय देण्याची क्षमता असताना पूर्णपणे प्रादेशिक स्वरूपाची एक नवीन संस्था सुरू करणे भारतीय समाजाच्या एकोप्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. सबब, या संस्था नोंदणीला आमची मान्यता नाही." माझ्या या निर्णयानंतर वेगवेगळ्या पद्धतीने माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, पण मी त्याला दाद दिली नाही. काही महिन्यांनंतर दबाव आणू पाहणाऱ्यांची सहनशीलता संपली व दबाव थांबला. निवडक अंतर्नाद ३६९