पान:निवडक अंतर्नाद.pdf/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या संपूर्ण प्रकरणात मला काही मूलभूत गोष्टी सर्वांना पटवून द्यायच्या होत्या. आपली प्रादेशिक किंवा भाषिक अस्मिता जागी ठेवणे गरजेचे आहे; पण त्याचबरोबर राष्ट्रीय अस्मिता अधिकाधिक सुदृढ करणे आवश्यक आहे. आपल्या राज्याबाहेर किंवा देशाबाहेर तर हे तत्त्व अधिकाधिक चांगल्या पद्धतीने जपायला हवे. पण अस्मितेचा प्रश्न फक्त राष्ट्रीय अस्मिता सुदृढ केल्याने संपत नाही. राष्ट्राच्या पुढे अनेक दुवे पसरलेले आहेत. आसपासची राष्ट्रे आणि त्यांना जोडून असणारी राष्ट्रे यांचा खंड बनलेला आहे. अशा पाच खंडांचा आणि त्यांना चहूबाजूंनी जोडणाऱ्या महासागरांचा मिळून जो भू-जल प्रदेश आहे, ते आपले जग आहे. शिवाय, वैयक्तिक जीवनात ज्याचा आपला संबंध येण्याची शक्यता नाही, पण पंचमहाभूतांद्वारे ज्यांच्याशी आपण जोडले गेलो आहोत, ते अवकाश आणि ब्रह्मांड यांचे व आपलेही खूप खोल असे नाते आहे. ज्ञान, विज्ञान, पर्यटन, शिक्षण, तंत्रज्ञान व संपर्क- माध्यमे यांच्यामुळे झपाट्याने ज्या जगाबरोबर आपण जोडले जात आहोत आणि परस्परावलंबन हे जिथे एकमेव सूत्र आहे, तिथे स्थानिक व राष्ट्रीय अस्मिता कितपत टिकाऊ आहेत? थोडक्यात, स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व वैश्विक हे सर्वच आयाम अधिकाधिक दृश्य स्वरूपात जीवनाला प्रभावित करत असताना, फक्त प्रादेशिक भाषिक (किंवा राष्ट्रीय) अशा अस्मितांना नेमके कसे तोलायचे, मापायचे? माझ्या परीने माझे मराठीपण टिकवत मी कशा पद्धतीने अनुभवातून शिकत गेलो, हे मागे वळून बघणे गमतीचे ठरेल. एका पातळीवर मी अस्सल मराठी आहे आणि एका पातळीवर मी अस्सल वैश्विकही झालो आहे विदेश सेवेत रुजू झालो, तेव्हा माझे प्रत्येक वाक्य 'आमच्या कोल्हापुरात किंवा आमच्या महाराष्ट्रात...' असेच सुरू व्हायचे. आज त्यातला कडवा प्रादेशिक डंख जाऊन तिथे मराठीपणाचा मोगरी सुगंध आहे; पण त्याचबरोबर हे सगळे जगच आपल्याला आंदण मिळालेले आहे, अशी संपूर्ण जगाबद्दलची आपुलकी व आस्थेची भावनाही रुजली आहे. मी पंचविसाव्या वर्षी महाराष्ट्राबाहेर आणि लगेचच देशाबाहेर पाऊल टाकले. जपान माझ्या मुक्कामातला पहिला देश. तिथे माझी तीन रूपे मी पाहिली दूतावासात भारताच्या विविध राज्यांचे लोक होते, बोली भाषा हिंदी व कार्यालयीन भाषा इंग्रजी तिथे एक भारतीय हीच माझी ओळख होती. मला जपानी भाषा शिकण्याचे कामही होते. माझ्या जपानी शाळेत शिक्षक जपानी, तर विद्यार्थी जगातल्या वेगवेगळ्या देशांचे होते. तिथे माझी मूलभूत ओळख भारतीय होती, मराठीपण केव्हाच सूक्ष्म झाले होते. हळूहळू या पलीकडच्या जगाशीही आपले नाते आहे, याचा मधुर प्रत्यय आला. तिथे माझ्या मराठी आणि भारतीय या दोन्ही ओळखींना संदर्भ होता; पण मर्यादित महत्त्व व अर्थ होता. याशिवाय, सुट्टीच्या वेळी मी आमच्या मराठी मित्रमंडळींना भेटत असे. मंत्री, बापट, देवरे, अरोंदेकर, कुलकर्णी अशा आपल्याच देशी बांधवांना भेटताना काही काळ महाराष्ट्रात गेल्यासारखे वाटे; पण कुणाच्याही घराच्या खिडकीतून बाहेर डोकावले, की तोक्योच्या त्या इमारतींच्या ३७० निवडक अंतर्नाद जंगलात आमच्या मराठीपणाच्या मर्यादा लक्षात यायच्या. पण खिडकी बंद करताच आमच्या गप्पांत आचार्य अत्रे, व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, कुमारगंधर्व, तुकाराम, शिवाजीमहाराज अवतीर्ण व्हायचे. 'ब्रह्मविद्येचा सुकाळु' व्हायचा आणि 'मी मराठी' ची खुमखुमी स्पष्ट दिसायची. पण आपापल्या घरी जाताना भुयारी रेल्वेत किंवा चारचाकीत बसले, की कळायचे, 'अहा! ते सुंदर दिन हरपले. स्वतःच्या अस्तित्वाच्या गुंतागुंतीचे स्वरूप लक्षात यायचे. काही काळाने आम्ही अलगद तोक्योकर होऊन जायचो. माझ्या हेही लक्षात आले, की आमची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी आम्ही सप्ताहान्तात एकत्र येत होतो; पण आमच्या मराठीपणाच्या सीमा स्पष्ट होत्या. दरम्यान आमच्या नकळत भोवतालच्या जपानी संस्कृतीतील घटक भाषा, चालीरीती, शिस्त, इकेबाना, बोन्साइ, सगळेच - आमच्या मराठी बालेकिल्ल्यातून आत झिरपत होते. आम्ही थोडे मराठी होतो, थोडे जपानीसुद्धा ! आमचा परीघ असा विस्तारत होता. मॉस्कोच्या वास्तव्यात रशियन संस्कृतीही आमच्या मनाचे कवच तोडून आत घुसली, ताजमह्यलची आठवण जशी भारावून टाकते, तशीच मला क्रेमलिनची आठवण येते. तिथे मी असताना घडत असलेल्या पेरेस्रोइका आणि ग्लासनोस्तचा क्रांतिकारी काळ होता. ते बघताना जाणवलेले थ्रिल आपल्या बांधवांना सांगणे ही मनाची गरज होती. मी दैनिक सकाळला 'रशियाचे अंतरंग' ही मालिका सुरू केली. मराठीत विचार करण्यात, लिहिण्यात एक नैसर्गिक आनंद होता. याच दरम्यान मॉस्कोत आम्ही आंतरराष्ट्रीय मराठी परिषद भरवली. या परिषदेत मराठी संस्कृती, इतिहास, समाजजीवन वगैरेंचा अभ्यास करणारे जगभरचे वीसेक अभ्यासक आले. त्या अभ्यासकांत जितके मराठी - मराठी होते, तितकेच विदेशी मराठी होते. हे विदेशी मराठी भारतीय नव्हते; पण मराठी संस्कृती हा त्यांच्या प्रेमाचा, विषय होता. मराठीपणाचा कट्टर पुरस्कार करणाऱ्यांनी आपल्या प्रेमाचा एक हिस्सा या अभ्यासकांना देणे आवश्यक आहे, तरच 'मराठीपण काय आहे, हे जगाला कळू शकेल. अभ्यासाचा त्यानंतर मी मॉरिशसला होतो. तिथे १९ व २०व्या शतकात गेलेल्या मराठी माणसांच्या वंशजांची संख्या लाखभर आहे. आपण या मराठी लोकांना विसरलो असलो व या जनतेनेही चरितार्थासाठी फ्रेंच, क्रिओल व इंग्रजी भाषा शिकल्या असल्या, तरी 'मराठीपण' जपण्यासाठी ते देत असलेली झुंज युद्धावर लढणाऱ्या जवानांसारखी आहे. त्यांची भजने, शाहिरी, लावण्या, शिवजयंती, एवढेच काय, १९व्या शतकातल्या महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या विवाहप्रथेनुसार होणारी लग्ने - प्रत्येक गोष्टीत मराठी अस्मिता जपण्यासाठी त्यांची चाललेली लढाई वाखाणण्यासारखी होती. माझ्यावर या लोकांचे खूप प्रेम; पण ते मला 'मराठी' उपउच्चायुक्त असे म्हणायचे, ते मला रुचायचे नाही, कारण एक भारतीय उपउच्चायुक्त या नात्याने मला तिथल्या समस्त मॉरिशन जनतेशी संपर्क ठेवणे आवश्यक होते. त्यात तमिळ, भोजपुरी,