पान:निवडक अंतर्नाद.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साहब मिले सबूरी में.... विनय सहस्रबुद्धे सभोवती सिनिसिझमचा अंधार काठोकाठ भरू पाहत असताना आणि मूल्ये, निष्ठा, व्रत वगैरे शब्दावली बाद होत असताना, "मीच का म्हणून चांगलं वागायचं?” या प्रश्नाचा नाग कार्यकर्त्याच्या मनात घर करून बसला नसेल, तरच नवल. कार्यकर्त्याला या प्रश्नाचे प्रामाणिक, पटणारे आणि पेलता येणारे उत्तर हवे आहे. ब्रिटनमधील प्रमुख राजकीय पक्षांना कार्यकर्ते मिळत नसल्याबद्दलची एक बातमी मध्यंतरी वाचनात आली. अर्थात, कार्यकर्त्यांची ही टंचाई केवळ ब्रिटनपुरती मर्यादित नाही. जगभरातल्या सर्वच लोकशाही देशांमधील राजकीय पक्षांपुढे स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या निष्ठावान आणि निरपेक्ष वृत्तीच्या कार्यकर्त्यांचा अभाव हे अलीकडच्या काळातले एक मोठे संकट आहे. भारतातले राजकीय पक्ष हेही याला अपवाद नाहीत. निवडणुका जिंकून येनकेनप्रकारेण सत्तेवर येणे, एवढा एकच कार्यक्रम झाल्यापासून 'राजकीय कार्यकर्ता' नावाच्या संस्थेला कसर लागणे सुरू झाले. राजकारणात अगदी ठरवून, टप्प्या- टप्प्याने 'करियर'च्या पायऱ्या चढण्याच्या इराद्याने येणारी मंडळी वगळता, निखळपणे विचारांशी बांधिलकी मानून काम करणारा समूह गेल्या काही वर्षांत आक्रसत गेला आहे. सांप्रतच्या पक्षीय राजकारणात आजमितीस 'परिवर्तन' वगैरेची भाषा फारशा गांभीर्याने कोणी वापरतानाही दिसत नाही. भारतातल्या आणि जगातील अन्य देशांमधल्याही राजकीय पक्षांच्या बाबतीत विचारसरणीचा लोप हे स्वयंस्फूर्त आणि कार्यकर्ताधिष्ठित सक्रियता कमी होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणता येईल. पूर्वी सरधोपटपणे 'डावे' आणि 'उजवे' अशी राजकीय विचारधारांची व पक्षांचीही विभागणी होई. त्यामुळे पक्षांना आपली अशी ओळखही असे. 'पोलिटिकली करेक्ट' राहण्याच्या दडपणाखाली गेल्या वीस-पंचवीस वर्षांत जगभरातली राजकीय मंडळी सुरुवातीला आपणही प्रस्थापित विरोधी म्हणजेच डावे असल्याचा आणि आता जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर डावे वगैरे नसून मध्यममार्गी असल्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दावा करू लागली आहेत. या सगळ्या परिस्थितीत वैचारिक गोंधळाची एवढी बजबजपुरी माजली आहे, की वैचारिक प्रेरणा नावाचा विषयच लोप पावावा! अर्थात, हा गोंधळ केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून समाजकारण, सांस्कृतिक जीवन, संस्था जीवन इ. सर्वांनाच या गोंधळाने पुरते ग्रासले आहे. ग्रंथालये, सहकारी पतपेढ्या, शिक्षण ३४८ निवडक अंतर्नाद संस्था इ. चालविणारी कार्यकर्ती अथवा पदाधिकारी मंडळी या संस्था वा संघटना नेमक्या कशासाठी चालवतात? संस्थांचे औपचारिक उद्देश स्पष्टच असतात, पण त्यांच्या 'चालवण्यासाठी' धडपडणारी माणसे नेमक्या कोणत्या प्रेरणेने काम करतात ? त्यांच्यासमोर काही ठोस उद्दिष्टे आहेत का? संस्थाजीवनाबद्दल व त्या त्या संस्था ज्या क्षेत्रात काम करताहेत त्या क्षेत्रांबद्दल त्यांच्या काही निश्चित कल्पना आहेत का? की इथेही फक्त सत्तेचेच आकर्षण आहे? व्हिजिटिंग कार्डावरच्या मजकुरात भर पाडण्यापलीकडे त्या कार्यकर्त्याला खरेच आणि नेहमीच काही मिळवायचे असते? संस्था आणि संघटनांमधील कार्यकर्ते आणि त्यांच्या प्रेरणा यांच्या संदर्भात साहित्य आणि नाट्य संमेलनांच्या वेळी बरीच चर्चा घडून येते. असे उत्सवी कार्यक्रम ज्यांच्या भरवशावरच यशस्वी होऊ शकतात अशा शिस्तीच्या पडद्याआड राहण्यात कमीपणा न मानणाऱ्या, खऱ्या निरपेक्षवृत्तीच्या कार्यकर्त्यांची संख्या तिथेही दिवसेंदिवस कमीच होतेय. आज ज्याला 'चमकेश वृत्ती' म्हणतात ती 'तेवढेच ज्ञानप्रकाशात ही प्रेरणा आजच्या जमान्यात ठळकपणे पुढे येते, हा सार्वत्रिक अनुभव आहे राजकीय व सामाजिक संस्था-संघटनांपेक्षा स्वयंसेवी संस्थांची स्थिती खूप काही वेगळी नाही. या क्षेत्रात व्यवसायनिष्ठेचा किंवा प्रोफेशनॅलिझमचा खूप बोलबाला आहे व त्यात तसे गैर काही नाही. पण हीच व्यवसायनिष्ठा कधीकधी विशुद्ध व्यापारी दृष्टिकोनात रूपांतरित होते, तेव्हा स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या प्रेरणांचा विषय चर्चेत येणे क्रमप्राप्तच होते. राजकीय पक्षांच्या बाबतीत निवडणुका जिंकण्याचे तंत्र आत्मसात करणे जसे महत्वाचे ठरते, तसेच स्वयंसेवी कामाच्या क्षेत्रात सरकारी वा देशी-परदेशी धनदात्यांकडून निधी मिळविण्याचे तंत्र महत्त्वाचे ठरते. तंत्राची मातब्बरी वाढली, की नि:स्वार्थ भावनेतून स्वयंस्फूर्ततेने करावयाच्या सेवेचा मंत्र क्षीण होणे हे ओघाने आलेच, थोडक्यात काय, तर राजकीय पक्ष, सामाजिक संस्था-संघटना