पान:निवडक अंतर्नाद.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घेतलेली एक विद्यार्थिनी, खूप वर्षांनी मला भेटली. ती सांगत होती तिच्या घराबद्दल खूप मोठी जमीन होती तिच्या नवऱ्याची. त्यातला बराचसा भाग त्यांनी विकला, वगैरे मी ऐकत होते. तेवढ्यात ती म्हणाली, "आम्ही खरं म्हणजे हिंदू माणसालाच आमची जमीन विकली होती. पण त्यानं एका मुसलमानाला ती विकली यात आमचा काय दोष? लोक म्हणतात, 'अशी कशी तुम्ही मुसलमानाला जमीन विकलीत?' आम्ही नाही हो बाई विकली. खरं सांगा, आम्ही कधीतरी मुसलमानाला जमीन विकू का?" हे सारं सांगत असताना तिला मुळीच जाणवलं नाही की आपण असं बोलायला नको, निदान या बाईंजवळ तरी, मला राग नाही आला तिचा पण जातिद्वेष किती रोमारोमांत भिनलाय हे जाणवून दुःख मात्र झालं. निवृत्त झाल्यावर पुण्याला स्थायिक व्हायचं आम्ही ठरवलं. पुण्यात घर शोधण्याची मोहीम हाती घेतली. पुण्यातील काही प्रतिष्ठित बिल्डर्सना आम्ही भेटलो. आपण बांधत असलेल्या सदनिकांची तत्परतेनं माहिती देणाऱ्या बिल्डर्सनी 'शेख' हे आडनाव ऐकताच, 'आमच्याकडे सध्या एकही फ्लॅट शिल्लक नाही. सॉरी.' असं म्हणून आमची बोळवण केली. तुमच्या अधर्मामुळे आम्ही तुम्हाला फ्लॅट देऊ शकत नाही असं उघडपणे त्यांनी सांगितलं नाही, हा त्यांचा सभ्यपणा ! अर्थात आम्हाला पुण्यात फ्लॅट मिळाला तो आमच्या बिल्डरच्या उदारमतवादामुळे, हेही इथं सांगायला हवं. पुण्यात जनगणनेच्या वेळी आलेल्या अनुभवाचं तर हसूच येतं. जनगणना करायला आलेल्या गृहस्थाला आम्ही घरात बसायला सांगितलं. चहा देऊन त्याचं स्वागत केलं. तो म्हणालाही, "अहो, पुष्कळसे लोक घरातही घेत नाहीत. दारातच उभं करतात. उभ्याउभ्याच आम्हाला फॉर्म भरायला लागतो. चहा- पाणी तर सोडाच !” माहिती सांगत असताना 'शेख' हे आडनाव सांगितल्यावर 'धर्म, मुस्लीम' असं म्हणून तो त्याच्याजवळच्या फॉर्मवर नोंदणी करू लागला. मी म्हटलं, "थांबा. मी ज्यू आहे. माझी नोंद करताना 'ज्यू' हा धर्म लिहा." त्यानं चमत्कारिक दृष्टीनं माझ्याकडे पाहिलं. "असं कसं? तुम्ही नवराबायको आहात ना?” मी त्याला समजावून सांगितलं, "शेख मुस्लीम आहेत, पण मी ज्यू आहे. " मी धर्मांतर केलं नसल्याचं सांगितल्यावर तो म्हणाला, "या फॉर्ममध्ये 'ज्यू' किंवा 'इस्राएल' धर्माचा उल्लेखच नाही. त्यामुळे त्यासाठी कोड नंबर नाही." त्यानं असं म्हटल्यावर मी तो फॉर्म पाहिला. त्यात हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन इत्यादी धर्मांच्या नोंदीपुढे कोड नंबर होते. पण त्यात पारशी, ज्यू (इस्राएल) या धर्मांचा अंतर्भावच केलेला नव्हता! (भारतात कमी संख्येनं का असेनात, पण ज्यू व पारशी असूनही!) पुढे तो फॉर्म भरू लागला- मातृभाषा, "उर्दू" त्याला पुन्हा आम्ही दोघांनी अडवलं. “आमची मातृभाषा मराठी आहे,” असं आम्ही दोघांनी त्याला निक्षून सांगितलं. त्याच्या नजरेत अविश्वास ओतप्रोत भरला होता. तो उत्तरला, "असं कसं? तुम्ही मुस्लीम आह्यत ना ? तुमची मातृभाषा उर्दूच आहे." आम्ही दोघांनी पुन्हा एकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की, "आम्ही महाराष्ट्रीय आहोत. आमची मातृभाषा 'मराठी' आहे." यावर त्याने काय उत्तर द्यावं? " मी जर मातृभाषा मराठी असं लिहिलं तर आमचे साहेब माझ्यावर रागावतील." मी त्याला ठामपणे सांगितलं, "तुमचे साहेब रागावण्याचा इथं प्रश्नच नाही. आणि ते रागावले तर रागावले. आम्ही जी माहिती सांगतो आहोत, ती खरी आहे, आणि तुम्हाला या फॉर्मवर आमची मातृभाषा 'मराठी'च नोंदवायला हवी. " आमच्या घराबाहेर पडल्यावर त्या गृहस्थानं 'साहेबा'च्या भीतीने काही बदल केला किंवा काय हे कळलं नाही. उर्दू भाषा आपल्याला काही प्रमाणात समजते, उर्दू भाषकांशी आपण संवाद साधू शकतो तो हिंदीच्या द्वारा, पण महाराष्ट्रात जन्मलेल्या, तेथेच सगळी हयात काढलेल्या मराठीतच व्यवहार करणाऱ्या आम्हा दोघांची मातृभाषा उर्दू कशी ? महाराष्ट्रातल्या मुस्लिमानं 'मी महाराष्ट्रीय आहे, मराठी माझी मातृभाषा आहे असं मानलं तर त्याला विरोध का व्हावा? आम्ही लग्न केलं नोंदणी पद्धतीनं धर्मान्तर करण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या सासरच्या लोकांनीही आग्रह धरला नाही. लग्नापूर्वी आम्ही नाशिकला होतो. लग्नानंतरही आम्ही नाशिकला होतो, तिथे कधीही धर्मभेदामुळे आमच्या वाट्याला उद्देगजनक अनुभव आले नाहीत. त्या काळी सामान्य समाजाच्या मनात जातीय तेढ आजच्या इतकी तीव्र नव्हती, हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन इत्यादी एकमेकांच्या धर्मभावना जपण्याचे प्रयत्न करत 'परधर्मसहिष्णुता' हा शब्द लोकांना त्या काळी माहीतही नव्हता, पण त्याच्या कृतीतून परधर्मसहिष्णुता व्यक्त होत असे. आजच्याप्रमाणे जातीयवादाला राजकीय गोटातून खतपाणी घातलं जात नव्हतं. मला आठवतं, नाशिकच्या माझ्या एका हिंदू मैत्रिणीची आजी सांगायची, “मोहरमच्या दिवशी आमच्या मुसलमान शेजाऱ्यांप्रमाणे आम्ही 'खिचडा' करायचो. फरक एवढाच की आमचा खिचडा बिनमटणाचा असायचा. " या तिच्या उद्गारातून त्या काळात समाजात धार्मिक सलोखा कितीतरी अधिक प्रमाणात होता हे लक्षात येतं. आजही कित्येक जण आमच्याशी वागताना कोणताही दुजाभाव दाखवत नाहीत हे मला सांगायलाच हवं. आमच्या दोन्ही कन्यांचे विवाह हिंदू तरुणांशी झाले आणि पराकोटीचं सामंजस्य त्यांच्या आणि आमच्याही अनुभवाला आलं. मी कॉलेजात शिकवत असताना माझ्या सहकाऱ्यांकडूनही मोलाचा स्नेह मला लाभला. आज जेव्हा मी माझ्या मित्रपरिवाराचा विचार करते, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की त्यात हिंदू स्नेहीच अधिक आहेत. आणि माझ्या स्नेह्यांनी परिचितांनी जातिद्वेषानं मला नाकारलं, डावललं असं कधीच घडलं नाही. व्यक्तिगत पातळीवर अनुभवायला येणारं सौहार्द सार्वजनिक पातळीवरही जाणवायला हवं असं मला मनापासून वाटतं. ( ऑगस्ट २००२) निवडक अंतर्नाद ● ३४७