पान:निवडक अंतर्नाद.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मला कळेना. त्यांच्या ओळखीच्या एका सद्गृहस्थानं त्यांची एका अपरिचित व्यक्तीशी ओळख करून देताना म्हटलं, "हे अमुक अमुक प्रोफेसर, मुस्लीम असले तरी सभ्य आहेत बरं का!” आणि असं म्हणताना आपण त्या प्राध्यापकाचा किती अपमान करत आहोत याची जाणीवही त्या सद्गृहस्थाला झाली नाही! मला आलेले काही मजेदार अनुभव इथं सांगावेसे वाटतात. एखाद्या अपरिचित व्यक्तीशी बोलत असताना माझं आडनाव कळल्यावर अनेकांनी कौतुकाने उद्गार काढले आहेत, "अरे वा! तुम्ही मुसलमान असून किती सुंदर मराठी बोलता हो!” 'मुसलमानांनी चांगलं मराठी बोलू नये की काय ! ' माझ्या मनात येई. खरं म्हणजे, सुंदर वगैरे काही नाही. महाराष्ट्रीय (पुणेरी ) मनुष्य जसं बोलतो, तसं मराठी मी बोलते, त्यात कौतुक कसलं? मी उत्तर देई, "त्यात एवढं आश्चर्य काय आहे! मी महाराष्ट्रीय आहे.” त्यावर कित्येक जणांच्या भाबड्या प्रतिक्रिया अशा - "तुम्ही मुस्लीम आहात ना? मग महाराष्ट्रीय कशा?" माझं उत्तर असं - "अहो, मी महाराष्ट्रात जन्मले, वाढले. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले. मराठी घेऊन बी.ए., एम. ए. केलं. माझी मातृभाषा मराठी आहे” माझं हे उत्तर ऐकल्यावर काहींच्या चेहऱ्यावर कौतुकमिश्रित आश्चर्य दिसायचं, काहींना माझं म्हणणं थोडंफार पटल्यासारखं वाययचं, पण बहुतेक जणांच्या मुद्रेवर मी सांगतेय यांच्यातील खरेपणाबद्दल साशंकता उमटलेली स्पष्ट दिसायची. कॉलेजमध्ये शिकवत असताना काही गमतीदार अनुभव मला आले. त्या वेळेला एफ वाय. ची मुलं शाळेतून कॉलेजात आलेली असत. पहिल्या दिवशी एफ वाय. च्या वर्गात मी प्रवेश करणार इतक्यात वर्गापाशी प्राध्यापकांची वाट पाहत उभे असलेले एक- दोन विद्यार्थी यायचे. इंग्लिशमध्ये म्हणायचे, "Miss, this is not a French Class." fhd "This is not an English class." त्यांना वाटायचं, ह्या बाई चुकून मराठीच्या वर्गाकडे आल्या आहेत. कदाचित त्यांना माझं आडनाव कळल्यामुळे ह्या बाई मराठी विषयाच्या असणं शक्य नाही असं त्यांना मनापासून वाटत असावं किंवा कदाचित मराठी शिकवणाऱ्या बाईंबद्दल त्यांच्या मनात जी प्रतिमा असेल, त्याहून मी वेगळी दिसत असली पाहिजे! मी हसून म्हणायची, "मला माहीत आहे. हा मराठीचा वर्ग आहे ना?” मात्र व्याख्यानाला सुरुवात झाली की हळूहळू त्यांचे साशंक चेहरे बदलत जायचे. मला जाणवायचं त्यांच्या प्रतिक्रियांवरून- 'ह्या आपल्यातल्याच.' विद्यार्थी अगदी सहजपणे माझा स्वीकार करायचे. माझ्या आडनावामुळे माझ्याविषयी काही प्रतिकूल प्रतिक्रिया माझ्या विद्यार्थ्यांनी (एक-दोन अपवाद वगळता) व्यक्त केली असं माझ्या वाट्याला आलं नाही. ते अपवादात्मक अनुभवही सांगितल्याशिवाय राहवत नाही. १९६५चं युद्ध सुरू झालं त्यावेळची ही हकीकत. स्टाफरूममधून मी तळमजल्यावरच्या माझ्या वर्गांवर जात होते. ३४६ निवडक अंतर्नाद वाटेत कॉरिडॉरमध्ये विद्यार्थ्यांचा घोळका मला दिसला, माझ्या मराठीच्या वर्गात नसलेले ते विद्यार्थी होते. मला पाहताच त्यातील दोन-तीन विद्यार्थी मला ऐकू येईल इतक्या मोठ्यानं कुजबुजले, "पाकिस्तानी! पाकिस्तानी !” मी चमकले थबकले. त्यांच्याजवळ जाऊन मी विचारलं, "तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणताहात?" सगळे गप्प. ते एकमेकांकडे पाहू लागले. जी मुलं 'पाकिस्तानी' म्हणून कुजबुजली होती, तीही बोलेनात, मी थोडा वेळ थांबले. तरीही मुलं काही बोलेनात! मी त्यांना म्हटलं, "हे बघा, मी पाकिस्तानी नाही. तुम्ही जितके भारतीय आहात, तितकीच मी भारतीय आहे, समजलं?" 'शेख' आडनावाचा असाही एक प्रताप ! दुसरा एक अनुभव माझी कन्या रुकसाना हिनं अकरावी नंतर माझ्याच कॉलेजात आर्टसला प्रवेश घेतला होता. त्या वर्गावरचा माझा पहिलाच तास होता. 'शेख मॅडम' आपल्याला मराठी शिकवायला येणार हे विद्यार्थ्यांना कळलं होतं. माझी मुलगी ज्या बाकावर बसली होती, त्याच बाकावर एक मुलगी बसली होती. दोघींची ओळख नव्हती. ती माझ्या मुलीला म्हणाली, "बाप रे! ही कोण मुसलमान बाई आपल्याला मराठी शिकवणार आहे! वैताग !!" यावर रुकसाना काहीच बोलली नाही. मात्र तिला वाईट वाटलं. तिचा चेहरा पडला पण ते त्या मुलीच्या लक्षातही आलं नाही. ती मुसलमान बाई माझी आई आहे असं जर माझ्या मुलीनं तिला सांगितलं असतं तर काय झालं असतं, कुणास ठाऊक ! (हे सारं माझ्या मुलीनं मला घरी आल्यावर सांगितलं.) माझं त्या मुलीला आवडलं असावं. तसं तिनं रुकसानाजवळ बोलूनही दाखवलं. तरीही माझ्या मुलीनं, त्या बाई माझ्या आई आहेत असं तिला सांगितलं नाही, तसं तिला सांगावसं तिला वाटलं नाही, हेच खरं, मीही माझ्या वर्तनातून, बोलण्यातून मला तिचं मत कळलं आहे असं सूचितही केलं नाही. तिला केव्हातरी आमचं नातं कळलं असणार, पण तिनं कधी बोलून दाखवलं नाही. व्याख्यान - त्या वर्षाच्या शेवटी एक दिवस ती स्टाफरूममध्ये माझ्याकडे आली. पुढच्या वर्षाला ती दुसऱ्या गावाला जाणार होती आणि तिथल्या कॉलेजात ती नाव नोंदवणार होती. माझ्याकडे पाहून ती गोड हसली, म्हणाली, "बाई, मला तुमचा autograph हवाय. मला आवडणाऱ्या सर्व प्रोफसरांचे मी autograph घेणार आहे. " मी नुसतीच सही करणार होते, हे तिच्या लक्षात आलं. ती झटकन म्हणाली, "बाई नुसती सही करू नका, संदेश द्या." माझ्या कन्येनं मला तिचे पहिल्या दिवशी काढलेले माझ्याविषयीचे उद्गार सांगितले होते, त्याची मला आठवण झाली. मला हसू आलं. तिच्या वहीत मी लिहिलं - "कुणाविषयीही मत बनवताना मन पूर्वग्रहदूषित ठेवू नका. आपल्याला आलेल्या अनुभवावरून आपलं मत निश्चित करा.” खाली सही केली. मी तिच्याकडे पाहिलं, ती किंचित लाजली. पण मी हसत होते. हस्तांदोलनासाठी मी हात पुढे केला. प्रेमानं तिनं माझा हात हातात घेतला. ती प्रसन्न हसली. माझ्यावर खूप लोभ असलेली, बी.ए.ला मराठी स्पेशल