पान:निवडक अंतर्नाद.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेख आडनाव आणि मी यास्मिन शेख गप्पा चालू असताना एकदम तिनं विचारलं, 'तुमचं आडनाव काय?' मी आडनाव सांगितलं आणि काय आश्चर्य ! एकदम चित्र पालटलं! बाईनं झटकन तोंड फिरवलं. इतका वेळ ती मला चिकटून बसली होती, ती थोडं अंतर ठेवून बसली. सात-आठ वर्षांपूर्वीचा प्रसंग डेक्कन क्वीननं आम्ही दोघं पुण्याला येत होतो. आम्हाला दोघांनाही खिडकी जवळच्या समोरासमोरच्या जागा मिळाल्या होत्या. बाहेरची दृश्यं पाहण्यात माझं मन गुंतलं होतं. रेल्वे लाइनच्या बाजूनं वाढलेली झोपडपट्टी, सांडपाणी वाहून नेणारी तिथली उघडी गटारं, वाऱ्यानं सर्वभर उडणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, उकिरड्यावरचा ओंगळ, शिसारी आणणारा कचरा... मनात अनेक प्रश्न गर्दी करत होते. माणसाची अगतिकता! गलिच्छ वस्तीत नाइलाजानं राहणारी, जगणारी माणसं, हेच वास्तव स्वीकारून त्यातच समाधान मानत असतील? त्याच घाणीत खेळणारी, •बागडणारी त्यांची उघडी नागडी मुलं सारंच दृश्य मन उदास करणारं होतं, उद्विग्नता आणणारं होतं. बाहेर पाहण्यापेक्षा रेल्वेच्या डब्यात आपल्या अवतीभोवतीची माणसं पाहणं, जमल्यास एखाद्याशी संवाद साधणं बरं, असं वाटून मी माझी नजर आत वळवली. इतक्यात माझ्या कानावर एका छोट्या मुलाचा आवाज आला - 'मला खिडकीजवळ बसायचंय...' माझ्या शेजारी बसलेल्या एका तरुण जोडप्याचा तीन चार वर्षांचा मुलगा हट्ट करत होता. आई त्याला दटावत होती. माझ्या यजमानांचंही त्या मुलाकडे लक्ष गेलं. त्यांच्या लक्षात आलं की, त्या मुलाला आम्ही अडवलेल्या एका खिडकीपाशी बसायचं आहे. त्यांनी आपुलकीनं म्हटलं, "बेय, इकडे ये. इथं बस.” त्यांनी थोडं सरकून त्याला खिडकीपाशी बसायला जागा दिली. हळूहळू त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. तो मुलगाही त्यांना 'आजोबा' म्हणू लागला. त्यांच्या प्रश्नाला तत्परतेनं उत्तरं देऊ लागला. मी पाहिलं तर तो मधेच त्यांच्या मांडीवर बसे, मधेच खिडकीतून बाहेर गंमत बघे, दोघांची छान गट्टी जमली. माझ्याजवळ त्या मुलाची आई बसली होती. कुठल्यातरी वर्तमानपत्रातलं शब्दकोडं ती सोडवत होती, माझं लक्ष साहजिकच त्या शब्दकोड्याकडे गेलं. तिला एखाद्या शब्द अडला की ती थांबायची, विचार करायची, कोड्यातली तेवढी जागा रिकामी ठेवायची. दुसऱ्या शब्दाचा विचार करायची. ती एखाद्या शब्दावर अडली आहे हे ध्यानात आलं, की मी तिला शब्द सुचवायची. असे चार-पाच शब्द मी तिला सांगितले. ती अगदी खूष झाली. तिला माझ्याविषयी आपुलकी वाटू लागली हे तिच्या माझ्याशी चाललेल्या गप्पांवरून माझ्या ध्यानात आलं. आपण कोण, कुठले, आपण पुण्याला का जात आहोत, आपला मुलगा किती हुशार आहे, तो कसे कसे प्रश्न विचारतो, असं बरंच काही ती मला मोकळेपणाने सांगत होती. मी सारं काही कौतुकानं ऐकत होते, माझीही छान करमणूक होत होती. आमच्या दोघींच्या गप्पाही चांगल्या रंगल्या. तास-दीड तास कसा गेला हे कळलंसुद्धा नाही. गप्पा चालू असताना एकदम तिनं विचारलं, 'तुमचं आडनाव काय?' मी आडनाव सांगितलं आणि काय आश्चर्य! एकदम चित्र पालटलं नाटकात Transfer Scene व्हावा तसं! बाईनं झटकन तोंड फिरवलं. इतका वेळ ती मला चिकटून बसली होती, ती थोडं अंतर ठेवून बसली. पलीकडच्या खिडकीतून ती बाहेर पाहू लागली. बोलणं एकदम थांबलं. इतका वेळ माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारणारी ती बाई! माझा व तिचा काहीच संबंध नसल्यासारखं तिच्या वागण्यातून मला जाणवलं, खिडकीपाशी बसलेल्या मुलाला ती आपल्याकडे येण्यासाठी सांगू लागली. "पुरे झालं तुझं खिडकीजवळ बसणं. इकडे ये.” असं थोडं रागावल्यासारखं करून त्याला आपल्याजवळ बसण्याची तिनं खूण केली. तो ऐकेना तशी झटकन उठून तिनं त्याला अक्षरशः ओरबाडल्यासारखं उचललं आणि आपल्या मांडीवर बसवून "तुला किनई एक गंमत सांगते...” असं म्हणून त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. 'शेख' या आडनावाची ही किमया! मघाशी रेल्वेलाइनच्या कडेनं पाहिलेलं मन उद्दिग्न करणारं बाहेरचं जग आणि आता गाडीच्या डब्यात अनुभवलेली, मन विषण्ण करणारी, पूर्वग्रहदूषित मानसिकता! या दोहोंत अधिक दुःखदायक काय होतं? अशा प्रकारचे बरेच अनुभव मला आले. मलाच नव्हे, अनेकांना आले. माझ्या परिचयातील एका प्राध्यापकानं सांगितलेला किस्सा ऐकल्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हेच निवडक अंतर्नाद ३४५