पान:निवडक अंतर्नाद.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाळीत टाकणार नाही, नोकरीवरून काढणार नाही, अगर मला मानसन्मान मिळणार नाहीत असंही होणार नाही. उलट मी हिंदू धर्मावर जर पुन्हा पुन्हा तुटून पडलो, तर पुरोगामी म्हणून मला मान्यता मिळेल आणि कोणी सांगावं, मी थोर विचारवंतदेखील ठरेन! असं असूनही माझं हिंदुत्व मी नाकारावं असं मला वाटत नाही. उलट या हिंदू आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरेवर जेव्हा लोक तुटून पडतात, तिला अक्षरश: पायाखाली तुडवतात, तेव्हा तिची कड घ्यावी, तिच्यातही बरंच काही चांगलं आहे असं म्हणावं असं मला वाटतं. सुदैवानं या बाबतीत मी एकाकी नाही. कारण महाराष्ट्रातल्या व भारतातल्या अनेक समाजसुधारकांनादेखील असंच वाटत आलेलं आहे. जगन्नाथ शंकरशेट, बाळशास्त्री जांभेकर इत्यादी समाजाच्या नेत्यांनी हिंदू परंपरेतले दोष दूर करावे, असा प्रयत्न केला; पण त्यांनाही हिंदू परंपरेविषयी आत्मीयता व अभिमानही वाटत होता. हिंदू आध्यात्मिक-सांस्कृतिक परंपरेतली मूलतत्त्वं अत्यंत उदात्त आहेत, तिच्यातले दोष हे नंतर शिरलेले आहेत, अशी भूमिका त्यांनी घेतली. आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला; पण त्यांनी धर्म स्वीकारला तो बुद्धाचा आणि त्याचा आध्यात्मिक विचार आपल्या परंपरेत सामावून घ्यावा, असा प्रयत्न शंकराचार्यांसारख्या हिंदू विचारवंतांनी फार पूर्वीच केला होता. ह्या सगळ्यांना ही परंपरा पूर्णपणे अगर मूलत:देखील नाकारू नये, असं का वाटलं? या प्रश्नाची उत्तरं या सगळ्यांनी आपापल्या लेखांत अगर ग्रंथांत देऊन ठेवलेली आहेत. त्याची उजळणी न करताही परंपरा नाकारू नये असं मला का वाटतं तेवढं मी सांगतो. ख्रिस्ती, मुसलमान वगैरे अन्य धर्म सर्वज्ञ, सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान, न्यायी व दयाळू अशा परमेश्वराच्या अस्तित्वावर आधारलेले आहेत. हे अस्तित्व हा त्या धर्माचा पाया आहे. निदान माझ्या अल्पस्वल्प वाचनातून माझा तसा समज झालेला आहे. हिंदू आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरेतदेखील अशा परमेश्वराचं अस्तित्व अनुस्यूत आहे. पण त्याबरोबरच निर्गुण, निराकार ब्रह्माची संकल्पना अशा परमेश्वराचं अस्तित्व नाकारणारी आहे. निदान ती संकल्पना स्वीकारून परमेश्वराचं अस्तित्व नाकारणं माझ्यासारख्या नास्तिकाला शक्य आहे. पण मला हिंदू आध्यात्मिक परंपरेचं आकर्षण वाटतं ते आणखी दोन कारणांसाठी त्या परंपरेत परमेश्वराचं अस्तित्व नाकारूनही माणसाच्या मनाची एक आध्यात्मिक ओढ असते, त्याला आध्यात्मिक म्हणता येतील असे अनुभव येऊ शकतात हे मान्य करता येतं. प्रत्येक माणसाला आध्यात्मिक अनुभव येऊ शकतो, हे मान्य केल्यावर प्रत्येक माणसाच्या बाबतीत तो वेगवेगळा असू शकतो, सगळ्यांना एकच प्रकारचा आध्यात्मिक अनुभव येण्याची गरज नाही, हे मान्य करण्यात मला तरी कोणतीही अडचण दिसत नाही. म्हणून एकाच वेळी भक्तीसंप्रदाय व अद्वैत संप्रदाय असू शकतात हे हिंदू आध्यात्मिक परंपरा मान्य करू शकते, आध्यात्मिक अनुभवाची बहुविधता मान्य करणं हा एक क्रांतिकारक विचार आहे, असं मला वाटतं. हिंदू आध्यात्मिक परंपरा तो मान्य करते, म्हणून मी नास्तिक असूनही मला तिचं ३३६ • निवडक अंतर्नाद आकर्षण वाटतं. बहुविधतेला मान्यता देण्याची ही हिंदू परंपरेची प्रवृत्ती सर्वच क्षेत्रांत दिसून येते. एखाद्या सांस्कृतिक परंपरेत ज्ञानाची निरनिराळी क्षेत्रं, विविध कला इत्यादींचा विकास किती व कसा झाला, त्या परंपरेनं या विकासाला काही अडथळे निर्माण केले का हा माझ्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न आहे. आणि कोपर्निकस, गॅलिलिओ, डार्विन इत्यादींच्या शास्त्रीय सिद्धान्तांच्या स्वीकाराला जसा ख्रिस्ती परंपरेनं विरोध केला तसा या हिंदू परंपरेनं केलेला दिसत नाही. आर्यभयला त्याचं संशोधन करायला व सिद्धान्त मांडायला विरोध झाल्याची मला माहिती नाही. पाणिनी, आयुर्वेदाचे आचार्य, योगाचे प्रवर्तक इत्यादींना आपापल्या क्षेत्रातलं संशोधन करण्यास या परंपरेनं मोकळीक दिली. आणि कौटिल्याचं अर्थशास्त्र वा रतिशास्त्र यांच्याही मांडणीला कुठे अडथळा आलेला दिसत नाही. ज्याला आपण व्यसनीपणा म्हणू, त्याचाही प्रचार तांत्रिकांनी या परंपरेत केला. यापैकी अनेक बाबतीत अन्य काही परंपरांनी किती संकुचित भूमिका घेतली आणि किती अंधश्रद्धा दाखविली ते मी सांगितलं पाहिजे असं नाही. अशा प्रकारे ज्ञानाच्या क्षेत्रात स्वातंत्र्य व बहुविधता यांचा स्वीकार या परंपरेनं केलेला दिसतो. शास्त्रज्ञ बाजूला ठेवले तर सर्वसामान्य माणसाला जीवनाचं व नैतिक प्रश्नांचं आकलन करायला या हिंदू परंपरेत रामायण आणि महाभारत हे ग्रंथ शिकवतात आणि महाभारतात जे मानवी जीवनाचं बहुविध आणि विराट दर्शन घडतं, त्याची व्यामिश्रता आणि गुंतागुंत यांचा जो प्रत्यय येतो, त्यात निर्माण होणाऱ्या व्यावहारिक व नैतिक प्रश्नांची जी उकल होते, मानवी जीवनातल्या उत्तरं नसलेल्या प्रश्नांचं जे दर्शन घडतं, मानवी मनाचा जो सखोल वेध घेतला जातो, तो केवळ अपूर्व आहे. जगातल्या इतर कोणत्याही सांस्कृतिक परंपरेत जीवनाचं इतकं सर्वांगीण आकलन घडविणारा ग्रंथ असेल असं मला वाटत नाही. महाभारत ही जगाच्या साहित्यातील सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे, असं मला वाटतं. त्याबरोबरच जगाच्या साहित्यात ज्यांना मानाचं स्थान मिळेल अशा इतरही अनेक साहित्यकृती या परंपरेनं निर्माण केल्या आहेत. त्यामुळे ही परंपरा नाकारणं मला केवळ अशक्य वाटतं. ही परंपरा संपन्न करणारी आणि साहित्यिकाच्या दृष्टीनं बहुमोल असलेली आणखी एक गोष्ट म्हणजे या परंपरेतील पुराणकथांची व मिथकांची संपत्ती. या तोडीच्या पुराणकथा ग्रीक- रोमन परंपरेतदेखील इतक्या वैपुल्यानं नाहीत. या परंपरेतील देवळातील शिल्पकृती कलात्मक दृष्टीनं अपूर्व आहेत. त्यातल्या अनेक आधुनिक कलेतल्या अनेक प्रवृत्तींची आणि शैलींची पूर्वसूचना देणाऱ्या आहेत. तसंच त्यांचे विषय व विविधता पाहिली म्हणजे ही परंपरा किती खुली आणि किती स्वीकारशील व समावेशक आहे, त्याचा प्रत्यय येतो. हे अपूर्व कलावैभव ज्या परंपरेनं निर्माण केलं ती नाकारावी असं मला कसं वाटेल!