पान:निवडक अंतर्नाद.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यावर या परंपरेचे टीकाकार असं म्हणतील की, 'या सर्व गोष्टी आम्हालाही पुष्कळशा मान्य आहेत. पण या पूर्वीच्या गोष्टी झाल्या. आज या परंपरेतून काय निर्माण झालं आहे ते पाह्य, जातीपातींत विभागलेला, अस्पृश्यता मानणारा, विषमता पोसणारा, माणसांची मनं संकुचित करणारा आजचा भारतीय समाज या परंपरेचाच वारसा सांगतो. अशा परिस्थितीत ती नाकारणंच योग्य नाही का ?' यावर माझं उत्तर असं, की या परंपरेतल्या चांगल्या गोष्टींवर जरी बुरशी धरलेली असली तरी तिच्यातली मूळ गुण पूर्णपणे नष्ट झालेले नाहीत, याचं सर्वांत मोठं गमक हे की तिचं भीडभाड न ठेवता, सडेतोडपणे दोष-दिग्दर्शन करणारे टीकाकार स्वतःला हिंदू मानणारेच होते आणि आहेत. काही संत व विचारवंत टीका करीत नाहीत; पण त्या परंपरेतील काही गोष्टींच्या आधारेच समाजात मोठं परिवर्तन घडवून आणत आहेत. आणि त्यासाठी ते जी तंत्रं वापरत आहेत, ती याच परंपरेतील आहेत. इंग्रजांचं राज्य या देशात स्थिर होतं ना होतं तोच कलकत्ता आणि मुंबई या केंद्रांतले हिंदू विचारवंत त्यांच्या यशाला व भारतीयांच्या अपयशाला कोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या, याचा विचार करू लागले. त्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केली होती आणि आधुनिक पाश्चात्त्य विचारांशी व शास्त्रांशी त्यांचा परिचय झाला होता. त्याच्या आधारे आपल्या समाजातील दोषांचं त्यांनी अचूक निदान केलं आणि या समाजानं काय केलं पाहिजे तेदेखील लोकांच्या निदर्शनास आणलं. इतक्या सहजगत्या हे कसं झालं? अन्य परंपरा मानणाऱ्या लोकांनी असं का नाही केलं? मला वाटतं की स्वतंत्रपणे विचार करण्याची परंपरा या लोकांच्या रक्तात होती, बहुविधता मानण्याची त्यांना सवय होती, अनेक शतकं या प्रवृत्ती झाकोळल्या गेल्या असल्या तरी त्यांत धुगधुगी होती, म्हणून हे शक्य झालं. पुन्हा हे विचार व्यक्त केल्यावर लोकांनी त्यांना विरोध अवश्य केला पण दंगेधोपे करून त्यांनी ते मांडणाऱ्या लोकांना नष्ट अगर नेस्तनाबूत केलं नाही. सनातनी व सुधारक असा झगडा या समाजात अवश्य झाला. त्यानं अनेकदा तीव्र स्वरूप धारण केलं. पण एका मर्यादेपलीकडे तो गेला नाही. याचं श्रेय हिंदू परंपरेच्या सहिष्णुतेला दिलं पाहिजे असं मला वाटतं. केवळ इंग्रजांचं इथे राज्य होतं, सनातन्यांच्या हाती सत्ता नव्हती म्हणून असं झालं हे पटत नाही. कारण पूर्वी इंग्रजांचं राज्य नसताना वैष्णव संतांनी असंच एक परिवर्तन समाजात घडवून आणलं होतं. मी जेव्हा वाचन आणि विचार करू लागलो, तेव्हा सावरकर 'गाय हा केवळ एक उपयुक्त पशु आहे', 'अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे' असे विचार उघडपणे मांडत होते. ते झुणका-भाकर सहभोजन घडवून आणत होते. अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून चळवळ करीत होते. गांधी तर सतत रामाचं नाव जपत असत. आणि तरी अस्पृश्यतानिवारण हे धर्मविरोधी आहे, असं त्यांना वाटत नव्हतं. कर्व्यांच्या आश्रमात व शाळांत शिकलेल्या स्त्रिया धिटाईनं बायकांवर होणाऱ्या अन्यायांना वाचा फोडत होत्या. गांधीजींमुळे समाजसुधारणेचे विचार हळूहळू ग्रामीण भागातदेखील पोहोचत होते. आमचे बहुतेक मोठे साहित्यिक या आधुनिक विचारांनाच पाठिंबा देत होते. त्यातले कोणीच धर्मांतर करावं असं म्हणत नव्हते. अगर त्यांना धर्मांतर करायला कोणी भागही पाडत नव्हतं. उलट सर्व समाज हळूहळू त्यांचे विचार स्वीकारत होता. त्यामुळे मी सुधारकी विचारांचा असलो तरी त्यासाठी हिंदू परंपरा संपूर्णपणे नाकारावी असं मला कधीच वाटत नव्हतं. तरीपण सुधारकी विचारांचा जेव्हा मी प्रथम स्वीकार केला तेव्हा काही काळ या हिंदू परंपरेशी माझं काहीच नातं नाही, तसं नातं ठेवण्याची मला इच्छा नाही, अशीच माझी भूमिका होती. कोणतीच धार्मिक परंपरा मी मानत नाही, असं मी तेव्हा म्हणत असे आणि आजही देवळात जाणं, धार्मिक विधी करणं वगैरे संदर्भात मी निधर्मीच आहे पण मी कोण आहे, माणूस म्हणून आणि लेखक म्हणून मी कसा घडलो याचा मी जेव्हा विचार करतो, तेव्हा माझी इच्छा असो नसो, पण हिंदुत्व मला कसं चिकटलेलं आहे, त्यानं मला कसं घडवलं आहे, इतकंच नव्हे तर ते किती मोलाचं आहे, याची मला पुनः पुन्हा जाणीव होते. माझं चालणं, बोलणं, उठणं, बसणं, मला रुचणारं अन्न, माझ्या मानसिक प्रतिक्रिया, एखाद्या प्रश्नाला सामोरं जायची अगर त्याचा विचार करायची माझी पद्धत, माझी भाषा, माझी दिनचर्या या सगळ्या गोष्टी ज्या हिंदू ब्राह्मणी वातावरणात मी वाढलो त्यानं निश्चित केलेल्या आहेत. पुढे त्यात अनेक बदल झाले, अनेक नवे संस्कार माझ्यावर झाले हे खरं. पण तरी हे मूळचे संस्कार माझ्या व्यक्तिमत्त्वात किती खोलवर रुजलेले आहेत, ते मला पुन:पुन्हा जाणवतं. एक लेखक म्हणून मी कसा घडलो याचा मी विचार करतो तेव्हा हे हिंदुत्वाचे संस्कार मला अधिकच जाणवतात आणि मोलाचे वाटतात. मी ज्या भाषेत लिहितो ती बऱ्याच अंशी हिंदुत्वानं घडवलेली आहे. रामायण, महाभारत, पुराणं, लोककथा, भक्तिपरंपरा, शाहिरी साहित्य, पंडिती साहित्य इत्यादींनी तिची जडणघडण केलेली आहे. मी नास्तिक असलो तरी तुकाराम, नामदेव वगैरे संत जेव्हा विठूच्या नावाचा गजर करतात, तेव्हा माझं मन कसं भरून येतं, तो हिमालय, ती गंगा, ती यमुना, तो सह्याद्री, ती कृष्णा ही केवळ भौगोलिक अस्तित्वं आहेत, असं मला कधीच वाटू शकत नाही, त्यांना अनेक भावनिक व वैचारिक संदर्भ आहेत. भगवा रंग, भगवी वस्त्रं यांना माझ्या मनोविश्वात विशिष्ट भावनिक अर्थ आहे. 'समर्थचिया सेवका वक्र पाहें असं कोणी खणखणीत आवाजात म्हटलं की माझं मन थरारतं संस्कृतमधलं पठण माझ्या कानावर पडलं की, मी माझ्या प्राचीन परंपरेशी जोडला जातो आहे, असं मला जाणवतं. हे जसे संस्कार माझ्या मनावर आहेत, तसेच शेक्सपिअरचे, डिकन्सचे, टॉलस्टॉयचे असे अनेक संस्कार माझ्यावर झाले आहेत. पण हे सर्व संस्कार माझ्यापर्यंत जेव्हा पोहोचतात, तेव्हा त्यांना संदर्भ असतो माझ्या इथल्या मूळ संस्कारांचा आणि हे दोन्ही प्रकारचे संस्कार जेव्हा एकत्र येतात तेव्हाच सकस, माझं, वेगळं असं साहित्य निर्माण होऊ शकतं. मर्ढेकरांच्या बाबतीत असंच झालं आणि खाडिलकरांपर्यंत शेक्सपिअर पोहोचला तो • याच मार्गानं माझ्या कडू आणि गोड, बिनचेहेऱ्याची संध्याकाळ, निवडक अंतर्नाद ३३७