पान:निवडक अंतर्नाद.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय त्याकडे वळणार आहेत का? आमच्या प्राचीन परंपरेचे श्रेष्ठत्व आणि महत्त्व विदेशी अभ्यासकांच्या नजरेने पाहण्याची आणि त्यांच्या तोंडून ऐकण्याची आमची बुरसटलेली सवय घालवायची असेल तर आमच्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये जाग निर्माण करायला नको का ? उत्तम वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, अभियंता किंवा कलावंत होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढ्यात संस्कृत सरस्वतीने आपला खजिना रिता केला आहे. त्याकडे लक्ष जायला हवे आणि तो हस्तगत करण्याची इच्छाशक्ती हवी. हिरोशिमा विद्यापीठातल्या डॉ. ओगावा या संस्कृत अभ्यासकाने सांगितलेला हा किस्सा : दूरदर्शनवरील अमेरिकन वाहिनीवर अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका भारतीय संगणक तंत्रज्ञाची मुलाखत तो पाहात होता. त्या तंत्रज्ञाला त्याच्या यशाचे रहस्य विचारले, तेव्हा तो म्हणाला, "लहानपणी केलेल्या संस्कृत पाठांतराने माझ्या स्मरणशक्तीला धार आली आणि संस्कृतच्या अभ्यासाने माझ्या विचारांना शिस्त आणि प्रगल्भता आली." हा किस्सा सांगून ओगावा म्हणाले, "मी संस्कृत विषय निवडला याचा मला हे ऐकून आणखीच अभिमान वाटतोय.” हा अभिमान भारतीयांमध्ये उपजत असायला हवा, प्राचीन भारतीय ज्ञानविज्ञानाची श्रेष्ठता पश्चिमेकडून येणाऱ्या नवविचारांच्या वाऱ्यावर स्वार होऊन आमच्यापर्यंत पोचल्यावर आम्ही खडबडून जागे व्हावे का? क्वांटम फिजिक्सचा जनक, नोबेलपुरस्कार विजेता श्रोडिंजर जेव्हा उपनिषदांचा गौरव करीत म्हणतो, "जगाच्या उत्पत्तीच्या कोड्याचे उत्तर या वाड्मयात आढळेल", तेव्हाच आम्ही उपनिषदांच्या अभ्यासाकडे वळायचे का? साहित्यातले नोबेल पारितोषिक मिळवणारा अमेरिकन कवी टी. एस. इलियट जेव्हा म्हणतो, "प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान वाचल्यावर अमेरिकन तत्त्वज्ञ मला शाळकरी वाटले", तेव्हा 'तुझं आहे तुजपाशी' असा साक्षात्कार होत आम्ही आमच्याकडे दृष्टी वळवायची का? केंद्रशासनाचा 'राष्ट्रीय पांडुलिपी मिशन' हा, हस्तलिखितांच्या संरक्षण- जतनाचा प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून सक्षम नेतृत्वाअभावी रखडला आहे पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये अर्धशतकाहून अधिक काळ चालू असलेला संस्कृत कोशाचा ( Dictionary of Sanskrit on historical principles ) प्रकल्प असाच पुरेशा आर्थिक पाठबळविना मालवण्याच्या स्थितीत आहे. असे कितीतरी संस्कृतच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारे प्रकल्प बंद होण्याच्या वाटेवर आहेत. त्यांना आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जितका या दुर्दशेला जबाबदार आहे, तितकाच सामाजिक इच्छाशक्तीचा अभावही जबाबदार आहे. इटलीमधल्या सार्डीनिया बेटावर जर संस्कृतसमासरचनेवरच्या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन होऊ शकते तर आयआयटीमध्ये प्राचीन भारतीय तंत्रविज्ञानावर कार्यशाळेचे आयोजन का होऊ शकत नाही? काही वेळा असे प्रयत्न झालेले दिसतात, पण त्यांचा पाठपुरावा होताना दिसत नाही. आणि काही वेळा पाठपुरावा करणारे अतिराष्ट्रवादाच्या आहारी ३३० निवडक अंतर्नाद जाऊन प्राचीन भारतात नसलेले तंत्रज्ञान आणि विज्ञान शोधून काढू लागले आहेत! तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी एक किस्सा सांगितला तो असा : एकदा घरासमोरच्या बागेत पहाटे फेऱ्या मारत असताना त्यांचे शेजारी पलीकडच्या कुंपणातून म्हणाले, "अहो, मी काल बागेत दहा फूट खणल्यावर ही तार सापडली. प्राचीन काळी तारायंत्र असलं पाहिजे.” दुसऱ्या दिवशी पहाटे फिरताना ते भेटल्यावर तर्कतीर्थं त्यांना म्हणाले, "अहो, काल मीही माझ्या बागेत वीसफूट खोलपर्यंत खणल्यावर मला काहीच सापडले नाही. प्राचीन काळी बिनतारी तारायंत्र असले पाहिजे, " अतिराष्ट्रवादाच्या आहारी जाऊन प्राचीन भारतात संगणकासारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान शोधणारे यातून योग्य तो बोध घेतील असे वाटते. शेवटी, संस्कृत ही भारताची ओळख आहे. विशेषतः जागतिकीकरणानंतर, अवघ्या जगाचे सपाटीकरण झाल्यानंतर, जगाच्या नकाशावर ठळकपणे उठून दिसण्यासाठी अशी ओळख आवश्यक असते. भारताबाहेर भारताला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणारा हा समृद्ध वारसा आहे. काळाच्याही पुढे जाणारे विचार जिच्या कुशीत अजूनही दडले आहेत अशा संस्कृत भाषेचे, विद्येचे, संस्कृतीचे जतन लोकशक्ती एकवटून होणे गरजेचे आहे. केवळ शालेय पातळीवर संस्कृत शिकवून ही गरज भागणारी नाही. संस्कृतच्या विकासाच्या सर्वच प्रयत्नांत गुणवत्ता आणणे तितकेच गरजेचे आहे. यासाठी प्रज्ञावान कार्यक्षम आणि चारित्र्यसंपन्न नेतृत्व निर्माण करणे गरजेचे आहे. संभूय समुत्थान झाले तरच हे होऊ शकते. संस्कृतकडे पाहण्याचा दृष्टिकोन जसा रुक्ष व्यावहारिक नको, तसाच तो अतिराष्ट्रवादी श्रद्धेने भारलेलाही नको; तो यथार्थ हवा. तरीही संस्कृतप्रेमींनी निराश व्हायचे कारण नाही. जोवर माणसाला ज्ञानाची आस आहे, नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करण्याचा ध्यास आहे, परंपरेची कास आहे, जे जे भव्य उदात्त, सुंदर त्याविषयी ओढ आहे, नादमाधुर्याचे वेड आहे, चिरंतन गाठण्याची धडपड आहे, सुसंस्कृत होण्याची तळमळ • तोवर संस्कृत टिकणारच आहे. माणसाला जगण्यासाठी भाकरीइतकीच फुलाची गरज असते. संस्कृत हे एक फूल आहे, आजही टवटवीत, अनाघ्रात, सुगंधाने भरलेले, वैश्विक आशयाचा मकरंद निथळणारे. टीपा : १) ह्य लेख लिहीत असताना माझे संगणक अभियंता आणि संस्कृतप्रेमी असलेले स्नेही श्री. सलील कुलकर्णी यांचे मला पुष्कळ साहाय्य झाले. २) डॅनियल एच इंगाल्स ह्या गेल्या शतकातील हार्वर्ड विद्यापीठातील संस्कृतच्या प्राध्यापकांनी संस्कृत भाषेचे वर्णन 'परीकथेतील निद्रिस्त सुंदरी' असे केले आहे. या वर्णनावरून मला लेखाचे शीर्षक सुचले. (डॉ. भाटे पुणे विद्यापीठात संस्कृत विभागाच्या प्रमुख होत्या आणि लेखात उल्लेख केलेल्या बहुतेक आंतरराष्ट्रीय परिषदांमधे व प्रकल्पांमधे त्यांचा सहभाग होता आणि असतो.) (जून २०१७)