Jump to content

पान:निवडक अंतर्नाद.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिळून केलेला लेखनप्रवास माधुरी तळवलकर मासिक प्रकाशनाच्या जोडीने कथाशिबिरासारखे इतरही काही साहित्यिक उपक्रम अंतर्नादने वेळोवेळी राबवले. त्यात सहभागी असणाऱ्यांनी आपापले छोटे छोटे गट तयार गेले, गावोगावी त्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. त्यांतूनही काही जणांना वेगळ्या वाटा सापडत गेल्या. काही वर्षांपूर्वी अंतर्नाद मासिकातर्फे एक कथाशिबिर आयोजित केले होते. तिथे आमच्यासारख्या लेखकांनी अशी अडचण बोलून दाखवली की, 'आपली कथा सकस व्हावी असे आम्हाला वाटतेच. आम्ही आपल्या परीने आमच्या मनात जे असते, ते कथारूपात उतरवतोही. पण शेवटी ते दुसरी व्यक्ती जेव्हा वाचते, तेव्हा ते तिला कसे वाटते? असे विचार आमच्या मनात येत राहतात, ' बहुतेक सहभागी लेखकलेखिका वरील विचाराशी सहमत झाले. पण यावर उपाय काय काढ़ावा ते लक्षात येईना. मग अचानक मनात विचार आला - आपण आपल्याच कथेवर चर्चा केली तर ? आम्ही सातआठ लेखकलेखिकांनी मिळून त्या कथाशिबिरात असे ठरवले, की आता आपण आठपंधरा दिवसांतून एकदा भेटत जाऊ. येताना कुणीतरी एकाने नुकतीच लिहिलेली स्वतःची एक कथा आणायची, ती वाचून दाखवायची. ठरल्याप्रमाणे आम्ही एका बागेत अशा प्रकारे जमू लागलो. लक्षात आले, की अशा चर्चेचा लेखकाला पुष्कळच उपयोग होतोय. कथेचा रोख काय आहे, कथा कनव्हिन्सिंग वाटतेय का, तपशिलात काही चूक आहे का... अशा अनेक मुद्द्यांबाबत प्रत्येक जण आपापले मत या बैठकीत सांगत असे. कोणी काही बदल सुचवत असे. माझ्या असे लक्षात आले, की अगदी कोणतीही सूचना आपण स्वीकारली नाही तरी, ह्या निमित्ताने कथेविषयीच्या आपल्याच संकल्पना स्पष्ट व्हायला मदत होते आहे. मग हा प्रकार सगळ्यांनाच आवडू लागला. मात्र हा ग्रुप नंतर हळूहळू आकसू लागला. कुणाला ती वेळ जमायची नाही, कुणाचे दुसरे काही कारण असायचे. कुणी आपल्या कथेवर चर्चा झाल्यावर येईनासे झाले. पण आम्ही चौघीजणींनी मात्र एकमेकींना घट्ट धरून ठेवले. अनघा केसकर, ज्योती कानेटकर, योगिनी वेंगुर्लेकर आणि मी; अशा आम्ही चौघी नियमितपणे भेटत असू आमच्यापैकी कुणाला काही पुरस्कार मिळाला, पुस्तक प्रकाशित झाले, तर तिचे कौतुक करण्याच्या निमित्तानेही आम्ही भेटण्याची ही संधी घ्यायचो आणि मग घरी आरामात तीनचार तास उलटसुलट चर्चा व्हायची. कधी ज्या कथेवर चर्चा झाली असेल ती सुधारून, पुन्हा बाकीच्यांना पाठवून, आता कशी वाटतेय ते विचारले जायचे. कधी त्या चर्चा झालेल्या कथेचे संबंधित लेखिकेने पुढे काय केले, हे कळायचेही नाही. पण आम्हांला त्या कथेचे पुढे काय झाले यापेक्षा समोर आलेल्या कथेवर वेगवेगळ्या अंगाने विचार करण्यातच जास्त रस असायचा. अंतर्नादच्या या कथाशिबिराआधी आमचे एखाददुसरे पुस्तक प्रसिद्ध झालेले होते. आता आपल्या कथा प्रकाशनासाठी कुणाकडे पाठवाव्यात, यावरही आम्ही एकमेकींशी चर्चा करू लागलो. एकीला एक प्रकाशक चांगला वाटला की लगेच तिकडे बाकीच्यांनाही आपापले लेखन घेऊन पाठवणे चालू झाले. कधी कुणी गावाला गेलेली असताना तिच्या पुस्तकाची प्रुफे तयार झाली, तर तेवढ्यासाठी तिच्या पुस्तकाचे काम अडू नये म्हणून आमच्यापैकी दुसरी कुणीतरी ते तपासून देऊ लागली. कुणी जास्त काळासाठी परदेशी वगैरे जाणार असेल तर प्रकाशकाला सांगून, करारपत्रात तशी दुसऱ्या मैत्रिणीला ॲअॅथॉरिटी देऊन, तिची करारपत्रावर सहीसुद्धा घेतली जायची पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रकाशकाने आमच्याकडे पाठवले की, आम्ही ते एकमेकींना कॉम्प्युटरवर पाठवून कसे वाटते ते विचारू लागलो. थोडक्यात, एकीचे पुस्तक तयार होतानासुद्धा त्यात बाकीच्या तिघी सामील असायच्या. एक प्रकारे आम्ही एकमेकींच्या सहवासात लेखक म्हणून समृद्ध होत होतो. आणि आम्हा सर्वांनाच ते आवडत होते. अशातच अनघा केसकर या माझ्या मैत्रिणीला विश्वकर्मा प्रकाशनचा शोध लागला. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी या संस्थेने अलीकडेच प्रकाशन व्यवसाय मोठ्या धडाक्याने सुरू केल्याचे कळले. तिने त्यांच्याकडे तिचे दोन कथासंग्रह होतील इतक्या कथा दिल्या. मग आम्ही तिघीही पाठोपाठ आपापल्या कथा घेऊन विश्वकर्मा प्रकाशनच्या विशाल सोनी यांच्याकडे हजर झालो. त्यांची लेखकांशी वागण्याची पद्धत अपवादात्मक म्हणावी इतकी अदबशीर आणि चोख होती. सुदैवाने आम्हां सर्वांच्या निवडक अंतर्नाद ३३१