पान:निवडक अंतर्नाद.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाणीतून स्रवताना हृदयात शिरतं ऐकणाऱ्याच्या डोळ्यांवाटे झिरपतं फक्त एकदाच ऐकलंय मी त्यांचं भाषण. " अनेक बऱ्या-वाईंट लेखकांची चर्चा. खूप मंथन होत आहे. जिवाचे कान करून ऐकावसं वाटतंय. "बरं झालं तुम्ही एकट्या आलात. कशा मनसोक्त गप्पा मारता येत आहेत. दुसरं कुणी बरोबर आलं की ते नाही म्हटलं तरी वेगळंच. दारावरच्या कठोर घंटेनं तंद्री भंगते. "सहजच आलो होतो..." कन्नल मला न्यायला आलेले असतात तरी तसं म्हणणार कसं? त्यांची मदतीची भावना मला कळते, पण निघावंसं वाटत नाही. जोशीद्वयाला मी जावंसं वाटत नाही. गप्पा रूळ बदलतात. हास्यविनोद झडतात. खुलवून किस्से सांगितले जातात, श्री बा खदखदून हसत असतात. स्वतः भर घालतात. मागाहून कन्नल सांगतात, "सर, आज किती दिवसांनी हसत-बोलत होते. गप्पांत रमले होते. आनंदात डुबले होते...." पुढ्यात आलेलं फ्रुटसॅलड खाऊन कन्नल उठतात. मी तिथंच. "आता जेवायला चल हं. केव्हाचं पिठलं केलेलं गार होऊन गेलं पार, " बिंबाताईंच्या बोलण्यातला औपचारिक 'अहो' कधीच गळाला आहे तो गळतो, कारण तो त्या घरगुती जिव्हाळ्यात खड्यासाररखा टोचत आहे. डावं-उजवं वाढलेलं पान सजलेलं. दोन भाज्या, पिठलं, चपात्या, लोणीसाखर, भात, दही आणि काही काही मी संकोच बाजूला सारून पोटभर जेवते. जेवताना ओल्या हातानं, नंतर सुकल्या हातानं गप्पा अखंड चालूच. "मी काही कोणी विशेष लेखिका नाही. माझं लिखाणही उशिरा चालू झालेलं. तीन- चार पुस्तकं नशिबानं गाजली. आता आणखी लिहू की थांबू?" - मी मनापासून विचारते. "थांबायचं कशाला?" - बिंबाताई पटकन म्हणतात. "लिहीत राहा तू, छानच तर लिहितेस लोकांना आवडतं आणि इतर कुणी काय म्हणेल त्याकडे कशाला लक्ष द्यायचं?" "पण एकाच चाकोरीतलं लिहीत राहीनशी भीती वाटते.” माझी खोल शंका डोकं वर काढते. "आपण फार मोठी लेखिका नसल्याची जाणीव जोपर्यंत मनात जागी आहे, तोवर तुम्ही चांगलं लिहाल.” श्री. बा. गंभीरपणे म्हणतात. "तुमच्या अनुभवांमध्ये नावीन्य आहे सरळ, साध्या भाषेत ते वाचकापर्यंत पोहोचवण्याची ताकद आहे. जितके नवे प्रदेश वाचकांना दाखवाल, तेवढे थोडे " "पण प्रवासवर्णन हा कादंबरीसारखा सर्जनशील साहित्यप्रकार नाही. " "मग काय बिघडलं? - एक तर सर्जनशीलतेची अशी प्रतवारी नाही. तुम्हीही सच्चे अनुभव सच्चेपणानं पुढे मांडून जीवनाचं दर्शन घडवता. उत्तम कादंबरी तेच करते. त्यात कमीपणा नाही. पुढेमागे लिहावीशी वाटली तर कादंबरी जरूर लिहा. पण आता जमलेली भट्टी मोडू नका, हातचं लेखन सोडू नका. " मला पाहिजे होतं ते खरंखरं उत्तर मिळतं. त्याबरोबर "आगे बढो" चं आश्वासनही. अडीच वाजून गेलेले पाच मिनिटांसाठी टपकलेली मी तीन तास उलटलेले. ते दोघं थकले असतील. "झोपायचं असेल ना तुम्हाला ?” मी थोडं संकोचत म्हणते. "मी झोपत नाही दुपारचा तुम्ही आलात, एकट्या आलात, खूप बरं वाटलं.' "मी इथेच जरा लवंडते, तू बोल.” बिंबाताईंचं उत्तेजन. मग गप्पांना अंत कुठला. त्या घरगुती विषयावर वळतात. जड साहित्यचर्चा मागे पडते. "पाहुणे या विषयावर मी एक पुस्तक लिहीन, आम्ही इतकी वर्षं कलकत्त्याला होतो ना. काय काय अनुभव आलेत म्हणून सांगू या प्राण्याचे." लंडनला गेली पस्तीस वर्षं मीही या तापातून जात असते. आम्हा तिघांचे किती अनुभव किती सारखे! "एक पाहुणे आमच्याकडे दरवर्षी यायचे. मुक्काम ठोकून असायचे, " श्री. बा. सांगत असतात. "कलकत्त्याला असल्यानं आम्ही बंगाली मिठाई नेहमी खात असू. पण आंबाबर्फी, बुंदीचे लाडू अशा खास मराठी मिठाईची आठवण मला खूप येते, असं मी त्यांना म्हणालो. आजवर कधी कुणी तसली भेट आणायचे कष्ट घेतलेले नव्हते. "दुसऱ्या दिवशी सकाळी चहा करायला लवकर उठलो तर स्वयंपाकघरात मुंग्यांची रांग. तिचा उगम पाहुण्यांच्या होल्डॉलमधून, मी त्यांना तो दाखवल्यावर त्यांचा चेहरा कसासा झाला. त्यांनी होल्डॉल उघडला. त्यात लाडूंनी भरलेला भला मोठा डबा. त्यालाच मुंग्या लागलेल्या, तो उघडून त्या सद्गृहस्थांनी लाजेकाजेस्तव चार लाडू काढून हिच्याकडे दिले.” "पुढचे चार दिवस मी ते त्यांच्याच पानात वाढून टाकले...” बिंबाताई सूत्रपूर्ती करतात. त्यांचे लाडू खावेसे वाटत नव्हतं. आम्ही उष्टावलेही नाहीत, पण ते लक्षात येऊनही त्याचं त्यांना काही वाटलं नाही.” "ते असो, वर्षा आणि राहुलचं कसं चाललंय? कुठे असतात दोघे जण ? त्यांची लग्नाची पत्रिका खूप आवडली होती आम्हांला कितीतरी दिवस इथं समोरच ठेवली होती. त्यानंतर तुम्ही यालसं खूप वाटलं होतं. एकदा येणार असंही कळलं होतं, पण ते रद्द झाल्याचं समजलं. सगळे जण एकदम येण्यापेक्षा तुम्ही एकट्या यायला हव्या होत्या आम्हांला. ते आज जुळलं, फार बरं वाटलं. " येरझारांनी दमलेल्या बिंबाताई बैठक मारतात. पाय पुढे पसरून ते हातांनी दाबतात. खूप श्रमवलेलं दिसतंय मी आज. आले त्याचा त्रास झाला असणार, नको होतं का यायला? निवडक अंतर्नाद ३१