पान:निवडक अंतर्नाद.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्गाकडून होणारा विरोध आणि नियतीकडून जीवन कुंठित करून टाकणारे अडथळे वाट्याला येत गेल्यास माणसाचा जगण्यावरचा विश्वास उडतो. त्याची जिजीविषा क्षीण होते. अशा विरोधी परिस्थितीत जिद्दीने जगण्याची प्रेरणा जागृत ठेवण्याला शिकवणाऱ्या शहाणपणाची गरज असते. कुठलीही परिस्थिती असो माणसाने आपल्या जगण्यावर प्रेम केले पाहिजे, आपले जगणे नाकारण्याचा त्याला अधिकार नाही, हे जगण्याला आवश्यक असणारे पहिले सूत्र पाडगावकर आपल्या कवितेतून देतात. त्यांनी दिलेले हे सूत्र 'श्रेय' या त्यांच्या छोट्याश्या कवितेत व्यक्त झाले आहे. ते म्हणतात : 'कधी कधी सगळंच कसं चुकत जातं! । नको ते हातात येतं, । हवं ते हुकत जातं । अशा वेळी काय करावं ? । सुकलेल्या झाडाला । न बोलता पाणी द्यावं! ।' काहीही दोष नसतानाही जेव्हा माणसाच्या वाट्याला नको असलेल्या गोष्टी येतात तेव्हा तो वैतागतो, मनाला त्रास करून घेतो, आपल्या जीवनातील सुखशांती गमावतो आणि परिस्थितीला बोल लावत बसतो. परंतु त्याने असे काहीही न करता आणि बोलता ज्यामुळे 'जगणे' वाढेल, फुलेल - फळेल असे काही तरी केले पाहिजे! हे सांगण्यासाठी त्यांनी 'सुकलेल्या झाडाला पाणी देऊन ते जगवण्याचा वाढवण्याचा मार्ग अवलंबिला पाहिजे, हे व्यंजित करणारी 'सुकलेल्या झाडाला । न बोलता पाणी द्यावं!' ही अर्थपूर्ण प्रतिमा योजिली आहे. बोलगाण्यात वारंवार 'गाणे' ही सूत्रप्रतिमा येते. सुंदर असलेले माणसाचे जीवन आनंदमय करून जगण्यासाठी योजलेली ही सूत्रप्रतिमा आहे. माणसाला ज्या ज्या गोष्टी करण्यात आनंद वाटतो, त्या त्या त्याने करत राहून आपले जगणे आनंदमय केले पाहिजे. म्हणजेच आपले जगण्याचे त्याने 'गाणे बनवले पाहिजे. ज्यात माणसाला आनंद मिळतो ते करणे पाप आहे हे मानणारे एक 'म्हातारे' जग आपल्या भोवती आहे. ते जरी काहीही म्हणत असले तरी ज्यात आपल्याला आनंद मिळतो, ते ते करत राहून आपले जगणे आनंदमय बनवा, हे सांगताना - सिगारेट ओढणे, आमटीचा भुरका मारणे अशा दैनंदिन जीवनातील सामान्य गोष्टींचा उल्लेख 'यात काही पाप नाही' या कवितेत केला जातो. अशा गोष्टी करण्यात जर आनंद मिळत असेल तर या कवितेचा कथनकर्ता म्हणतो 'विश्वास ठेवा, यात काही पाप नाही! | आनंदाने जगायचं नाकारणं याचा सारखा आणि दुसरा शाप नाही!!' या कवितेतून हे सांगताना पाडगावकर माणसाच्या मूलभूत, नैसर्गिक प्रेरणांच्या तृप्तीला महत्त्व देतात. ज्या गोष्टी नैसर्गिक- स्वाभाविक आहेत त्या जरी रूढ नैतिकव्यवस्थेत 'पाप' मानल्या जात असल्या तरी त्या नैसर्गिक असल्यामुळे 'पाप' नाहीत, हे पाडगावकर सांगू पाहतात. म्हणूनच या कवितेचा कथनकर्ता एका 'अनैतिक' मानल्या जाणाऱ्या गोष्टीचा उल्लेख करतो. तो म्हणतो - 'नखऱ्याचं चालणं बघून तुमचं काळीज धडधडतं । आणि एक उनाड पाखरू । तुमच्या मनात फडफडतं!। विश्वास ठेवा, यात काही पाप नाही! । आनंदाने जगायचं नाकारणं याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही!!' येथे आकर्षक स्त्रीला बघून मनात 'उनाड पाखराचे फडफडणे कदाचित पारंपरिक दृष्टिकोनातून अनैतिक मानले जात असेल, तरीही ते पुरुषाच्या नैसर्गिक प्रेरणेतून घडलेले - असल्यामुळे त्यात 'काही पाप नाही. परंतु अशा स्त्रीच्या सुरक्षित अस्तित्वाला जर या प्रेरणेने धोका निर्माण केला तर ते मात्र 'पाप' ठरेल. येथे थोडे विषयांतर करुन नैतिक बोध देणारे वाङ्मय आणि शहाणपणाचे वाड्मय यांतला फरक स्पष्ट केला पाहिजे, नैतिक बोधपर वाङ्मयात व्यक्तिपरिस्थितिनिरपेक्ष परंतु सामाजिक स्वास्थ्याला पूरक पोषक असलेली नैतिकता पुरस्कारिली जाते. 'सदा सत्य बोला', 'परस्त्री मातेसमान माना', अशा स्वरूपाची नैतिक विधाने बोधपर वाड्मयात मांडली जातात. शहाणपण देणाऱ्या वाङ्मयात व्यक्तीच्या अस्तित्वाला, सुरक्षिततेला आणि सुखाला पूरक पोषक असणारे वर्तन पुरस्कारिले जाते. प्रत्येक व्यक्ती, तिला येणाऱ्या अनुभवांतून स्वतःचे अस्तित्व, सुरक्षितता आणि सुख या गोष्टी लक्षात घेऊन वर्तनाच्या पद्धती निश्चित करीत असते. उदाहरणार्थ, रस्त्यावर जर कोणी जखमी अवस्थेत पडलेला असेल तर त्याच्या साह्याला कुठलाही पादचारी सरसावत नाही, हे अयोग्य असले तरी, अशा प्रसंगात आपण पोलिसाच्या कचाट्यात अडकू शकतो आणि त्याचा आपल्याला दीर्घकाळ त्रास होऊ शकतो, हे शहाणपण तो अनुभवातून शिकलेला असतो. त्याचे जखमीच्या मदतीला न जाणे हे नैतिकदृष्ट्या गैर आहे; पण आपल्या पोलिसांच्या तपासणी पद्धतीच्या संदर्भात ते शहाणपणाचे ठरणारे आहे. घरात जर सशस्त्र दरोडेखोर शिरले तर मुकाट्याने किल्ल्या त्यांच्या हवाली करणे शहाणपणाचे ठरते! नैतिकदृष्ट्या, कदाचित हे भ्याडपणाचे ठरेल. म्हणून शहाणपण हे व्यक्तीच्या • प्रत्यक्ष जगण्याच्या संदर्भात ठरत असते आणि नैतिकता ही व्यक्तिपरिस्थितिनिरपेक्ष असते. शहाणपणाच्या वाङ्मयात व्यक्तीभोवतीची परिस्थिती आणि व्यक्तीच्या प्रेरणांची चौकट विचारात घेतली जाते. व्यक्तीभोवती निर्माण होणारी परिस्थिती दोन प्रकारची असते. एक विशिष्ट कालसंबद्ध परिस्थिती आणि दुसरी सार्वकालिक परिस्थिती. उदाहरणार्थ दंगल घडणे, ही विशिष्ट काळात घडणारी घटना आहे. जर दंगल सुरू झाली असेल तर जीव वाचवण्यासाठी पळणे, सुरक्षित जागी जाणे, शहाणपणाचे ठरेल. माणसांवर एकसारखी संकटे येत असतात. काही संकटांवर व्यक्ती सहजपणे मात करू शकते आणि काही संकटे अशी असतात की ती निश्चितपणे व्यक्तीच्या अस्तित्वाला धोकादायक ठरू शकतात. अशावेळी धोका घडवू शकणाऱ्या संकटाशी मुकाबला करण्याऐवजी माघार घेणे शह्मणपणाचे ठरते. युद्धात पराभव दिसत असताना मराठे चटकन माघार घेत; तह घडवून आणीत. उलट राजपूत केशरियाचा आणि जोहाराचा मार्ग अवलंबीत, असे इतिहास सांगतो, मराठ्यांची अशी माघार घेणे हे शहाणपणाचे मानावे लागेल आणि युद्धात जिवंत राहून पराभव स्वीकारणे योद्ध्याच्या आत्मप्रतिष्ठेला, स्त्रियांच्या शीलाला बाधक ठरू शकणार असल्यामुळे पराभव होत असताना शत्रूंवर तुटून पडून वीरमरण स्वीकारणे आणि स्त्रियांनी आत्मबलिदान करणे नैतिक ठरू शकेल. म्हणून शहाणपणाच्या मार्गात व्यक्तीच्या हितसंबंधांचा विचार असतो तर नीतीत समाजव्यवहार सुरळीत चालावेत, त्यात सर्वच व्यक्तींना सुरक्षितता लाभावी यासाठी आवश्यक असणाऱ्या स्थलकालपरिस्थितिनिरपेक्ष जीवनमूल्यांचा निवडक अंतर्नाद ३१५